पनवेल, उरण मतदारसंघांत ८५ सहस्र १२९ मतदारांची दुबार नावे !

शेकापच्या माजी आमदारांकडून याचिका प्रविष्ट

पनवेल – भारतीय शेतकरी कामगार पक्षाने पनवेल, उरणसह नवी मुंबईतील विविध विधानसभा मतदारसंघांच्या मतदारसंख्येतील ८५ सहस्र १२९ मतदारांची दुबार नावे तातडीने रहित करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी प्रथम पनवेलच्या साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे ही मागणी केली होती; मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे.

राज्यातील सर्वाधिक मतदार संख्या असलेल्या विधानसभा क्षेत्रात पनवेल विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. सध्या या मतदारसंघात ६ लाख ४२ सहस्र ५७ मतदार आहेत. विविध औद्योगिक वसाहतींसह माथाडी कामगार पनवेलमध्ये रहातात. त्यामुळे परराज्यातील कामगार वर्ग येथे मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. सध्या पनवेलमधील दुबार नावे असलेल्यांची मतदारांची संख्या २५ सहस्र ७७२ एवढी असून पत्ते आणि दोषयुक्त असलेली ५८८ नावे आहेत. या प्रकरणी माजी आमदार पाटील यांनी संशय व्यक्त केला आहे.

संपादकीय भूमिका

या प्रकरणाचा तातडीने शोध घ्यायला हवा !