‘लोहगडा’ची ‘युनेस्को’च्या पथकाकडून पहाणी !

वडगाव मावळ (पुणे) – जागतिक वारसा स्थळांच्या सूचीत नामांकन मिळालेल्या मावळ तालुक्यातील ‘लोहगड’ला ३० सप्टेंबर या दिवशी ‘युनेस्को’च्या पथकाने भेट देऊन गडावरील विविध ऐतिहासिक स्थळांची माहिती घेतली. स्थानिक अधिकारी आणि ग्रामस्थ यांच्याशी दुभाषाच्या साहाय्याने त्यांनी संवाद साधला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमांची साक्ष देणार्‍या गडांपैकी १२ गडांचा ‘युनेस्को’च्या जागतिक वारसा स्थळांच्या सूचीमध्ये समावेश करण्यात आला आहे. या स्थळांचा जागतिक वारसा सूचीमध्ये समावेश केल्याने देशाला गौरव प्राप्त झाला आहे.

‘युनेस्को’च्या पथकाने लोहगडाची ३ घंटे पहाणी केली. गडावरील गणेश दरवाजा, महा दरवाजा, चोर दरवाजा, हनुमान दरवाजा, महादेव मंदिर, कबर, तटबंदी, त्रिंबक तलाव, सदर, शिवकालीन स्थळांचे अवशेष, लेण्या, घोड्यांचा तबेला, गडावरील सोळा कोनी पाण्याचा तलाव, विंचू काटा यांसह गडावरील इतरही स्थानांना भेटी दिल्या.