श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ देवद आश्रमात वास्तव्यास असतांना जाणवलेले त्यांच्यातील दिव्यत्व !

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची गुरुमाऊलींप्रमाणे साधकांप्रती प्रीती अनुभवणे

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे ‘साधकांशी प्रेमाने बोलणे, त्यांची विचारपूस करणे, त्यांना जवळ घेणे, आश्रमातील सर्व सेवांतील बारकावे आणि त्यातील अडचणी जाणून घेणे’, या सर्व कृतींमधून त्यांची गुरुमाऊलीप्रमाणेच सर्व साधकांवरील प्रीती अनुभवता येत होती.

अ. त्यांनी मला जवळ घेतल्यावर मी काही क्षण निर्विचार अवस्था अनुभवली. ‘मी प्रत्यक्ष देवीमातेच्या मायेच्या कुशीत विसावले आहे’, असे मला जाणवले.

आ. त्यांच्या आश्रमातील वास्तव्यात मनात सतत देवीच्या स्तुतीपर गीताच्या पुढील ओळी येत होत्या,

‘माझी रेणुका माऊली, कल्पवृक्षाची साऊली ।
हाकेसरशी घाई घाई, वेगे धावतची पायी ।
आली तापल्या ऊन्हात, नाही आळस मनात ।।

– सुश्री नलिनी राऊत (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ५९ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल.

 

१. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे देवद आश्रमात स्वागत करणारा फलक वाचल्यावर मला पुष्कळ आनंद होऊन भावजागृती होणे

सुश्री नलिनी राऊत

‘३०.१.२०२३ या दिवशी सायंकाळी मी बाहेरून आश्रमात आले आणि महाप्रसादासाठी गेले. तिथे श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे देवद आश्रमात स्वागत करणारा फलक वाचल्यावर मला पुष्कळ आनंद झाला आणि माझी भावजागृती झाली. माझ्यावरचे त्रासदायक शक्तीचे आवरण वेगाने निघून गेले आणि मला हलकेपणा जाणवला. मी परत महाप्रसादाचा डबा घेऊन सेवेच्या ठिकाणी जातांना मला ‘मी हवेत तरंगत जात आहे’, असे जाणवले.

२. ‘श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ कोल्हापूरच्या देवीच्या स्वरूपात भेटायला आल्या आहेत’, असे जाणवणे

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ देवद आश्रमात आल्या, त्या वेळी ४ दिवस कोल्हापूर येथे श्री महालक्ष्मीदेवीचा किरणोत्सव चालू होता. त्या वेळी ‘भाविक कोल्हापूरला देवीच्या किरणोत्सवासाठी जातात; पण देवी आम्हाला प्रत्यक्ष भेटायला आली आहे’, असे अधून-मधून जाणवून माझी भावजागृती होत होती.

३. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले प्रत्यक्ष भेटायला आले आहेत’, असे वाटणे

मागील एक मास मला ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलीला (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) प्रत्यक्ष भेटावे’, असे तीव्रतेने वाटत होते आणि अकस्मात् ‘श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या आगमनाचा फलक वाचल्यावर त्यांच्या रूपातून प्रत्यक्ष सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलीच भेटीला आल्याचे जाणवले आणि ‘गुरुमाऊली प्रत्येक साधकाची इच्छा पूर्ण करते’, असे वाटून माझी भावजागृती झाली.

४. ‘श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या आगमनाच्या वेळी निसर्गात जाणवलेले पालट

४ अ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सर्व साधकांना त्यांच्या मायेची ऊब दिल्यामुळे थंडी न जाणवणे : श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ येण्याच्या काही दिवस आधी देवद येथे थंडी पडली होती. दिवसभर गार वारे वहायचे. त्यामुळे दिवसाही उबदार कपडे घालावे लागायचे. ३०.१.२०२३ या दिवशी सकाळी ७ वाजता मी प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राची पूजा करतांना एक साधक मला म्हणाले, ‘‘उद्यापासून ४ दिवस थंडीची लाट येणार आहे.’’ प्रत्यक्षात त्या दिवशी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ दुपारनंतर आश्रमात आल्यावर थंडीचे प्रमाण पुष्कळ न्यून झाले होते. चार दिवसांनंतर गुरुवारी सकाळी त्या परत जायला निघाल्यावर पुन्हा हवेत गारवा जाणवला. ‘श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सर्व साधकांना त्यांच्या मायेची ऊब दिल्यामुळे थंडी जाणवत नव्हती’, असे मला वाटले.

४ आ. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आल्यानंतर ‘आश्रमातील प्रकाश आणि चैतन्य यांमध्ये वाढ झाली आहे’, असे मला जाणवले.

५. ‘श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सर्व साधकांना त्यांची दैवी ऊर्जा पुरवली असून सर्व साधक एका वेगळ्याच उत्साहात आणि आनंदात न थकता सेवा करत आहेत’, असे मला जाणवले.

– सुश्री नलिनी राऊत (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ५९ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (८.२.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक