Bengal Doctors Back On Strike : बंगालमध्ये कनिष्ठ डॉक्टर पुन्हा संपावर
रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण झाल्याचे प्रकरण
कोलकाता (बंगाल) – आमच्या सुरक्षेच्या मागण्या पूर्ण करण्याविषयी ममता बॅनर्जी सरकारचा दृष्टीकोन सकारात्मक दिसत नाही. आज ५२ वा दिवस आहे. आमच्यावर अजूनही आक्रमणे होत आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी कोणतेही प्रयत्न होतांना दिसत नाहीत. आजपासून काम पूर्णपणे बंद करण्याखेरीज आमच्याकडे पर्याय नाही. जोपर्यंत राज्य सरकारकडून कारवाई होत नाही, तोपर्यंत काम बंद रहाणार आहे, असे सांगत येथील कनिष्ठ डॉक्टर पुन्हा संपावर गेले आहेत. ‘आम्हाला संपूर्ण सुरक्षा द्यावी’, अशी डॉक्टरांची मागणी आहे. २ ऑक्टोबर या दिवशी कनिष्ठ डॉक्टर कोलकाता येथे मोर्चाही काढणार आहेत. याआधी १० ऑगस्टपासून कनिष्ठ डॉक्टरांनी ४२ दिवस संप केला होता आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वादन दिल्यावर त्यांनी २१ सप्टेंबर या दिवशी संप मागे घेला होता. राधा गोबिंद कर रुग्णालयात प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार करून हत्या केल्यामुळे डॉक्टरांनी संप पुकारला होता.
२७ सप्टेंबरला एका रुग्णाच्या मृत्यूनंतर कोलकात्याच्या सागर दत्ता रुग्णालयात ३ डॉक्टर आणि ३ परिचारिका यांना मारहाण झाल्याची घटना समोर आली होती. या घटनेने कनिष्ठ डॉक्टर संतप्त झाले. त्यांनी रुग्णालयात निदर्शनेही केली. याप्रकरणी ४ आंदोलक डॉक्टरांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे. ‘रुग्णालयांमध्ये सुरक्षा पुरवावी, जेणेकरून न घाबरता काम करू शकतो’, अशी डॉक्टरांची मागणी आहे.
संपादकीय भूमिकाडॉक्टरांना संपावर जावे लागते, हे देशातील सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद ! डॉक्टरांचे रक्षण करू न शकणारे सरकार आणि पोलीस काय कामाचे ? |