काणकोण बाजार बंद करण्यामध्ये संघटनेचा सहभाग नाही, संघटनेच्या विरोधात काही जणांकडून अपप्रचार
|
काणकोण, २९ सप्टेंबर (वार्ता.) – काणकोण येथे जुलूस काढण्यास विरोध दर्शवण्यासाठी हिंदवी स्वराज्य संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या आंदोलनात मी ‘शनिवारी काणकोण येथे होणारा साप्ताहिक बाजार आम्हाला नको’, असे विधान केले होते आणि त्याला तेथे उपस्थित असलेल्यांनी होकार दर्शवला होता. त्यानंतर शनिवार, २८ सप्टेंबर या दिवशी शनिवारचा काणकोण येथील साप्ताहिक बाजार बंद होता. वास्तविक या बाजार बंदला आमच्या संघटनेचा पाठिंबा नव्हता. गैरमार्गाने बलपूर्वक बाजार बंद करणे, हे आमचे संस्कार नव्हेत आणि ‘हिंदवी स्वराज्य संघटना’ काणकोण नगरपालिकेशी चर्चा करून कायदेशीर पद्धतीनेच सविस्तर निवेदन देऊन सर्व कृती करणार आहे; मात्र काणकोण येथे जुलूस पाहिजे म्हणणारे आणि बेळगाव, हुब्बळ्ळी येथून काणकोण येथे येऊन व्यवसाय करणारे यांनी बाजार बंद करण्यास विक्रेत्यांना प्रोत्साहन दिले आणि ‘हिंदवी स्वराज्य संघटने’ने साप्ताहिक बाजार बंद केला’, असा अपप्रचार चालवला, असा खुलासा ‘हिंदवी स्वराज्य संघटने’चे पदाधिकारी श्री. सम्राट भगत यांनी काणकोण येथे २९ सप्टेंबर या दिवशी आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत केला.
या पत्रकार परिषदेला श्रीस्थळ पंचायतीचे माजी सरपंच सर्वश्री प्रशांत देसाई, ‘हिंदवी स्वराज्य संघटने’चे अध्यक्ष दिलखुश शेट देसाई, ‘भारत माता की जय’ संघटनेचे पदाधिकारी तथा लोलये येथील श्री दामोदर विद्यालयाचे मुख्याध्यापक जितेंद्र आमशेकर, श्री विठ्ठल-रखुमाई मंदिराचे माजी अध्यक्ष तथा ‘सागरी सीमा’ या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मंचाचे प्रमुख आदींची उपस्थिती होती.
पत्रकार परिषदेत श्री. सम्राट भगत पुढे म्हणाले, ‘‘काणकोण येथील जुलूस काढण्यास इच्छुक असलेल्यांनी काणकोण येथील मशीद ते कबरस्तान येथपर्यंत २०० मीटर अंतरात मिरवणूक काढण्याचा प्रस्ताव फेटाळला आणि काणकोण परिसरात जुलूस काढण्यासाठी अर्ज केला. वास्तविक मुसलमानांच्या धार्मिक विधीला आमचा विरोध नाही; मात्र धर्म रस्त्यावर आणून काणकोण येथे अशांती पसरवण्याला आमचा विरोध आहे. काणकोण येथे अनेक ठिकाणी देवाच्या वाटा आहेत. २ मास अभ्यास केल्यानंतर मी जाणीवपूर्वक हे विधान करत आहे. काणकोण येथे चांगल्या विचारांच्या लोकांनी येऊन व्यवसाय करावा.’’
योग्य प्रत्युत्तर देण्यास सिद्ध राहिले पाहिजे ! – मुख्याध्यापक जितेंद्र आमशेकर
पत्रकार परिषदेत मुख्याध्यापक जितेंद्र आमशेकर म्हणाले, ‘‘बांगलादेश येथे सत्तांतर झाल्यानंतर तेथे निरपराध हिंदूंचे शिरकाण झाले. भारत आणि पाक फाळणीच्या वेळी हिंदु माताभगिनींना कापले गेले. हा इतिहास आहे. बांगलादेश येथील घटनांवरून उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणतात, ‘बटोगे तो कटोगे’ (हिंदू विभागले गेले, तर ते कापले जाणार) आणि याचा अनुभव आम्ही घेत असतो. गोव्याच्या राज्यपालांनी हल्लीच हिंदूंची लोकसंख्या घटणे आणि मुसलमानांची लोकसंख्या वाढणे, ही चिंतेची गोष्ट असल्याचे विधान केले आहे. आम्ही ‘शस्त्रे घेऊन लढाई करायला जा’, असे म्हणत नाही; मात्र आम्हाला डिवचले, तर त्याला आम्ही योग्य प्रत्युत्तर देऊ. काणकोणवासियांनी आज सतर्क रहाण्याची आवश्यकता आहे.’’
