Madras HC Questions Sadhguru : ईशा फाउंडेशनमध्‍ये  स्‍वेच्‍छेने वास्‍तव्‍य करत असल्‍याचे तेथील महिलांची न्‍यायालयात माहिती !

ईशा योगकेंद्रात रहाण्‍यासाठी तरुणींचा बुद्धीभेद करत असल्‍याचा आरोप करत उच्‍च न्‍यायालयात याचिका प्रविष्‍ट !

थिरूवनंतपूरम्  (तमिळनाडू) – तमिळनाडू कृषी विद्यापिठातील माजी प्राध्‍यापक एस्. कामराज यांनी ईशा फाउंडेशनचे संस्‍थापक सद़्‍गुरु जग्‍गी वासुदेव यांच्‍या विरोधात एका मद्रास उच्‍च न्‍यायालयात याचिका प्रविष्‍ट (दाखल) केली होती. सद़्‍गुरु जग्‍गी वासुदेव यांच्‍या विरोधातील याचिकेत म्‍हटले आहे की, ते ईशा योगकेंद्रात रहाण्‍यासाठी तरुणींचा बुद्धीभेद करतात. या याचिकेवर ३० सप्‍टेंबर २०२४ या दिवशी सुनावणी पार पडली. सुनावणीच्‍या वेळी त्‍यांच्‍या २ मुलींना न्‍यायालयात प्रत्‍यक्ष उपस्‍थित करण्‍याची विनंती याचिकेद्वारे केली होती. त्‍यानंतर न्‍यायालयात दोन महिला (वय ३९ आणि  ४२ वर्षे) उपस्‍थित झाल्‍या. त्‍यांनी न्‍यायालयाला सांगितले, ‘आम्‍हाला ईशा फाउंडेशनमध्‍ये बलपूर्वक ठेवलेले नसून आम्‍ही तिथे स्‍वेच्‍छेने रहात आहोत.’ तसेच ईशा फाउंडेशनने, ‘महिला स्‍वेच्‍छेने संस्‍थेच्‍या योगकेंद्रात रहाणे पसंत करतात’, असे सांगितले आहे.

१. या वेळी न्‍यायालयाने जग्‍गी वासुदेव यांच्‍या अधिवक्‍त्‍यांना, ‘जग्‍गी वासुदेव यांनी स्‍वतःच्‍या मुलीचे लग्‍न लावून दिलेले असतांना ते इतर तरुणींना संसाराचा त्‍याग करून संन्‍याशांसारखे जीवन जगण्‍यासाठी प्रोत्‍साहन का देत आहेत ?’, असा प्रश्‍न विचारला.

२. न्‍यायमूर्ती एस्.एम्. सुब्रह्मण्‍यम् आणि व्‍ही. शिवाग्‍नम् यांनी जग्‍गी वासुदेव यांच्‍या कारभारावर बोट ठेवले.

३. न्‍यायालयाने या प्रकरणाचे अधिक अन्‍वेषण करण्‍याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्‍यांनी पोलिसांना निर्देश दिले आहेत की, ईशा फाउंडेशनशी संबंधित सर्व प्रकरणांची एक सूची बनवून न्‍यायालयासमोर सादर करावी.