सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी जीवनातील कठीण प्रसंगांकडे साक्षीभावाने पहाता येण्यासाठी सांगितलेले प्रयत्न
१. रुग्णाईत आणि नकारात्मक स्थितीत असणार्या भावाला त्या स्थितीतून बाहेर येण्यासाठी साहाय्य करू शकत नसल्यामुळे साधिकेला असाहाय्य वाटणे
‘माझा भाऊ बरेच दिवस रुग्णाईत होता. त्यानंतर बराच काळ तो नकारात्मक स्थितीत असायचा. त्याची ती स्थिती पाहून मला पुष्कळ काळजी वाटायची. ‘त्याला या नकारात्मकतेतून बाहेर कसे काढायचे ?’, तेेच मला कळत नव्हते. आम्ही त्याला साधना करण्याविषयी सांगण्याचा प्रयत्न करत होतो; परंतु तो काही करण्याच्या मनःस्थितीत नव्हता. त्यामुळे मला असाहाय्य वाटत होते.
२. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी ‘भावाची चिंता न करता त्याच्याकडे साक्षीभावाने पहा आणि केवळ कर्तव्य करून सर्व गुरुदेवांच्या चरणी सोपव’, असे मार्गदर्शन करणे
देवाच्या कृपेने एकदा मला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा सत्संग लाभला. त्या वेळी त्या मला म्हणाल्या, ‘‘श्वेता, तू तुझ्या भावाची चिंता करू नकोस. त्याच्याकडे साक्षीभावाने पहाण्याचा प्रयत्न कर. आपण केवळ कर्तव्य करत रहायचे आणि बाकी सर्व आपल्या गुरुदेवांच्या चरणी सोपवायचे. तुझा भाऊ पूर्णपणे बरा होण्यास वेळ लागेल.’’ त्यांचे बोलणे ऐकून मला पुष्कळ हलके वाटले. त्यांचा संकल्प कार्यरत झाल्यामुळे ‘आता सर्व चांगलेच होईल’, याबद्दल मी आश्वस्त झाले. त्यांनी मला केलेल्या मार्गदर्शनाचे आज्ञापालन करण्यासाठी मी प.पू. गुरुदेवांना सतत प्रार्थना करत होते, ‘तुम्हीच मला साक्षीभावात कसे रहायचे ?’, ते शिकवा. त्यासाठी ‘मी काय प्रयत्न करू ?’ त्यानंतर जेव्हा जेव्हा माझ्या मनात भावाचे विचार येत होतेे, तेव्हा तेव्हा मी ते विचार प.पू. गुरुदेवांच्या पावन चरणी अर्पण करत होते.
३. ‘आपण काहीही करण्यास असमर्थ असल्यामुळे केवळ कर्तव्य करून उर्वरित वेळ साधना वाढवण्याकडे लक्ष द्यावे आणि साधना वाढली की, देवच काळजी घेतो’, असे एका साधिकेने सांगितल्यावर साक्षीभाव निर्माण होण्यासाठी करायच्या प्रयत्नांना दिशा मिळणे
एकदा मला एक साधिका भेटली. तिची मनःस्थितीसुद्धा माझ्यासारखीच होती. तिला तिच्या कुटुंबियांची काळजी वाटत होती. त्यावर मात करण्यासाठी तिला जो साधनेचा दृष्टीकोन दिला होता, तो तिने मला सांगितला, ‘साक्षीभावात रहाता यावे, यासाठी स्वतःचे कर्तव्य म्हणून कुटुंबियांची आवश्यक ती काळजी घ्यायची. उर्वरित वेळ केवळ स्वतःची सेवा आणि साधना वाढवण्याकडे लक्ष द्यायचे. आपण काहीही करण्यास असमर्थ आहोत. आपल्या हातात काही नाही. त्यामुळे आपली साधना वाढली की, देवच आपली काळजी घेतो.’ या दृष्टीकोनामुळे मला स्वतःत साक्षीभाव निर्माण होण्यासाठी करायच्या प्रयत्नांना एक दिशा मिळाली.
४. ‘परिस्थितीचा विचार न करता त्याकडे साक्षीभावाने पहात स्वतःची साधना वाढव’, असे प.पू. गुरुदेवांनी एका साधिकेला सांगणे
एकदा मला प.पू. गुरुदेवांचा सत्संग लाभला होता. त्या सत्संगात एका साधिकेने तिच्या आई-वडिलांबद्दल सांगितले, ‘‘सध्या माझे आई-वडील ज्या वास्तूत रहातात, तेथे पुष्कळ आध्यात्मिक त्रास आहे. त्या वास्तूत राहिल्यामुळे त्यांच्या त्रासात वाढ होत आहे. त्यामुळे मी त्यांना ती वास्तू सोडून गोव्यात येऊन रहाण्याविषयी अनेक वेळा सांगितले; परंतु ते त्यासाठी सिद्ध नाहीत. माझ्या मनात त्यांच्याबद्दल विचार येत असल्यामुळे मी अस्वस्थ असते.’ तेव्हा प.पू. गुरुदेव तिला म्हणाले, ‘‘या संपूर्ण परिस्थितीकडे तू साक्षीभावाने पहा. तू या गोष्टीचा विचार न करता केवळ तुझी साधना कर. त्यांच्या प्रारब्धानुसार सर्व घडणार आहे. या जन्मी ते तुझे आई-वडील आहेत. आतापर्यंत होऊन गेलेल्या अनेक जन्मांत ते तुझे आई-वडील नव्हते. त्यामुळे या जन्मी तू साधना कर. ‘त्यांना साधनेविषयी सांगणे’, हे तुझे कर्तव्य आहे. त्यांना ऐकायचे नसेल, तर सोडून द्यायचे. तू तुझी साधना वाढव.’’
५. ‘साक्षीभाव निर्माण होण्यासाठी कृतीच्या स्तरावर करायचे प्रयत्न म्हणजे मनात विचार येताक्षणी स्वतःला चिमटा काढणे’, असे प.पू. गुरुदेवांनी सांगणे
मी प.पू. गुरुदेवांना विचारले, ‘‘साक्षीभावात रहाता येण्यासाठी मी कसे प्रयत्न करायला हवेत ?’’ ते मला म्हणाले, ‘‘तुझ्या मनात जेव्हा तुझ्या भावाबद्दलचे विचार येतील, तेव्हा तू स्वतःला चिमटा काढल्यास ते विचार येणे थांबेल. अधिकाधिक सेवा करण्याचा प्रयत्न कर. काळजी करू नकोस. ८० टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्यावर साक्षीभाव निर्माण होतो. तोपर्यंत आपण प्रयत्न करत रहायचे. ‘स्वतःला चिमटा काढणे’, हा साक्षीभाव निर्माण करण्यासाठी कृतीच्या स्तरावरील प्रयत्न आहे.’’
६. ‘दादा कुंभार हे साक्षीभावाचे जिवंत उदाहरण आहेत’, असे प.पू. गुरुदेवांनी सांगणे
प.पू. गुरुदेव पुढे म्हणाले, ‘‘साक्षीभावात कसे रहायचे ?’, ते श्री. दादा कुंभार यांच्याकडून शिकू शकतो. ते सतत भगवंताच्या अनुसंधानात असतात. ते स्वतःच्या कुटुंबियांचा कधीच विचार करत नाहीत; कारण ‘प.पू. गुरुदेव त्या सर्वांची काळजी घेतात’, अशी त्यांची दृढ श्रद्धा आहे. दादा कुंभार यांच्या पत्नीने सांगितले, ‘‘मी त्यांना घरातील अडचणी किंवा मुलांच्या समस्या सांगण्यासाठी भ्रमणभाष करते. तेव्हा ते मला म्हणतात, ‘‘तू उगीच चिंता करतेस. प.पू. गुरुदेव सर्व गोष्टींची काळजी घेत आहेत’’, असे म्हणून ते लगेच भ्रमणभाष बंद करतात.’’ त्यानंतर प.पू. गुरुदेव म्हणाले, ‘‘दादा कुंभार हे साक्षीभावाचे जिवंत उदाहरण आहे.’’
‘जीवनातील कठीण प्रसंगातही स्थिर रहाण्यासाठी किंवा त्याकडे साक्षीभावाने पहाता येण्यासाठी कसे प्रयत्न करायला हवेत’, हे मला शिकवल्याबद्दल प.पू. गुरुदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत.’
– सौ. श्वेता क्लार्क, फोंडा, गोवा.
|