काणकोण येथील हिंदु बांधवांनी संघटित होऊन चळवळीला पाठिंबा द्यावा ! – श्री. प्रशांत देसाई, माजी सरपंच, श्रीस्थळ पंचायत
श्रीस्थळ पंचायतीचे माजी सरपंच श्री. प्रशांत देसाई म्हणाले, ‘‘आम्ही कुणाच्याही धार्मिक भावना दुखावलेल्या नाहीत. काणकोण येथील हिंदूंनी तेथील मशीद किंवा कबरस्तान उभारणीला कधीही विरोध केलेला नाही. आम्ही सणासाठी एकमेकांकडे ये-जा करत असतो. काणकोण येथील परंपरा नसलेला जुलूस काढण्यास आमचा विरोध आहे. दिवजा, शिमगोत्सव ही काणकोण येथील परंपरा आहे. काणकोण येथील सर्व देवस्थानांनी या चळवळीला पाठिंबा द्यावा आणि याला पाठिंबा असलेला ठराव घेऊन तो सरकार दरबारी पाठवावा. काणकोण येथील हिंदु बांधवांनी संघटित होऊन चळवळीला पाठिंबा द्यावा. आज १० मुसलमान रहात असलेल्या ठिकाणी एखादा हिंदु गुण्यागोविंदाने राहू शकत नाही आणि हे आम्ही पहात आहोत. गोव्यातील काही राजकारणी मतपेढ्यांवर डोळा ठेवून अशा प्रवृत्तीला पाठिंबा देत आहेत आणि हे पुढे सर्वांना महागात पडणार आहे.
जुलूसविरोधी चळवळ पुढे नेण्यासाठी काणकोण येथे २ ऑक्टोबरला बैठकश्री. दिलखुश देसाई म्हणाले, ‘‘काणकोण येथील जुलूसविरोधी चळवळ पुढे नेण्यासंबंधी विचारविनिमय करण्यासाठी पाटणे, काणकोण येथील श्री देवकीपुरुष देवस्थान येथे २ ऑक्टोबरला सायंकाळी ५ वाजता एका बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीला काणकोण येथील नागरिक, तसेच देवस्थान, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि समाज मंडळे यांचे पदाधिकारी, काणकोण नगरपालिकेचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक, काणकोण परिसरातील सरपंच आणि पंचसदस्य आदींनी उपस्थिती लावून ही चळवळ पुढे नेण्यासाठी दिशादर्शन करावे. मल्लिकार्जुन महालात जुलूस काढण्यास आमचा सदैव कठोर विरोध रहाणार आहे.’’ श्री. अशोक धुरी यांनी पत्रकार परिषदेत हिंदवी स्वराज्य संघटनेने उभारलेल्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे म्हटले. |
सार्वजनिक कार्यक्रमाला अनुज्ञप्ती देणे किंवा न देणे, हे स्थानिक परिस्थितीवर अवलंबून ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
काणकोण येथे जुलूसला पोलिसांनी अनुज्ञप्ती नाकारल्याचे प्रकरण
पणजी – पोलीस सार्वजनिक मिरवणूक किंवा कार्यक्रम यांना अनुज्ञप्ती देणे किंवा न देणे, हे स्थानिक परिस्थितीवरून ठरवत असतात. जुलूस किंवा अन्य कोणताही कार्यक्रम असू दे, त्या कार्यक्रमाच्या वेळी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहाणार कि नाही हे पाहून निर्णय घेतले जातात. पोलीस महासंचालक आणि पोलीस निरीक्षक परिस्थितीनुरूप योग्य निर्णय घेत असतात, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. काणकोण येथील उपजिल्हाधिकार्यांनी हिंदु संघटनांनी विरोध केल्यानंतर काणकोण येथे जुलूस काढण्यास अनुज्ञप्ती नाकारल्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उत्तर देत होते.
(म्हणे) काणकोण येथील घटनेची गोव्यात इतरत्र पुनरावृत्ती होऊ नये ! – मुसलमान संघटनामुसलमान संघटनांकडून म्हापसा आणि डिचोली पोलिसांना निवेदने सादरपणजी – काणकोण येथे जुलूस काढण्यास शासनाने अनुज्ञप्ती नाकारल्याच्या पार्श्वभूमीवर मुसलमानांच्या गटांनी याची गोव्यात इतरत्र पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी म्हापसा आणि डिचोली पोलिसांना निवेदने सादर केली आहेत. संपादकीय भूमिका : बांगलादेशातील हिंदूंसारखी परिस्थिती गोव्यातील हिंदूंची होऊ नये, यासाठीही मुसलमानांनी प्रयत्न करावेत ! |
काणकोण मशीद समितीच्या वतीने कथित द्वेषमुलक वक्तव्ये करणार्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार
काणकोण – काणकोण येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आंदोलनाच्या वेळी द्वेषमुलक वक्तव्ये केल्याचा आरोप करून त्यांच्या विरोधात २९ सप्टेंबर या दिवशी काणकोण पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. काणकोण मशीद समितीने अखिल गोवा मुसलमान जमात संघटनेच्या पदाधिकार्यांसमवेत काणकोण पोलिसांत जाऊन ही तक्रार नोंदवली.