विद्यार्थ्‍यांच्‍या गणवेशाच्‍या दर्जावरून शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची टीका !

रोहित पवार

मुंबई – राज्‍य सरकारकडून विद्यार्थ्‍यांना वाटण्‍यात आलेले काही गणवेश अयोग्‍य प्रकारे शिवलेले आहेत. त्‍यामुळे शरदचंद्र पवार राष्‍ट्रवादी काँग्रेस गटाचे नेते रोहित पवार यांनी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून ‘एक्‍स’वर टीका केली आहे. समवेत एक बाजू मोठी असलेला सदरा घातलेल्‍या एका विद्यार्थ्‍याचे छायाचित्र त्‍यांनी पोस्‍ट केले आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र

पूर्वी सभागृहामध्‍ये मुख्‍यमंत्र्यांनी रोहित पवार यांना गणवेश दाखवतांना ‘रोहित क्‍वालिटी (दर्जा) बघ’, असे म्‍हटले होते. आता गणवेशातील त्रुटी दाखवत रोहित पवार यांनी मुख्‍यमंत्र्यांवर ‘हीच का महायुती सरकारची क्‍वालिटी ?’ अशी टीका केली आहे.

गणवेश देण्‍याच्‍या नावाखाली गुजरातमधून कापड आणून दलाली खाऊन स्‍वतःचे खिसे भरून घेणार्‍या सरकारचा हिशोब करण्‍याची वेळ आता जवळ आली आहे, अशी टीकाही रोहित पवार यांनी केली.

१५ ऑगस्‍ट २०२४ पर्यंत ४५ लाख विद्यार्थ्‍यांना गणवेश देण्‍याची अंतिम मुदत असतांना सप्‍टेंबर संपला, तरी केवळ २४ लाख विद्यार्थ्‍यांना गणवेश दिले गेले आहेत. त्‍यामुळे ‘हपापाचा माल गपापा’ केल्‍याची ठाकरे गटाचे नेते टीका अंबादास दानवे यांनी केली आहे.