Bangladeshi Hindu : (म्हणे) ‘बांगलादेशात आंदोलनाच्या वेळी ‘हिंदु’ म्हणून कुणावरही आक्रमण झाले नाही !’ – महंमद तौहीद हुसेन

  • बांगलादेशातील अंतरिम सरकारचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार महंमद तौहीद हुसेन यांचा दावा !

  • अवामी लीगच्या समर्थकांवर आक्रमणे झाल्याचाही केला दावा !

महंमद तौहीद हुसेन

ढाका (बांगलादेश) – शेख हसीना बांगलादेशातून बाहेर गेल्यानंतर लगेचच प्रशासनात पोकळी आणि पोलिसांची समस्या निर्माण झाली होती; कारण पोलीस तरुण पिढीच्या विरोधात उभे होते. त्यामुळे शेख हसीना गेल्यावर तणाव अधिक होता. त्यामुळे काही घटना घडल्या; पण त्याला ‘हिंदुविरोधी आंदोलन’ म्हणणे चुकीचे आहे. हा हिंसाचार अवामी लीगच्या निष्ठावंतांविरुद्ध होता, अशा शब्दांत बांगलादेशातील अंतरिम सरकारचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार महंमद तौहीद हुसेन यांनी बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या आक्रमणांविषयी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला.

महंमद तौहीद हुसेन पुढे म्हणाले की, आंदोलनाच्या वेळी हिंसाचार झाला; पण तो कुणी हिंदु किंवा मुसलमान या आधारावर नव्हता. उलट त्या वेळी हिंदूंपेक्षा मुसलमानांवर अधिक आक्रमणे झाली होती.

बांगलादेशात होणार दुर्गापूजा उत्सव

महंमद तौहीद हुसेन यांना देशात दुर्गापूजा साजरी होणार का ?, असे विचारले असता ते म्हणाले की, ही फार विचित्र गोष्ट आहे. काही लोकांना दुर्गापूजा आवडत नसेल; पण या देशात शतकानुशतके दुर्गापूजा होत असून ती झाली नाही, असे एकही वर्ष गेले नाही. ज्यांना दुर्गापूजा करायची आहे, ते निश्‍चितच करू शकतात.

भारत-बांगलादेश संबध चांगले असणे आवश्यक !

भारत-बांगलादेश संबंधांवर महंमद तौहीद म्हणाले की, दोन्ही देशांमध्ये चांगले संबंध असले पाहिजेत. माझी भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांच्यासमवेत न्यूयॉर्क येथे बैठक झाली. यामध्ये दोन्ही देशांमधील कामकाजाविषयी चर्चा करण्यात आली. यात शेख हसीना यांच्या संदर्भात त्यांच्याशी कोणतीही चर्चा झाली नाही. दोन्ही देशांमध्ये व्यापार चालू आहे. काही व्यत्यय आला होता; मात्र आता दोन्ही देशांमधील व्यापाराला पुन्हा वेग आला आहे. दोन्ही देशांचे परस्पर हितसंबंध आहेत. तथापि भारतातील व्हिसा केंद्रे पूर्णपणे कार्यान्वित झालेली नाही; परंतु हा संपूर्णपणे भारत सरकारचा निर्णय आहे.

‘बांगलादेशातील आंदोलनामागे अमेरिका आहे’, असे म्हणणे चुकीचे !

माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी त्यांचे सरकार पाडण्याचा कट अमेरिकेने रचल्याचा आरोप केला होता. याविषयी महंमद तौहीद हुसेन यांना विचारले असता ते म्हणाले की, सत्ता परिवर्तनाला षड्यंत्र म्हणणे, म्हणजे तरुण पिढीच्या बलीदानाला हरताळ फासणे आहे. विद्यार्थी आणि इतर तरुण यांनी निरंकुश राजवटीला लोकशाही अन् सर्वसमावेशक बनवण्यासाठी प्राणांची आहुती दिली आहे. तरुण पिढीच्या बलीदानामुळेच सरकार पालटले आणि शेख हसीना यांना त्यागपत्र देऊन देश सोडून पळून जावे लागले. हे आकस्मिक आंदोलन होते.

संपादकीय भूमिका

जर आंदोलनाच्या वेळी ‘हिंदु’ म्हणून आक्रमणे झाले नसेल, तर त्यापूर्वी आणि आताही हिंदूंवर आक्रमणे का होत आहेत ? हिंदूंना दुर्गापूजा करण्यास का रोखले जात आहे ? देवतांच्या मूर्तींची तोडफोड का केली जात आहे ? ‘हिंदूंचे आम्ही संरक्षण करू, त्यांना हानीभरपाई देऊ’ अशी घोषणा सरकार का करत नाही ?