Tirupati Laddu Controversy : किमान देवाला राजकारणापासून दूर ठेवा !  

  • अन्‍वेषण चालू असतांना मुख्‍यमंत्र्यांनी प्रसारमाध्‍यमांना माहिती दिल्‍यावरून सर्वोच्‍च न्‍यायालयाची टीका

  • तिरुपती मंदिरातील लाडूंचे प्रकरण

नवी देहली – तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादाच्‍या लाडूंमध्‍ये प्राण्‍यांची चरबी असलेले तूप वापरण्‍यात आल्‍याच्‍या प्रकरणी सर्वोच्‍च न्‍यायालयात ४ याचिका प्रविष्‍ट (दाखल) करण्‍यात आल्‍या आहेत. लाडूंची न्‍यायालयाच्‍या देखरेखीखाली चौकशी करण्‍याची मागणी याचिकांमध्‍ये करण्‍यात आली आहे. या वेळी भाजपचे नेते डॉ. सुब्रह्मण्‍यम् स्‍वामी यांच्‍या वतीने ज्‍येष्‍ठ अधिवक्‍ता राजशेखर राव न्‍यायालयात म्‍हणाले की, मी भक्‍त म्‍हणून न्‍यायालयात उपस्‍थित झालो आहे. प्रसादाच्‍या भेसळीवर प्रसारमाध्‍यमांमध्‍ये दिलेल्‍या वक्‍तव्‍याचा मोठा परिणाम होऊ शकतो. यामुळे अनेक प्रश्‍न निर्माण होतील आणि धार्मिक सलोखा बिघडू शकतो. तो चिंतेचा विषय आहे. देवाच्‍या प्रसादावर काही प्रश्‍नचिन्‍ह असेल, तर त्‍याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली.

यावर न्‍यायालयाने म्‍हटले की, जेव्‍हा स्‍वतः मुख्‍यमंत्र्यांनी प्रसादामध्‍ये प्राण्‍यांची चरबी असल्‍याचे अन्‍वेषण विशेष अन्‍वेषण पथकाकडे दिले होते, तर त्‍यांना त्‍याचा अहवाल येण्‍याआधी प्रसारमाध्‍यमांसमोर जाण्‍याची काय आवश्‍यकता होती ? निदान देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा, अशा शब्‍दांत टीका केली. याचिकाकर्त्‍यांमध्‍ये डॉ. सुब्रह्मण्‍यम् स्‍वामी, वाय.व्‍ही. सुब्‍बा रेड्डी, विक्रम संपत आणि दुष्‍यंत श्रीधर आहेत.