‘जय जवान जय किसान’ ही घोषणा देणारे भारताचे दिवंगत माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री !
आज लालबहादूर शास्त्री यांची जयंती आहे. त्या निमित्ताने…
१. लालबहादूर शास्त्री यांचे बालपण
‘एक मुलगा काशीतील ‘हरिश्चंद्र माध्यमिक हायस्कूल’मध्ये शिकत होता. त्याचे गाव काशीपासून ८ मैल दूर होते. तो तेथून प्रतिदिन चालत शाळेत यायचा. वाटेत येणार्या गंगा नदीला पार करून शाळेत यावे लागत असे. त्या काळात गंगा नदी पार करण्यासाठी नावाड्याला दोन पैसे द्यावे लागत. दोन पैसे जाण्याचे आणि दोन पैसे परत येण्याचे, म्हणजे त्या काळात एक आणा, म्हणजे जवळपास दोन रुपये व्हायचे. त्या काळी ही रक्कम पुष्कळच होती. त्या मुलाने त्यांच्या आई-वडिलांवर अधिक पैशाचा भार पडायला नको, असा विचार केला आणि त्यांच्याकडे पैसे न मागता तो पोहायला शिकला.
कोणत्याही ऋतूत नित्यनेमाने पोहून गंगानदी पार करून शाळेला जायचा त्याचा नेम झाला होता. हाच मुलगा पुढे भारताचा पंतप्रधान झाला. त्यांचे नाव लालबहादूर शास्त्री असून त्यांचा जन्म २ ऑक्टोबर १९०४ या दिवशी उत्तरप्रदेशमधील मुघलसराई या गावात झाला. ते केवळ दीड वर्षाचे असतांना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांचे वडील शाळेत शिक्षक होते. त्यांची आई ३ मुलांसह वडिलांच्या घरी स्थायिक झाली. लहान गावात लालबहादूर यांचे शालेय शिक्षण कसेबसे झाले, तरी गरिबीतही त्यांचे बालपण सुखात गेले.
२. लालबहादूर शास्त्री यांचा स्वातंत्र्यलढ्यात सहभाग आणि राजकीय कारकीर्द
पुढे ब्रिटीश राजवटीच्या विरोधात स्थापन करण्यात आलेल्या अनेक राष्ट्रीय संस्थांपैकी एक असलेल्या वाराणसीतील काशी विद्यापिठात लालबहादूर सामील झाले. येथे अनेक महान विद्वान आणि देशभक्त यांचा त्यांच्या व्यक्तीमत्त्वावर प्रभाव पडला. विद्यापिठाने त्यांना दिलेल्या पदवीचे नाव ‘शास्त्री’ होते; मात्र लोकांच्या मनात त्यांच्या नावाचा एक भाग म्हणून शास्त्री हे नाव कोरले गेले.
लालबहादूर शास्त्री यांनी वर्ष १९३० च्या काळात स्वातंत्र्यलढ्यात स्वत:ला झोकून दिले. त्यांनी अनेक मोहिमांचे नेतृत्व केले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी राजकारणात सक्रीय सहभाग घेतला. पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या निधनानंतर ते पंतप्रधान बनले. वर्ष १९६४ मध्ये झालेल्या शिखर परिषदेत त्यांनी विश्वशांतीसाठी अत्यंत ओजस्वी भाषण केले. पाकिस्तान भारताच्या विरोधात वर्ष १९६५ मध्ये चालू केलेली लढाई थांबवायला सिद्ध नव्हता. काश्मीरमधून पाक सैन्य भारतात घुसू लागले. तेव्हा शास्त्रीजींनी भारतीय सैनिकांना ‘पुढे चला’, असा आदेश दिला. त्या वेळी संपूर्ण राष्ट्र जागे झाले. रणांगणात विजय प्राप्तीसाठी ते सैनिकांना प्रेरणा देत होते, त्याच वेळी देशातील शेतकर्यांनाही प्रेरणा देत असत. त्यांनी ‘जय जवान जय किसान’ ही घोषणा दिली, जी अद्यापही लोकप्रिय आहे.’
(साभार : दैनिक ‘तरुण भारत’, ११.१.२०२३)