इम्तियाज जलील यांच्यावर कारवाई होण्यासाठी सांगली आणि कोल्हापूर येथे निवेदने अन् आंदोलन !
कोल्हापूर – एम्.आय.एम्.चे इम्तियाज जलील यांच्यावर कारवाई होण्यासाठी सांगली आणि कोल्हापूर येथे निवेदन देऊन आंदोलन करण्यात आले.
१. शाहूवाडी (जिल्हा कोल्हापूर) – छत्रपती संभाजीनगर येथे इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखालील ‘तिरंगा रॅली’त संभाजीनगर-जालना रस्त्यावरील नामनिर्देशक संभाजीराजे फलकावर काळे फासणार्यांवर गुन्हे नोंदवावेत, या मागणीचे निवेदन सकल हिंदु समाजाच्या वतीने शाहूवाडी पोलीस ठाणे येथे देण्यात आले. निवेदन पोलीस नाईक नदाफ यांनी स्वीकारले. या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. महेश विभूते, सर्वश्री रूपेश वारंगे, संजय भोपळे, चेतन गुजर, युवराज काटकर, अनिल कुलकर्णी, प्रसाद कुलकर्णी उपस्थित होते.
२. कोल्हापूर – गुन्हा नोंदवण्यासाठी करवीर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलनाच्या वेळी हिंदू एकता आंदोलन जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कोल्हापूर जिल्हा कार्यवाह श्री. सुरेश यादव, सर्वश्री निरंजन शिंदे, योगेश केरकर, संदीप सासने, प्रसन्न शिंदे उपस्थित होते.
हिंदुत्वनिष्ठ संघटना त्यांच्या पद्धतीनुसार याला उत्तर देतील ! – विकास सूर्यवंशी, ‘आम्ही शिवभक्त’
मिरज – या निंदनीय कृत्यात सहभागी असणार्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी; अन्यथा हिंदुत्वनिष्ठ संघटना त्यांच्या पद्धतीनुसार उत्तर देतील, अशी चेतावणी ‘आम्ही शिवभक्त’, संघटनेचे प्रमुख श्री. विकास सूर्यवंशी यांनी दिली. जलील यांच्यावर कारवाई होण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने महाराणा प्रताप चौकात ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
या आंदोलनात सर्वश्री विजय शिंदे, प्रकाश जाधव, सोमनाथ घोटखिंडे, सूर्यकांत शेंगणे, कृष्णा नायडू, किरण माळी, यशराज पाटील यांसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
इचलकरंजी येथे निवेदन
इचलकरंजी – देशाची एकात्मता आणि एकता धोक्यात आणणार्या अन् धार्मिक तणावाचे वातावरण निर्माण करणार्या आरोपींवर कठोर कारवाई करावी, यासाठी विश्व हिंदु परिषद, बजरंग दल इचलकरंजी शहर यांच्या वतीने शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे निवेदन देण्यात आले. या वेळी सर्वश्री प्रवीण सामंत, बाळासाहेब ओझा, सर्जेराव कुंभार, सुजित कांबळे, सोमेश्वर वाघमोडे, रविकिरण हुक्कीरे, मंथन दळवी, उमेश साळगावकर, भिकाजी पाटील यांच्यासह अन्य उपस्थित होते.