दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : जळगाव येथून तीर्थक्षेत्र योजनेला आरंभ !; अटल सेतूवरून एकाची आत्महत्या !
जळगाव येथून तीर्थक्षेत्र योजनेला आरंभ !
जळगाव – येथून ८०० वृद्ध हे शासनाच्या तीर्थयात्रा योजनेतून अयोद्धा येथे जाणार आहेत. १ ऑक्टोबर या दिवशी या योजनेच्या अंतर्गत तीर्थयात्रेला जाणार्या पहिल्या एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात येईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यात ऑनलाईन सहभागी होतील.
अटल सेतूवरून एकाची आत्महत्या !
मुंबई – अटल सेतूवरून एका ४० वर्षीय व्यक्तीने उडी मारून आत्महत्या केली. ३० सप्टेंबर या दिवशी सकाळी ही घटना उघडकीस आली. शिवडी पोलिसांना ही मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सध्या समुद्रात उडी मारून आत्महत्या केलेल्या व्यक्तीचा शोध चालू आहे. लाल रंगाच्या गाडीतून ती व्यक्ती आली आणि गाडी सेतूवर उभी करून तिने समुद्रात उडी घेतली.
संपादकीय भूमिका : विकासाचे नव्हे, तर आत्महत्येचे केंद्र बनत चाललेला सेतू !
रामनाथ (अलिबाग) येथील नाट्यगृहासाठी निधी संमत !
रामनाथ (अलिबाग) – २ वर्षापूर्वी लागलेल्या आगीत जळून भस्मसात झालेल्या अलिबागच्या पी.एन्.पी. नाट्यगृहाची दुरुस्ती आणि नूतनीकरण यांसाठी राज्य सरकारने तब्बल ९ कोटी ३२ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. २ वर्षांत नाट्यगृहाचे काम पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
बेकायदेशीररित्या गॅस सिलिंडर वापरणार्या धर्मांधावर गुन्हा नोंद !
जळगाव – घराच्या बाहेरील भागात बेकायदेशीररित्या घरगुती आणि व्यावसायिक वापरासाठीच्या गॅस सिलिंडरचा वापर केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचार्याला मिळाली. त्यानंतर सर्व साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी सादीक सिराज पिंजारी (वय ४१ वर्षे) यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला. त्याने एकूण ७३ गॅस सिलिंडर वापरले. अन्य मुद्देमालाची किंमत ५ लाख २९ सहस्र ६०० रुपये आहे.
संपादकीय भूमिका : नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कठोर कारवाईच करायला हवी !
कापूस-सोयाबीन अनुदानाचे वितरण !
मुंबई – वर्ष २०२३ मध्ये कापूस आणि सोयाबीन यांना अल्प दर प्राप्त झाल्यामुळे हानी झालेल्या ४९ लाख ५० सहस्र शेतकर्यांच्या खात्यात राज्यशासनाने अनुदान वितरीत केले. हेक्टरी ५ सहस्र रुपये अर्थसाहाय्य करण्यात आले. यासाठी २ सहस्र ३९८ कोटी ९३ लाख रुपये निधी वितरीत करण्यात आला.
३० सप्टेंबर या दिवशी मंत्रीमंडळाच्या बैठकीत कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते या ऑनलाईन वितरण प्रणालीची कळ दाबून अर्थसाहाय्य वितरणाला प्रारंभ करण्यात आला. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांसह अन्य मंत्री उपस्थित होते.