पिंपरी-चिंचवड महापालिकेला पी.एम्.आर्.डी.ए. कार्यक्षेत्रात पाणीपुरवठा करणे शक्य नाही !
महापालिका आयुक्त शेखर सिंह यांचे पत्र
पिंपरी (पुणे) – पिंपरी-चिंचवड शहराला २५ नोव्हेंबर २०१९ पासून एकदिवसआड पाणीपुरवठा केला जातो. शहराची लोकसंख्या वाढीचा दरही अधिक आहे. सध्या पाणीपुरवठा व्यवस्थेवर मोठा ताण येत असून पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा करणे महापालिकेस कठीण होत आहे. अशा स्थितीत ‘पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण’ (पी.एम्.आर्.डी.ए.) कार्यक्षेत्रांमध्ये पाणीपुरवठा करणे महापालिकेला शक्य होणार नसल्याचे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी पी.एम्.आर्.डी.ए.ला पत्राद्वारे कळवले आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्यावरून वाद होण्याची शक्यता आहे.
प्राधिकरणाच्या हद्दीतील ५ किलोमीटर परिघाच्या क्षेत्रातील ग्रामीण भागांना पाणीपुरवठा करण्याचे महापालिका, नगरपालिका आणि जल जीवन प्राधिकरणावर दायित्व येते. असा शासन निर्णय आहे. त्यानुसार पी.एम्.आर्.डी.ए.चे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी महापालिका आयुक्तांना २ सप्टेंबर या दिवशी पाणीपुरवठा करण्यासाठी पत्रव्यवहार केला होता.
पिंपरी-चिंचवड शहराला पवना धरणातून ५१०, आंद्रातून ८० आणि एम्.आय.डी.सी.कडून २० असे ६१० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. हे पाणी अपुरे पडते. भामा आसखेड प्रकल्प, पवना थेट जलवाहिनी प्रकल्पाचे काम प्रलंबित आहे. पुरेसे पाणी उपलब्ध होण्यासाठी ४ वर्षे लागतील, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.
संपादकीय भूमिकापाणीपुरवठा करणे शक्य नाही, असे सांगणे हे महापालिका प्रशासनाचे अपयशच म्हणावे लागेल ! |