‘वाणी’, ‘विचार’ आणि ‘कृती’ यांमधून साधकांना घडवणार्‍या अन् ‘चालता-बोलता ग्रंथ’, हे संबोधन सार्थ ठरवणार्‍या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ !

‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आम्हा सर्व साधकांना त्यांची वाणी, विचार आणि कृती यांमधून ‘प्रत्येक कृती आणि विचार यांमध्ये, तसेच प्रत्येक टप्प्याला ‘योग्य कसे असायला हवे ?’ हे अखंडपणे शिकवत आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना जेव्हा ‘संत’ म्हणून घोषित केले, तेव्हा पू. पृथ्वीराज हजारे (सनातनचे २५ वे संत, वय ६५ वर्षे) यांनी त्यांना ‘चालता-बोलता ग्रंथ’, असे संबोधले होते. हे वाक्य अगदी योग्य असून ते पुढील उदाहरणांवरून दिसून येते. ‘प्रत्येक लहान लहान गोष्टींमधूनही साधना व्हावी’, यासाठी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी वेळोवेळी सांगितलेली सूत्रे आणि त्यांची अलौकिक गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

रामनाथी, गोवा येथील आश्रमाच्या शाक (भाजी) विभागात टोमॅटो व्यवस्थित लावतांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

१. ‘वस्तू भावपूर्णतेने कशा सांभाळाव्यात ?’ हे शिकवणे

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी वैयक्तिक वापरातील लहान लहान वस्तूही ‘भावपूर्ण रीतीने कशा हाताळाव्यात आणि सांभाळाव्यात ?’ हे आम्हाला शिकवले, उदा. रुमालाची घडी करणे, कपड्यांची घडी करणे, ‘कपड्यांची काळजी कशी घ्यावी ?’, तसेच पावसाळी बूट किंवा चप्पल माळ्यावर (‘लॉफ्ट’वर) ठेवायचे असल्यास ते कशा प्रकारे ‘पॅक’ करून ठेवावे, ज्यामुळे ते ‘खराब’ होणार नाहीत आणि पुढील वर्षी पुन्हा वापरता येतील !

२. सेवांतील व्यस्ततेमुळे आईशी बोलायला वेळ न मिळणे, त्या वेळी ‘आईकडे ‘साधिका’ या दृष्टीने पाहून तिच्याशी बोलायला हवे’, याची जाणीव श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी करून देणे

एकदा श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी माझ्या आईला (सौ. अंजली अजय जोशी यांना) विचारले, ‘‘तुमचे प्रियांकाशी बोलणे होते का ?’’ तेव्हा आईने सांगितले, ‘‘हो, मी तिला संपर्क करते; पण काही वेळेला तिच्यासमोर अन्य साधक असला, तर ती त्याच्याशी बोलत रहाते. काही वेळाने ती मला म्हणते, ‘‘आई, मला एक सेवा आली आहे. मी तुझ्याशी नंतर बोलते.’’ आईने हे गमतीने सांगितले होते; पण त्यामुळे मी अंतर्मुख झाले. ‘आईशी बोलण्यास प्राधान्य देत नाही’, हे मी कधी लक्षातच घेतले नव्हते, ही माझी चूकच आहे. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी मला प्रेमाने या चुकीची जाणीव करून दिली. आईकडेही ‘साधिका’ या दृष्टीने पाहून तिच्याशी बोलायला हवे’, याचे गांभीर्य माझ्या मनात नव्हते. त्यांनी ‘मी साधना म्हणून आईकडे कसे बघायला हवे ?’, हे मला शिकवले.

देवद, पनवेल येथील आश्रमातील साधक  श्री. नारायण पाटील आणि  श्री. संजय नाणोसकर यांना मार्गदर्शन करतांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

३. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांची गुणवैशिष्ट्ये

३ अ. सतत शिकण्याच्या स्थितीत असणे आणि साधकांच्या साधनेतील अडचणी पुष्कळ वेळ देऊन सोडवणे : श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ साधकांच्या साधनेतील लहानसहान अडचणीही पुष्कळ वेळ देऊन सोडवतात. कितीही घाई असली, तरी बाहेरगावाहून आलेल्या साधकांना त्या आवर्जून भेटतात. साधकांना पाहून आणि भेटून त्यांना अत्यानंद होतो. ‘साधकांना भेटण्यात किती आनंद आहे. या साधकांकडून पुष्कळ शिकण्यासारखे असते’, असे त्या म्हणतात. यातून ‘आपणही साधकांकडून कसे शिकायला हवे’, याची मला जाणीव झाली.

३ आ. सच्चिदानंद परबह्म डॉ. आठवले यांना अपेक्षित अशी सेवा होण्यासाठीची तीव्र तळमळ : एकदा मी श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्यासमवेत सेवा करत असतांना त्या मला म्हणाल्या, ‘‘मी पुष्कळ न्यून पडते. मला अजून पुष्कळ प्रयत्न करायला हवेत.’’ त्यांच्या बोलण्यातून सच्चिदानंद परबह्म डॉक्टरांना अपेक्षित अशी सेवा होण्यासाठीची त्यांची अत्यंत तीव्र तळमळ मला अनुभवायला मिळाली.

