शाळेत मुसलमान मुली नसतांना इस्‍लामी सण साजरे करण्‍याचे शिक्षण देऊन काय करायचे ?

पुण्‍यातील हुजूरपागा शाळेत ईद साजरी करण्‍यात आली. याचे समर्थन करून ‘ईद साजरी केल्‍याने तुमचा हिंदु धर्म बुडतो का ?’, अशी विचारणा सामाजिक माध्‍यमांमधून अनेक धर्मनिरपेक्षतावादी करत आहेत. अशी विचारणा करणार्‍यांना सडेतोडे उत्तर….

जरा असा विचार करून पहाता येईल का ? हुजूरपागा शाळेत श्रावणातील हळदी- कुंकु, दहीहंडी, गणेशोत्‍सव, गरबा, मकरसंक्रांत, वारी इत्‍यादी सण साजरे होतात का ? होत नसतील, तर का होत नाहीत ? व्‍हायला हवेत; कारण ती आपली संस्‍कृती आहे. त्‍या शाळेत किती हिंदु मुली आहेत ? जवळ जवळ सगळ्‍याच. त्‍यामुळे हिंदु सण साजरे होणे आवश्‍यकच आहे. जर हे सण साजरे होत असतील, तर त्‍याची बातमी वृत्तपत्रात का येत नाही ? ईद साजरी केली आणि त्‍याची बातमी वृत्तपत्रात का दिली ? नक्‍की कशाची प्रसिद्धी करायची होती ? त्‍या शाळेत मुसलमान मुलीच नाहीत, तर मग त्‍यांना इस्‍लामी सण कसे साजरे करायचे, याचे शिक्षण देऊन काय करायचे ? त्‍यासाठी बॉलीवूडचे सिनेमे, वाहिन्‍यांवरील मालिका, ‘ओटीटी प्‍लॅटफॉर्म’ असे सगळे आहे.

हिंदु मुलांवर ईद, ख्रिसमस साजरा करण्‍याची सक्‍ती का ?

डॉ. अपर्णा लळिंगकर

मुसलमान शाळा आणि महाविद्यालय येथे हिंदु सण उत्‍साहाने साजरे केले जातात का ? जर हिंदु सण साजरे केले जात नसतील, तर त्‍याची बातमी वृत्तपत्रांमध्‍ये का येत नाही ? जरी हिंदु सण साजरे करत असतील, तर त्‍याचीही बातमी कधी वाचल्‍याचे आठवत नाही. हाच प्रश्‍न मला कॉन्‍व्‍हेंट शाळांविषयी विचारायचा आहे. तिथे मुलींच्‍या कपाळाला टिकली, गंध हेही लावू देत नाहीत; हातात बांगड्या घालू देत नाहीत कि हाताला मेंदी लावू देत नाहीत. मग हिंदु मुलांवर ईद, ख्रिसमस साजरा करण्‍याची सक्‍ती का ?

असे प्रश्‍न विचारायचे सोडून आज उलट विचारणा केली जात आहे की, हिंदु धर्म बुडतो का म्‍हणून ? कमाल आहे. कधी त्‍या मुसलमान आणि कॉन्‍व्‍हेंट्‌स शाळांना विचारा ना की, हिंदु सण, परंपरा त्‍यांच्‍या शाळांमध्‍ये घेतल्‍याने त्‍यांचा धर्म बुडतो का ?

– डॉ. अपर्णा लळिंगकर, पुणे. (२०.९.२०२४)