‘एखाद्या सेवेविषयी काही ठाऊक नसतांना साधकांनी सेवेतील कौशल्य अल्प कालावधीत आत्मसात् करणे’, ही विष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांची साधकांवरील कृपा !
१. गादी बनवण्याविषयी काही ठाऊक नसतांना साधकांनी अल्प कालावधीत गादी बनवण्याचे शिकून घेणे आणि त्यातील कौशल्य आत्मसात् करणे
‘१७.३.२०२२ या दिवशी मला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा सत्संग लाभला. त्या सत्संगात गादी बनवण्याची कला नुकतेच शिकलेले साधक उपस्थित होते. त्या साधकांनी सांगितले, ‘‘गादी बनवण्याचे प्रशिक्षण देणारा एकच साधक होता.’’ गादी बनवण्याचे प्रशिक्षण देणार्या साधकाने सांगितले, ‘‘साधकांना गादी बनवण्याचा पूर्वानुभव नसूनही ते केवळ ४ दिवसांत गादी बनवायला शिकले. साधक केवळ गादी बनवण्यास शिकले नाहीत, तर त्यांनी गादी बनवण्यातील कौशल्य आत्मसात् केले. प्रत्यक्षात गादी बनवण्याची सेवा शिकण्यासाठी ६ मास लागतात.’’
२. साधिकेचे झालेले चिंतन
अ. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘श्रीकृष्णाने गुरुगृही राहून ६४ दिवसांत ६४ कला आणि १४ विद्या यांचे ज्ञान कसे आत्मसात् केले असेल ! आपले गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) विष्णुस्वरूप असल्याने त्यांनी साधकांमध्ये ते तत्त्व प्रक्षेपित केले आहे. त्यामुळे अवघड असणार्या सेवा साधकांकडून अल्प कालावधीत आत्मसात् केल्या जातात.’ (‘महर्षींनी नाडीपट्टीत ‘परात्पर गुरु डॉ. आठवले श्रीविष्णूचे अंशावतार आहेत’, असे सांगितले आहे.’- संकलक)
आ. ‘साधक परिपूर्ण होण्यासाठी गुरुदेवांची किती तळमळ आहे ! ते विष्णुस्वरूप आहेत !’, याची पुन्हा एकदा प्रचीती आली.
इ. हे सर्व शिकवणारे गुरुदेव आहेत आणि जिथे आपण शिकतो, तो सनातनचा रामनाथी आश्रम, म्हणजे कल्पवृक्ष आहे. कल्पवृक्षाच्या सावलीत बसून साधक जी कामना करतात, ती पूर्णत्वास जाते; म्हणून आपणही कल्पवृक्षाखाली बसून गुरुदेवांना प्रार्थना करूया, ‘आम्हाला अखंड आपली सेवा करता येऊ दे. आमचा भाव आणि भक्ती आपल्या चरणी अक्षय राहू दे.’
– सौ. निवेदिता जोशी (वर्ष २०२४ मधील आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ५२ वर्षे), नंदुरबार (१८.३.२०२२)