X In Delhi High Court : हिंदुद्वेष पसरवणार्या ‘हिंदुत्व वॉच’ खात्यावरील कारवाई म्हणे ‘अयोग्य’ !
‘एक्स’चे हिंदुद्वेषी फुत्कार !
नवी देहली – काश्मिरी पत्रकार रकीब हमीद यांनी चालवलेले ‘हिंदुत्व वॉच’ (@HindutvaWatchIn) नावाचे ‘एक्स’ खाते बंद करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय अयोग्य होता, असा थयथयाट ‘एक्स’ने देहली उच्च न्यायालयात केला. हमीद यांनी त्यांच्या हिंदुद्वेष्ट्या ‘हिंदुत्व वॉच’च्या खात्यावरील कारवाईला न्यायालयात आव्हान दिले होते. त्या वेळी एक्स आस्थापनाने त्याचा जबाब नोंदवला. आस्थापनाने पुढे म्हटले की, जर न्यायालयाने आदेश दिला, तर तो ‘हिंदुत्व वॉच’ खाते पुनर्स्थापित करण्यास सिद्ध आहे. तथापि एक्सने हेही स्पष्ट केले आहे की, ‘एक्स’विरुद्ध रकीब हमीद यांची याचिका कायम ठेवण्यायोग्य नाही; कारण एक्स व्यासपीठ केवळ मध्यस्थ आहे आणि राज्यघटनेच्या कलम १२ अंतर्गत ‘राज्या’चा भाग नाही.
१. ‘एक्स’ने संपूर्ण दोष सरकारवर टाकून, सरकारचा निर्णय हा ‘माहिती तंत्रज्ञान कायद्या’च्या कलम ६९ अ च्या विरोधात आहे, अवास्तव आहे आणि घटनेच्या कलम १९ (२) अंतर्गत विहित केलेल्या मर्यादा ओलांडणारा आहे, असा दावा केला.
२. ‘एक्स’ने सांगितले की, जानेवारी २०२४ मध्ये भारतीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने एक नोटीस जारी केली होती. त्यात अनेक सामाजिक माध्यमांवरील खात्यांचा समावेश होता, ज्यांना सरकारला ‘ब्लॉक’ करायचे होते. या सर्व खात्यांवरून हिंसाचार भडकावण्याची आणि सार्वजनिक कायद्याला बाधा पोचण्याची शक्यता होती, असा दावा केंद्रशासनाने केला होता.
३. आता या प्रकरणी पुढील सुनावणी ३ ऑक्टोबरला होणार आहे.
४. रकीब हमीद यांनी दावा केला आहे की, भारतातील अल्पसंख्यांकांवरील अत्याचारांच्या अहवालांचा अभ्यास करण्यासाठीच त्यांचे खाते कार्यरत होते. प्रत्यक्षात मात्र त्या खात्याद्वारे हिंदूंविरुद्ध द्वेष पसरवण्यात येत होता.
संपादकीय भूमिकाएक्सने मांडलेल्या या हिंदुद्वेष्ट्या भूमिकेतून असे म्हणण्याला वाव आहे की, प्रखर राष्ट्रनिष्ठांची बाजू उचलून धरण्याचा दावा करणार्या ‘एक्स’चे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे ! |