मुंबई येथील दौर्‍यात एका ठिकाणी भरलेले जतन केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन अभ्यासाच्या दृष्टीने पहातांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

३ इ. अहंशून्यता : श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ एखादा सत्संग घेतात. तो झाल्यावर त्या शेवटी सांगतात, ‘‘आतापर्यंत सत्संगात जे काही सांगितले, त्यामध्ये माझे काही चुकले असेल, तर त्याविषयीही सांगा.’’ यातून त्यांची अहंशून्यता लक्षात येते.

३ ई. सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता असल्याने साधिकेने मनात केलेले आत्मनिवेदन श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्यापर्यंत पोचून त्यांनी स्थुलातून उत्तर देणे : एकदा मी श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या खोलीत गेले होते. तेव्हा त्या धारिकांचे वाचन करत होत्या. त्या वेळी एका प्रसंगामध्ये मला वाईट वाटल्याने मी त्यांच्या चरणांशी बसले आणि मनातल्या मनात त्यांना आत्मनिवेदन करू लागले. मी ज्या क्षणी मनातून म्हटले, ‘मला याचे पुष्कळ वाईट वाटत आहे. मी काय करू ?’ त्याच क्षणी त्यांनी लिखाणाचे वाचन थांबवून माझ्याकडे पाहिले आणि म्हणाल्या, ‘‘काय झाले, त्याचा विचार करू नको’’, असे म्हणून त्या पुनः पूर्ववत् धारिकेचे वाचन करू लागल्या.

सौ. प्रियांका राजहंस

३ उ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी एकाच वेळी स्थूल आणि सूक्ष्म अशा दोन्ही स्तरांवर अनेक गोष्टी करणे : पुष्कळ वेळा श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ भावस्थितीमध्ये असतात, म्हणजे त्यांचे समष्टी कार्य चालू असले, तरी त्यांची दृष्टी शून्यात असते. त्या वेळी ‘त्या विश्वमन आणि विश्वबुद्धी यांमधील विचार ग्रहण करत असतात’, असे मला वाटते. त्यांचे अंतरातून ईश्वराशी अनुसंधान असते आणि त्याच वेळी त्यांचे स्थुलातून समष्टी कार्यही वेगाने चालू असते’, असे माझ्या लक्षात येते.

३ ऊ. साधिकेला एका गंभीर चुकीसाठी रागावल्यानंतर थोड्या वेळाने तिची क्षमा मागणार्‍या श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ ! : एकदा माझ्याकडून झालेल्या एका गंभीर चुकीमुळे श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ मला रागावल्या होत्या. नंतर एका सेवेसाठी मला त्यांच्याकडे जायचे होते. त्या वेळी ‘माझ्याकडून एवढी गंभीर चूक झाली आहे. आता मी त्यांच्यासमोर कशी जाऊ ?’, या विचारांनी मला त्यांच्या समोर जाण्याचे धाडस होत नव्हते. त्या वेळी मी देवाला प्रार्थना करून त्यांच्याकडे गेले. त्यांच्याकडे जाताक्षणी त्या मला म्हणाल्या, ‘‘क्षमा कर गं, मी तुला पुष्कळच रागावले.’’ तेव्हा माझ्या डोळ्यांत अश्रूच आले. मला वाटले, ‘माझा अहं किती मोठा आहे. गुरूंकडे जातांना माझ्या मनात प्रतिमेचे विचार येत होते; पण माझे गुरु मला प्रत्येक कृतीतून शिकवतात आणि माझा अहं घालवतात.’

३ ए. चूक सांगण्याची श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांची दैवी पद्धत – साधकांना चूक कठोरपणे सांगतांना त्यांना निराशा न येण्यासाठी शक्तीही देणे : श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ एखादी चूक सांगतांना त्याविषयीचे गांभीर्य निर्माण होण्यासाठी ती कठोरपणे सांगतात. त्यांचे चूक सांगणे, म्हणजे साधकाच्या अहंवर एक प्रकारचा वारच असतो आणि तो पेलवणारा नसतो; परंतु त्या वार पेलण्याची शक्तीही देतात. त्यामुळे मनात नकारात्मकता निर्माण होत नाही आणि ‘भगवंत जन्मोजन्मीचे अयोग्य संस्कार घालवण्यासाठी चूक दाखवून देत आहे’, याविषयी कृतज्ञताच वाटते. तो स्वभावदोष किंवा अहं याचा पैलू घालवण्यासाठी प्रेरणा मिळून उत्साह वाढतो. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांची चूक सांगण्याची ही पद्धत पुष्कळ दैवी वाटते; कारण ‘चुका ऐकणे, अहंविषयी कुणीतरी सांगत आहे, ते पचवू शकणे आणि ते लगेच १०० टक्के स्वीकारणे’, हे खरेतर अत्यंत कठीण आहे. केवळ आणि केवळ श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या कृपेमुळेच ‘मी माझ्या अहंविषयी ऐकून ते स्वीकारू शकते’, अशी अंतर्मुखता त्यांनी माझ्यात निर्माण केली आहे.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि  सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ  साधक श्री. दत्तात्रय लोहार यांनी ब्रह्मोत्सवातील रथाच्या लाकडांना विविध आकार देण्यासाठी बनवलेले कातकामाचे यंत्र पहात आहेत.


श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्यात नियोजनकौशल्य आहे. एखाद्या सेवेचा आध्यात्मिक स्तरावर अभ्यास करणे, बारकावे समजून घेणे इत्यादी कृतींद्वारे ‘परिपूर्ण सेवा कशी करायची ?’, हे त्या साधकांना शिकवतात.

३ ऐ. साधकांची चुकांविरहित सेवा होऊन आध्यात्मिक उन्नती व्हावी, याची तळमळ श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनाच अधिक असणे : ‘प्रत्येक चूक आपल्याला देवापासून दूर नेते’, हे सच्चिदानंद परबह्म डॉ. आठवले यांचे वचन आहे. त्यानुसार श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ मला माझी प्रत्येक चूक सांगून देवाकडे जाण्यासाठी एक एक पायरी पुढे घेऊन जात आहेत. ‘चूक सुधारण्यासाठी मी कोणते प्रयत्न करायला हवेत ?’, हे सांगून त्या मला परिपूर्ण रीतीने घडवत आहेत. माझ्यापेक्षा माझी आध्यात्मिक उन्नती होण्याची तळमळ त्यांनाच अधिक आहे.

३ ओ. प्रीती

३ ओ १. साधिकेला शारीरिक त्रास होत असल्याने तिची प्रेमभावाने काळजी घेणे : मला पोटाचा त्रास होत असल्यामुळे वैद्यांनी लवकर झोपण्यास सांगितले आहे. त्यानुसार माझी प्रसाद आणि महाप्रसाद घेणे, तसेच झोपणे यांची वेळ झाल्यावर श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ मला आठवण करून देतात. त्या माझी पुष्कळ काळजीही घेतात. ‘माझ्या सेवेवर आणि माझ्या मनावरही या गोष्टींचा परिणाम होऊ नये’, याकडे त्या स्वतः लक्ष देऊन पहातात.

३ ओ २. सर्व साधकांवर मातृवत् प्रीती : प्रसारातून, म्हणजे बाहेरगावांहून अनेक दिवसांनी रामनाथी आश्रमात येणार्‍या सर्व साधकांवर श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ मातृवत् प्रेम करतात. साधकांना मानसिकदृष्ट्या आधार देणे, त्यांना भेटून साधनेसाठी आध्यात्मिकदृष्ट्या ऊर्जा देणे’, असे त्या करतात.

३ औ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ स्वतः गुरुपदावर असूनही नेहमी शिष्यभावातच असतात.

३ अं. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव : एकदा सेवेनिमित्त श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ काही दिवसांसाठी अन्य आश्रमात गेल्या होत्या. त्या वेळी प.पू. डॉक्टरांनी मला निरोप दिला, ‘‘एक साधक गाडीने त्या आश्रमात जाणार आहे, तर श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांना काही पाठवायचे असेल, तर आपण त्यांना ते पाठवूया.’’ मी श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांना संपर्क करून याविषयी विचारले. त्या वेळी त्या म्हणाल्या, ‘‘प.पू. डॉक्टरांनी मला भरभरून दिले आहे. मला काहीही नको.’’ त्यांच्या उत्तरातून ‘त्यांचा गुरुदेवांप्रती किती भाव आहे’, ते माझ्या लक्षात आले.

४. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या भावामुळे ‘ब्रह्मांडच नव्हे, तर प्रत्यक्ष तारेही त्यांच्याशी बोलत आहेत’, असे वाटणे

एकदा मी श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्यासमवेत एका सेवेसाठी बाहेर गेले होते. आम्हाला आश्रमात परत यायला पुष्कळ रात्र झाली. तेव्हा गाडीतून वर पाहून त्यांनी मला सांगितले, ‘‘आता एका तार्‍याने मला हाक मारली.’’ त्यानंतर त्यांनी आकाशमंडलातील तार्‍याकडे पाहिले. नंतर त्या मला म्हणाल्या. तार्‍याने ‘तू कशी आहेस ?’, असे मला विचारले आणि मी त्या तार्‍याला सांगितले की, ‘मी आनंदी आणि स्थिर आहे !’

त्यांचे बोलणे ऐकून माझ्या लक्षात आले की, ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्यातील भावामुळे ब्रह्मांडच नव्हे, तर तारेही त्यांच्याशी बोलत आहेत ! अशा गुरुमाऊलीच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. प्रियांका चेतन राजहंस (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ३७ वर्षे), बांदोडा, फोंडा, गोवा. (१८.९.२०२३)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक