श्रीक्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान येथे ‘संत समावेश’ कार्यक्रम !
कोल्हापूर – येथील श्रीक्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान, कणेरी मठ येथे महाराष्ट्रातील सहस्रो संत-महंत, धर्माचार्य यांचा २ दिवसीय भव्य ‘संत समावेश’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ३० सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर २०२४ या दिवशी होणार्या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील सर्व संप्रदायांतील संत उपस्थित असणार आहेत. अध्यात्म क्षेत्रातील मान्यवरांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्य उपस्थित रहाणार आहेत.
या २ दिवसीय ‘संत समावेश’ या कार्यक्रमात एकूण आठ सत्रे होणार असून त्यात प्रामुख्याने समाजप्रबोधन, राष्ट्ररक्षण, राष्ट्र उन्नती, समाज उन्नती, धर्मरक्षण आदी विषयांवर सकारात्मक विचार मंथन होणार आहे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांतील विखुरलेल्या सर्व संप्रदायांच्या घटकांना एकत्रित करून समाजासाठी अमूल्य योगदान देण्यासाठी ही शक्ती प्रवृत्त करणे आणि मंथन-कृतीतून देश पुन्हा विश्वगुरु स्तरावर नेण्यासाठी पाऊल टाकणे, हा या संत समावेशामागचा उद्देश आहे, अशी माहिती ‘श्रीक्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान’चे विश्वस्त उदय सावंत यांनी दिली.