‘देव साधकांवर दैवी कणांचा वर्षाव कधी करतो ?’, याविषयी लक्षात आलेली सूत्रे
१. साधकांवर होणार्या दैवी कणांच्या वर्षावासंदर्भात साधकाला प्रश्न पडणे
‘साधकांना स्वतःच्या शरिरावर अकस्मात् सोनेरी, चंदेरी, मोरपिशी अशा विविध रंगांचे दैवी कण दिसतात. वर्ष २०२४ च्या मेमध्ये माझ्या मनात प्रश्न आला, ‘देव साधकांवर दैवी कणांचा वर्षाव कधी करत असेल ?’ त्यानंतर ४ – ५ दिवसांतच दैवी कणांच्या संदर्भात काही प्रसंग घडले.
२. दैवी कणांच्या संदर्भात घडलेले विविध प्रसंग
अ. एके दिवशी एका साधकाने आश्रमात प्रसाद बनवण्याची सेवा भावपूर्ण केली होती. त्याविषयी तो साधक माझ्याशी बोलत होता. तेव्हा त्याच्या तोंडवळ्यावर चंदेरी रंगाचे २ दैवी कण मला दिसले.
आ. १ – २ दिवसांनी माझा नामजप चालू असतांना मला माझ्या उजव्या पायाच्या अंगठ्याच्या खालच्या भागावर मोरपिशी रंगाचा एक दैवी कण दिसला.
इ. पुढे १ – २ दिवसांनी मी एका साधिकेसमवेत नामस्मरणाविषयी चर्चा करत होतो. तेव्हा ती साधिका मला म्हणाली, ‘‘आता तुमच्या तोंडवळ्यावर चंदेरी रंगाचा एक दैवी कण दिसत आहे.’’
३. भगवंताने प्रसंगांच्या माध्यमातून दैवी कणांविषयी सुचवलेले उत्तर
या प्रसंगांनंतर माझ्या लक्षात आले, ‘साधकाने भावपूर्ण सेवा केली, नामजप केला किंवा नामजपाविषयी, म्हणजेच भगवंताविषयी चर्चा केली की, देव प्रसन्न होतो आणि आशीर्वादस्वरूप तो साधकांवर दैवी कणांचा वर्षाव करतो.
४. कृतज्ञता
‘साधकांवर दैवी कणांचा वर्षाव कधी होतो ?’, हे देवाने विविध प्रसंगांद्वारे माझ्या लक्षात आणून दिले. याविषयी मी त्याच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.५.२०२४)
दैवी कण स्वतःच्या पायावर दिसताच साधकाची झालेली विचारप्रक्रिया !
‘वर्ष २०२४ च्या मेमध्ये एकदा माझा नामजप चालू असतांना मला माझ्या उजव्या पायाच्या अंगठ्याच्या मुळाशी मोरपिशी रंगाचा एक दैवी कण दिसला. तेव्हा माझ्या मनात विचार आले, ‘सर्वसाधारणपणे व्यक्ती कमरेखालील बाजू क्षुद्र समजतात, तसेच जेव्हा दैवी कण मला माझ्या पायावर दिसला, तेव्हा माझे पाय फारसे स्वच्छही नव्हते. अशा स्थितीत मला माझ्या पायावर दैवी कण मिळाला. दैवी कण म्हणजे देवाचे शुद्ध स्वरूप असते; परंतु शरिराच्या ज्या भागावर आध्यात्मिक उपाय होणे आवश्यक असते, तेथे दैवी कण मिळतो. यावरून ‘भगवंताला दयाघन आणि कृपाळू का म्हणतात ?’, हे माझ्या लक्षात आले आणि त्याच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.’
– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.५.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |