Maharashtra Declares Gomata As ‘RajyaMata’ : महाराष्‍ट्र शासनाची देशी गायींना ‘राज्‍यमाता-गोमाता’ म्‍हणून मान्‍यता !

महाराष्ट्रात देशी गायींना ‘राज्‍यमाता-गोमाता’ म्‍हणून मान्‍यता ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : महाराष्‍ट्र शासनाने देशी गायींना ‘राज्‍यमाता-गोमाता’ म्‍हणून घोषित करण्‍यास मान्‍यता दिली आहे. महाराष्‍ट्र शासनाने ३० सप्‍टेंबर या दिवशी याविषयीचा शासन आदेश काढला आहे.

महाराष्ट्रात देशी गायींना ‘राज्‍यमाता-गोमाता’ म्‍हणून मान्‍यता ! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

देशी गायींचे भारतीय संस्‍कृतीत वैदिक काळापासून असलेले स्‍थान, देशी गायींच्‍या दुधाची मानवी आहारातील उपयुक्‍तता, आयुर्वेद चिकित्‍सापद्धती, पंचगव्‍य उपचारपद्धती, तसेच गायींचे शेण आणि गोमूत्र यांचे सेंद्रिय शेतीमधील महत्त्वाचे स्‍थान विचारात घेऊन देशी गायींना ‘राज्‍यमाता-गोमाता’ घोषित करण्‍यात आल्‍याचे शासनाच्‍या आदेशात नमूद करण्‍यात आले आहे.

प्राचीन काळापासून मानवाच्‍या दैनंदिन जीवनामध्‍ये गायीचे अनन्‍यसाधारण महत्त्व आहे. वैदिक काळापासून गायीचे धार्मिक, वैज्ञानिक आणि आर्थिक महत्त्व विचारांत घेऊन त्‍यांना ‘कामधेनू’ असे संबोधण्‍यात येते. राज्‍यातील वेगवेगळ्‍या भागांत वेगवेगळ्‍या देशी जातींच्‍या गायी आढळतात. मराठवाड्यामध्‍ये ‘देवणी’, ‘लालकंधारी’, पश्‍चिम महाराष्‍ट्रात ‘खिल्लार’, उत्तर महाराष्‍ट्रात ‘डांगी’, तर विदर्भात ‘गवळाऊ’ या प्रकारच्‍या देशी गायी आढळतात. देशी गायीच्‍या दुधाचे मानवी आहारात पौष्‍टिकदृष्‍ट्या महत्त्व आहे. त्‍यामुळे गायीच्‍या दुधाला ‘पूर्णअन्‍न’ म्‍हटले जाते; परंतु दिवसेंदिवस देशी गायींच्‍या संख्‍येत मोठ्या प्रमाणात घट होत आहे. त्‍यामुळे पालनपोषणास प्रेरणा मिळावी, यासाठी देशी गायींना ‘राज्‍यमाता-गोमाता’ घोषित करण्‍यात येत असल्‍याचे शासनाच्‍या आदेशात नमूद करण्‍यात आले आहे.

महाराष्‍ट्र शासनाने काढलेला आदेश –

संपादकीय भूमिका

गायीला ‘राज्‍यमाता-गोमाता’ म्‍हणून घोषित करतांना गोहत्‍या रोखण्‍यासाठीही शासनाने कठोर पावले उचलावीत !