जगात कुणी देऊ शकले नाही, ते हिंदु धर्माने आम्हाला दिले आहे ! – प.पू. काडसिद्धेवर स्वामीजी
कणेरी मठ येथे महाराष्ट्रातील सहस्रो संत-महंत, धर्माचार्य यांचा २ दिवसांचा भव्य ‘संत समावेश’ कार्यक्रम !
कोल्हापूर – वातावरणीय प्रदेश किंवा देश विविध असूनही जीवनपद्धत मात्र एकच आहे; कारण आम्हाला ऋषिमुनींनी चिंतन मंथन करून दिलेल्या जीवनपद्धतीचे आपण अनुकरण, आचरण करत आलेलो आहोत. अशा वेळी आमच्या संस्कृतीवर काही आक्रमणे आणि अतिक्रमणे चालू आहेत. त्यांना रोखण्यासाठी जागृत अवस्थेत येण्याच्या दृष्टीने आपण येथे जमलेलो आहोत. आपल्या अध्यात्मशास्त्र आणि धर्मशास्त्र यांनी हवी तशी उपासना करण्याची मुभा दिली आहे. जगात कुणी देऊ शकले नाही, ते हिंदु धर्माने आम्हाला दिले आहे. आम्हाला देवीरूपाने, देवरूपाने, विष्णुरूपाने, शिवरूपाने, गणपतिरूपाने, सूर्यरूपाने, चंद्राच्या रूपाने उपासना करण्याची मुभा आहे, असे मार्गदर्शन प.पू. काडसिद्धेवर स्वामीजी यांनी केले. येथील श्रीक्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान, कणेरी मठ येथे महाराष्ट्रातील सहस्रो संत-महंत, धर्माचार्य यांचा २ दिवसांच्या भव्य ‘संत समावेश’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या उद़्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपिठावर राज्याचे उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत, आळंदी देवस्थानचे विश्वस्थ योगी निरंजननाथ, वारकरी संप्रदाय पाईक संघाचे संस्थापक ह.भ.प. देवव्रत (राणा) महाराज वासकर, १०८ प.पू. श्री महंत मठाधिपती श्री सुंदरगिरीजी महाराज, प.पू. चक्रवर्ती महाराज उपस्थित होते.
या वेळी ह.भ.प. देवव्रत (राणा) महाराज वासकर म्हणाले, ‘‘ज्ञानेश्वर महाराजांच्या कार्यकाळात ज्याप्रमाणे संतांची मांदियाळी जमली होती, त्याचप्रकारे आताही संतांची मांदियाळी जमली आहे. सरकारने आळंदी येथील संत ज्ञानेश्वर माऊली यांचे समाधी स्थळ, तसेच राज्यातील सर्व संतांची मंदिरे आणि त्यांची समाधी स्थळे यांच्या विकासासाठी निधी द्यावा. आषाढी वारी निघण्यापूर्वी तेथे उपस्थित असणारे पहिले मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे होत.’’
आळंदी देवस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ महाराज म्हणाले, ‘‘ज्याप्रमाणे पांडुरंगाच्या चरणी भेदभाव नाही, त्याप्रमाणे संतांच्याही ठायी कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसतो. ज्या कार्यक्रमांमध्ये संत सत्संगाचा लाभ मिळतो, त्या कार्यक्रमात आपण आवर्जून उपस्थित राहिले पाहिजे. पंढरपूरची आषाढी वारी ही जगातील सर्वांत मोठी पायी यात्रा असून ती महाराष्ट्रात होते. महाराष्ट्र ही संतांची भूमी असून ही देवभूमी आहे, याचा आपण सर्वांनी लाभ करून घेतला पाहिजे.’’
महाराष्ट्रात साधू-संतांचा अवमान कधीच होऊ देणार नाही, याची काळजी सरकार घेईल ! – उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत
काही राजकारणी जाणीवपूर्वक संतांना लक्ष्य करून बोलतात, हे महाराष्ट्राच्या संतभूमीत शोभनीय नाही. काही राजकारणी वारकर्यांवर टीका करतात. अशा राजकारण्यांवर जरब बसवण्याची वेळ आली आहे. आजपर्यंत माझे अनेक सन्मान झाले; मात्र गोमाता देऊन आणि संतांच्या उपस्थितीत झालेला सन्मान हा सर्वोच्च आहे, असे मला वाटते.
या संमेलनामध्ये सनातन संस्थेच्या सद़्गुरु स्वाती खाडयेे आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. संजय जोशी सहभागी झाले आहेत. |
संपादकीय भूमिकाहिंदूंनी संतांचे आज्ञापालन करण्यासह त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना खडसावणे, ही खरी धर्मसेवा ठरील ! |