Indian fishermen : शिक्षा संपूनही १३० भारतीय मासेमार पाकिस्तानी कारागृहात खितपत पडून !
नवी देहली – खोल समुद्रात मासेमारी करतांना चुकून सागरी सीमा ओलांडल्याने २१० भारतीय मासेमारांना पाकिस्तानच्या तटरक्षक दलाने अटक केली करून कारागृहात डांबले. त्यांपैकी १३० जणांच्या शिक्षेचा कालावधी संपूनही ते पाकिस्तानी कारागृहात खितपत पडून आहेत. पाकिस्तानच्या कराची येथील कारागृहामध्ये असलेल्या १३० भारतीय मासेमारांमध्ये महाराष्ट्रातील १९ जणांचा समावेश आहे.
१. यापूर्वी भारताच्या कारागृहात डांबण्यात आलेल्या पाकिस्तानी मासेमार बंदीवानांची भारत सरकारने सुटका केली आहे; मात्र पाक सरकार भारतीय मासेमारांना सोडण्यास इच्छुक नाही. (भारत गांधीगिरी मनोवृत्ती कधी त्यागणार ? – संपादक)
२. पाकिस्तानमध्ये २१० भारतीय मासेमार कराचीमधील मालीर कारागृहात शिक्षा भोगत आहेत. त्यांतील १३० जणांचा शिक्षेचा कालावधी संपून २ वर्षे झाली आहेत.
३. ‘या मासेमारांची सुटका करण्यासाठी केंद्र सरकार युद्धपातळीवर प्रयत्न का करत नाहीत ?’, असा प्रश्न त्यांच्या नातेवाईकांनी विचारला आहे.
४. पाकिस्तानच्या कारागृहातील १० मासेमारांची प्रकृती बिघडलेली असून त्यांना तातडीच्या उपचारांची आवश्यकता आहे. त्यांच्या सुटकेसाठी सरकारने प्रयत्न करावेत, अशी मागणी मासेमारांचे नेते वेलजीभाई मसानी यांनी केली आहे.
५. ५ सप्टेंबर या दिवशी पाकिस्तानच्या कारागृहातील एका भारतीय मासेमाराचा मृत्यू झाला. त्याची शिक्षा वर्ष २०२१ मध्येच संपली होती.
६. भारत आणि पाकिस्तान या २ देशांमध्ये २१ मे २००८ या दिवशी ‘कॉन्सुलर अॅक्सेस’ करार झाला. या कराराच्या अंतर्गत पाकिस्तानमध्ये असलेल्या भारतीय नागरिकाला तेथील भारतीय राजदूतावासातील अधिकार्यांशी संपर्क साधण्याचा अधिकार प्राप्त होता.
७. या करारानुसार पाकिस्तान सरकारने १३० भारतीय मासेमारांना सोडणे अपेक्षित होते; मात्र त्यांची सुटका झालेली नाही.
संपादकीय भूमिकायांना सोडवण्यासाठी सरकार काही पावले उचलणार आहे का ? |