उतारवयातही अध्यात्मप्रसाराची सेवा तळमळीने करणार्या फोंडा (गोवा) येथील (कै.) श्रीमती शकुंतला डुंबरे (वय ८५ वर्षे) !
१९.९.२०२४ या दिवशी फोंडा (गोवा) येथील श्रीमती शकुंतला डुंबरे (वय ८५ वर्षे) यांचे निधन झाले. ३०.९.२०२४ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा १२ वा दिवस आहे. त्यानिमित्त साधकाला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. ‘श्रीमती शकुंतला डुंबरेआजी वयाच्या ८५ व्या वर्षापर्यंत स्वतःची कामे स्वतःच करायच्या.
२. सतत कार्यरत असणे
त्या सतत काही ना काही सेवा करत रहायच्या. ‘आपला वेळ वाया जायला नको’, असे त्यांना वाटायचे. त्या घर आणि परिसर यांची स्वच्छता करायच्या.
३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी गोव्यातील अध्यात्मप्रसाराचे कार्य डुंबरेआजींच्या घरापासून चालू करणे
गोव्यातील अध्यात्मप्रसाराचे कार्य आरंभ करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले डुंबरेआजींच्या घरी येऊन सत्संगाचे नियोजन करायचे. त्यामुळे आजींकडे पुष्कळ साधकांची ये-जा असायची. साधकांचा अल्पाहार आणि महाप्रसाद यांची सोय आजी त्यांच्या घरीच करायच्या. साधक भेटल्यावर आजींना पुष्कळ आनंद व्हायचा.
४. सेवेची तळमळ
आजींनी ‘सनातन पंचांगां’चे वितरण करणे, प्रवचन करणे, बालसंस्कारवर्ग आणि सत्संग घेणे’, अशा सेवा केल्या. त्यांची गुरुकार्याबद्दलची तळमळ आणि ध्यास शिकण्यासारखा आहे.
५. ‘सर्वांनी साधना करावी’, अशी तळमळ असणे
त्यांनी त्यांच्या कुटुंबियांना साधनेचे धडे दिले. आजी त्यांच्या संपर्कात येणार्या प्रत्येक व्यक्तीला गुरुकार्याविषयी माहिती सांगायच्या. आजींच्या इच्छाशक्तीचे कौतुक करावे, तितके थोडेच आहे.
६. श्रद्धा
‘आमचे नवीन घर गुरूंच्या कृपेमुळे बांधून पूर्ण झाले. गुरूंची आमच्या कुटुंबावर सतत कृपादृष्टी असते. गुरुच कुटुंबियांना वेळोवेळी संकटांतून सोडवत असतात आणि त्यांचे रक्षण करतात’, अशी आजींची श्रद्धा होती.
‘आजींना सद्गती प्राप्त होऊन त्यांचा पुढचा मार्ग सुखकर होवो’, अशी मी श्री गुरूंच्या चरणी प्रार्थना करतो.’
– श्री. श्रीराम खेडेकर (वय ७१ वर्षे), कवळे, फोंडा, गोवा. (२६.९.२०२४)
साधनेची तळमळ असणार्या श्रीमती शकुंतला डुंबरे !‘श्रीमती शकुंतला डुंबरे (वय ८५ वर्षे) यांचे १९.९.२०२४ या दिवशी दुःखद निधन झाले. त्यांच्यामुळेच आम्ही कुटुंबीय सनातन संस्थेशी जोडले गेलो आणि साधना करू लागलो. त्यांची ‘सर्वांनी साधना करावी’, अशी तळमळ होती. त्यांच्याकडून शिकण्यासारखे पुष्कळ होते. त्यांचा सेवा आणि त्याग हा पुष्कळ होता. गेल्या काही दिवसांत त्यांनी स्वतःला पालटण्याचे पुष्कळ प्रयत्न केले. जवळ सतत नामजप लावलेला असायचा. त्यांना त्रास झाल्यावर त्या दायित्व असलेल्या साधिकांना विचारून घ्यायच्या. मृत्यूसमयी त्यांचा चेहरा आनंदी वाटत होता. ‘डोळ्यांच्या पापण्या हालत आहेत’, असे वाटत होते आणि वातावरणात शांतता जाणवत होती. अंतिम समयी त्या म्हणायच्या, ‘‘मला सनातनच्या आश्रमात जायचे आहे. तिथे पुष्कळ सेवा आहे.’’ – सौ. मीना यशवंत शिंदे (भावजय)(वय ६८ वर्षे), फोंडा, गोवा. (१९.९.२०२४) |
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |