मंगळुरू येथील पू.(श्रीमती) राधा प्रभु (वय ८७ वर्षे) यांच्या नामजपादी उपायांच्या सत्रामध्ये नामजपाला बसल्यावर साधिकेला जाणवलेली सूत्रे
‘जुलै २०२४ च्या शेवटच्या सप्ताहात सनातनच्या ४४ व्या संत पू. (श्रीमती) राधा प्रभुआजी मंगळुरू, कर्नाटक येथून काही दिवसांसाठी रामनाथी, गोवा येथील आश्रमात आल्या होत्या. पू. आजी प्रतिदिन दुपारी आणि सायंकाळी १ घंटा साधकांसाठी नामजप करतात. त्या वेळी ‘त्यांच्या माध्यमातून मला पुष्कळ प्रमाणात चैतन्य मिळाले’, असे मला जाणवले आणि माझा उत्साह वाढला. या संदर्भात मला जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. पू. राधा प्रभुआजींनी दमदार पावले टाकत नामजपादी उपायांच्या खोलीत प्रवेश केल्यावर ‘एक रणरागिणी प्रवेश करत आहे’, असे जाणवणे
३१.७.२०२४ या दिवशी सायंकाळी ६ ते ७ या वेळेत मी पू. राधा प्रभुआजी यांच्या उपायांच्या सत्राला गेले होते. पू. प्रभुआजी नामजपादी उपायांच्या खोलीत येण्यापूर्वीच मी त्या खोलीत जाऊन बसले होते. ६ वाजता पू. राधा प्रभूआजींनी दमदार पावले टाकत नामजपादी उपायांच्या खोलीत प्रवेश केला. त्यांच्याकडे पहातांना ‘एक रणरागिणी प्रवेश करत आहे’, असे मला जाणवले. भगवान श्रीकृष्णाला प्रार्थना करून त्यांच्या नामजपादी उपायांच्या सत्राला आरंभ झाला.
२. ‘शरिरावरील त्रासदायक शक्तीचे सूक्ष्म आवरण कसे काढायचे ?’, हे साधकांना दाखवणे आणि त्यांच्याकडून तशी कृती करून घेणे
त्या वेळी काही साधक स्वतःच्या शरिरावरील त्रासदायक (काळ्या) शक्तीचे सूक्ष्म आवरण हाताने हळूवारपणे काढत होते. ते पाहून पू. राधा प्रभूआजींनी हातांची बोटे आवरणात घट्ट खुपसून हळूहळू आवरण खाली आणि पुढे ओढत शरिराच्या बाजूला ‘बोटे जोरात कशी झटकायची ?’, ते स्वतः दाखवले. त्यांनी साधकांकडून आवरण काढण्याची कृतीही करून घेतली.
३. न्यास करतांना ‘अंतर किती असायला हवे’, हे साधकांना दाखवून तशी कृती करून घेणे
नामजप करतांना ‘ज्या ठिकाणी न्यास (प्राणशक्तीवहन उपाय पद्धतीनुसार नामजप आणि स्थान शोधून न्यास करण्याची पद्धत) आले असतील, तेथे आपला तळहात शरिराला चिकटून न धरता त्या ठिकाणापासून १ – २ सें.मी. अंतरावर ‘तळहात कसे धरायचा ?’, हे पू. राधा प्रभुआजींनी दाखवले. त्या साधकांकडून तशी कृती करून घेऊ लागल्या.
४. ‘साधकांना त्रास देणार्या सूक्ष्मातील अनिष्ट शक्ती आणि पू. राधा प्रभुआजींकडून प्रक्षेपित होणारे चैतन्य’ यांच्यामध्ये सूक्ष्मातील युद्ध होऊन साधकांचा त्रास उणावणे
त्यानंतर ‘साधकांना त्रास देणार्या अनिष्ट शक्ती आणि पू. राधा प्रभुआजी यांच्याकडून प्रक्षेपित होणारे चैतन्य’ यांच्यामध्ये सूक्ष्मातील युद्धाला जोरदार आरंभ झाला. साधकांना जांभया, उचक्या आणि ढेकरा येऊन त्यांच्यातील त्रासदायक शक्ती न्यून होऊ लागली. थोड्या वेळानंतर, म्हणजे १० – १५ मिनिटांनी बहुतेक सर्व साधकांना येणार्या जांभया, उचक्या आणि ढेकरा येणे थांबले. सर्व साधक त्वेषाने नामजप करू लागले आणि ‘त्यांचे त्रास न्यून होत आहेत’, असे मला जाणवले.
५. पू. राधा प्रभुआजींनी साधकांकडून मारक स्वरूपात नामजप करून घेतल्यामुळे साधकांचा उत्साह वाढणे
काही साधक डोळे मिटून नामजप करत होते; कारण त्यांच्यावर अनिष्ट शक्तीचे त्रासदायक आवरण अधिक प्रमाणात होते. पू. राधा प्रभूआजी त्यांच्याकडे बोट दाखवायच्या आणि त्यांच्या शेजारच्या साधकाला त्यांना जागे करण्यास सांगायच्या. ‘आवरण जोराने कसे काढायचे ?’, ते दाखवून त्यांना त्वेषाने नामजप करण्यासाठी त्या प्रेरणा देत होत्या. नामजप मारक स्वरूपात करून घेतल्यामुळे साधकांमध्ये उत्साह वाढला.
६. उपायांच्या वेळी पू. प्रभुआजींची साधकांवरील प्रीती दिसून येणे आणि ‘त्या उत्तम गुरु आहेत’, असे वाटणे
पहिल्या रांगेतील एखादी आसंदी रिकामी झाल्यावर पू. राधा प्रभूआजी मागील रांगेतील साधकाला पुढे येऊन बसायला सांगत. ‘तो साधक नीट उपाय करत आहे कि नाही’, हे पाहून त्याला योग्य कृती करायला सांगत. पुढे येऊन बसलेल्या साधकाच्या डोेक्यावरील पंखा चालू असेल, तर त्या खुणेनेच त्याला विचारत, ‘तुम्हाला पंखा चालेल ना ?’ यावरून त्यांची साधकावरील प्रीती दिसून आली. जसा एक उत्तम वैद्य रुग्णाला केवळ चांगले औषध देऊन थांबत नाही, तर त्याला प्रेमाने औषध पाजून त्याचा आजारच बरा करतो. तशाच ‘पू. राधा प्रभुआजी या ‘उत्तम गुरु’ आहेत’, असे मला वाटले.
७. उपायांच्या वेळी मनाला पुष्कळ उत्साह जाणवणे
आम्ही सर्व साधक त्वेषाने नामजप करत असतांना ‘एक घंटा कसा निघून गेला’, हे आम्हाला कळलेच नाही. त्या वेळी माझ्या मनाला पुष्कळ उत्साह जाणवत होता आणि तो उत्साह बराच वेळ टिकून होता.
‘पू. राधा प्रभुआजींसारख्या संतांचे चैतन्य मला लाभत आहेत’, यासाठी मी त्यांच्या आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– आधुनिक वैद्या (सौ.) कस्तुरी भोसले (वय ६९ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.८.२०२४)
|