भारतीय संस्कृतीतील अन्य विषयांवर भाष्य आणि त्याचे पैलू !
पू. प्रा. सु.ग. शेवडे यांची ‘भारतीय संस्कृती’विषयीची लेखमालिका !
आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘राजकारण, प्रवास, भारतीय पाहुणचार आणि मांसाहार’, यांविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.
(भाग ६०)
भाग ५९ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/839335.html
प्रकरण ११
६. सोमरस
गीतेत म्हटले आहे, ‘त्रैविद्या मां सोमपाः पूतपापा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ।’ (श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ९, श्लोक २०) म्हणजे ‘तिन्ही वेदांत सांगितलेली सकाम कर्मे करणारे, सोमरस पिणारे, पापमुक्त लोक माझी यज्ञांनी पूजा करून स्वर्गप्राप्तीची इच्छा करतात.’
या श्लोकात ‘सोमपाः पूतपापाः ।’ म्हटले आहे, म्हणजे ‘सोमरस घेणारे, असे पापमुक्त याज्ञिक.’ ‘सोम’ या वनस्पतीला एक श्रेष्ठ औषधी आणि पवित्र वनस्पती मानतात. सोमयाग करणार्याला तिचे २ – ३ पळ्या प्राशन करण्यास सांगितले आहे. त्याचा दारूशी काहीही संबंध नाही.
‘दारू पिणे वाईट आहे’, अशा अर्थाचे असंख्य उल्लेख ऋग्वेदात आढळतात. जी गोष्ट मुळातच वाईट, ती यज्ञ करून पिणे चांगले कसे ठरू शकेल ? तेव्हा मुळात ‘सोम’ म्हणजे दारू नव्हे, एवढे लक्षात घ्यावे.
७. हिंदी भाषेवर अत्याचार
‘सर्वच गोष्टींत शुद्धता’, हा भारतीय संस्कृतीचा आग्रह असतो. यादृष्टीने शुद्ध बोलावे, शुद्ध लिहावे, यावर आपला भर असे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘लिपीशुद्धी’ आणि ‘भाषाशुद्धी’ चळवळ चालू केली.
आज दुर्दैवाने बोलण्यात आणि लिहिण्यात भाषांची भेसळ केली जात आहे. दूरदर्शनच्या वेगवेगळ्या वाहिन्यांवर विशेषतः ‘झी’ टी.व्ही.वरील बातम्या इतक्या इंग्रजीमिश्रित असतात की, त्या केवळ विशिष्ट वर्गातील लोकांसाठीच जणू आहेत. जवळजवळ सर्व हिंदी भाषेतील चित्रपट आणि वाहिन्या यांमध्ये बरेच उर्दू शब्द वापरले जातात. ‘लब्ज’ का ? ‘शब्द’ का नाही ? ‘नामुमकीन’ कशाला ? ‘असंभव’ का नको ? ‘मिया-बिबी’ हे शब्द ‘पती-पत्नी’ यांच्यासाठी अगदी हिंदु कुटुंबांच्या तोंडीसुद्धा घातलेले असतात. असे शेकडो उर्दू शब्द हिंदीत प्रचंड प्रमाणात घुसडवण्यात येत आहेत. हा हिंदी भाषेवर केला जाणारा अत्याचारच नाही का ?
८. जातीय अपप्रचार
जवळजवळ सर्व दूरदर्शन वाहिन्यांवरील हिंदी मालिकांमध्ये सामाजिक चित्रण असे असते. एखादे गाव, गावातील ठाकूर किंवा मुखिया हा गुंड, जुलमी, अत्याचारी. तो गरीब बिचार्या दलितांवर अन्याय करतो. गावातील एक ब्राह्मण त्या ठाकूराचे नेहमीच कान भरतो आणि एखादा सज्जन मुसलमान त्या ठाकूरापासून बिचार्या गरिबांना वाचवतो, तसेच बहुतेक बदमाश गुंड, कपाळाला गंध लावलेले दाखवतात. साधू, मांत्रिक प्रायः सर्वच बदमाश म्हणून चितारलेले असतात. हे भारतीय संस्कृतीचे यथार्थ चित्रण आहे का ? या अपप्रचाराचे दूरगामी परिणाम काय होतील बरे ?
९. संस्कृत भाषेची शास्त्रीयता
संस्कृत ही अशी भाषा आहे की, जिची रचना अत्यंत शास्त्रीय आहे. संस्कृत लिपीच बघा. अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ यांना स्वर म्हणतात. स्वर, म्हणजे आवाज. केवळ तोंडाच्या वेगवेगळ्या आकारांतून आवाज काढला की, हे स्वर उच्चारले जातात.
यानंतर व्यंजनांचेही शास्त्रीय प्रकार आहेत. क्, ख्, ग्, घ्, ङ् ही कण्ठ्य व्यंजने आहेत. व्यंजनात स्वर मिसळल्याविना पूर्ण अक्षर नाही. कण्ठ्य म्हणजे घशातून उच्चारलेली. च्, छ्, ज्, झ् आणि ञ् ही तालव्य, म्हणजे टाळूच्या स्पर्शाने उच्चारलेली व्यंजने आहेत. ट्, ठ्, ड्, ढ्, ण् ही मूर्धन्य, मूर्धा म्हणजे टाळूचा वरचा भाग होय. त्याला स्पर्श करून उच्चारलेली त्, थ्, द्, ध्, न् ही द्रत्य, म्हणजे दातांना जिभेचा स्पर्श करून उच्चारलेली व्यंजने आहेत. प्, फ्, ब्, भ्, म् ही ओष्ठ्य म्हणजे ओठांना ओठ लावून उच्चारलेली व्यंजने आहेत. त्यांतही ङ्, ञ्, ण्, न्, म् ही अनुनासिके, म्हणजे नाकातून उच्चार होणारी व्यंजने आहेत. या क, च, ट, त, प वर्गांव्यतिरिक्तही काही अक्षरे य्, र्, ल्, व्, श, ष्, स्, ह्, ळ् ही संमिश्र उच्चारांची आणि वरील वर्गात न सामावणारी आहेत. ‘क्ष्’ आणि ‘ज्ञ्’ ही जोडाक्षरे आहेत. इतकी शास्त्रीयता जगांत कोणत्याच लिपीत नाही. त्यामुळे जसे बोलावे, तसे संस्कृतमध्ये लिहिता येते आणि जसे लिहिले आहे, तसे वाचता येते. स्पेलिंग एक आणि उच्चार वेगळाच हा प्रकार Knot, Knite, Psychology, Honour. Hour, Queue इत्यादी इंग्रजीतील शब्दांप्रमाणे संस्कृतात नाही.
(क्रमशः)
– भारताचार्य अन् धर्मभूषण पू. प्रा. सु.ग. शेवडे, चेंबूर, मुंबई.
(साभार : ग्रंथ ‘भारतीय संस्कृती’)
भाग ६१ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/840124.html