केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडून पुण्यातून १० जणांना अटक

सायबर चोरांच्या विरोधात देशभर धाडी !

पुणे – केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून देशभरातील ३२ शहरांमध्ये कारवाई करण्यात आली. वेगवेगळ्या प्रकारची आर्थिक आमिषे दाखवणे, तसेच ‘केंद्रीय अन्वेषण यंत्रणांकडून चौकशी करण्यात येईल’, ‘पोलीस गुन्हा नोदंवतील’, अशी भीती दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणार्‍या ऑनलाईन (सायबर) चोरांच्या विरोधात ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पुणे येथून १० जणांना अटक केली आहे.

नागरिकांची फसवणूक करण्यासाठी सायबर चोरांनी ‘कॉल सेंटर’ चालू केली होती. अत्याधुनिक यंत्रणा वापरून चोर नागरिकांना फसवणुकीच्या जाळ्यात अडकवत असल्याचे उघडकीस आले. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने पुणेसह, भाग्यनगर (हैद्राबाद), कर्णावती, विशाखापट्टणम् या शहरांसह देशभर २६ सप्टेंबर या दिवशी धाडी घातल्या. विभागाने पुण्यातून १०, भाग्यनगर ५ आणि विशाखापट्टणम् येथून ११ जणांना अटक केली आहे. या ऑनलाईन फसवणुकीमध्ये १७० जणांचा समावेश असल्याचे अन्वेषणातून उघड झाले आहे.