रस्त्यांवरील अपघातांना उत्तरदायी कोण ?

सध्या गोव्यामध्ये रस्त्यांवर होणार्‍या अपघातांचे प्रमाण पुष्कळ प्रमाणात वाढले आहे. (असेच अपघातांचे प्रमाण अन्य राज्यांमध्येही वाढले आहे.) त्यामुळे रस्त्यावर होणारे अपघात ही गोवा राज्याच्या दृष्टीने गंभीर समस्या बनली आहे. हे अपघात घडण्याला उत्तरदायी कोण ? आणि या समस्येवर कोणती उपाययोजना करता येईल ? याविषयी सरकार, प्रशासन आणि नागरिक यांनी चिंतन करणे आवश्यक आहे.

रस्त्यावरील खड्ड्यांविषयीचे प्रातिनिधिक छायाचित्र

१. वर्ष २०२४ मध्ये झालेल्या गोव्यातील अपघातांची आकडेवारी

श्री. नारायण नाडकर्णी

शासकीय आकडेवारीनुसार गोवा राज्यात जानेवारी २०२४ पासून आतापर्यंत अनुमाने १ सहस्र ८२४ अपघात झाले आहेत. यांपैकी १८८ अपघात जीवघेणे ठरले आहेत. या अपघातांमध्ये २०० जणांनी प्राण गमावला असून १८७ जण गंभीररित्या घायाळ झाले आणि ५६६ जणांना किरकोळ दुखापत झाली. गोव्यात सध्या प्रतिदिन सरासरी ७ अपघात होतात, तर प्रत्येक ३१ घंट्यांमध्ये एकाचा अपघाती मृत्यू होतो. गेल्या काही दिवसांत झालेल्या विविध अपघातांमध्ये ७ जणांचा मृत्यू झाल्याने रस्त्यांवरील अपघात हा चर्चेचा विषय बनला आहे. गोव्यात होणार्‍या अपघातांचे प्रमाण पहाता यावर सरकार, प्रशासन आणि नागरिक या सर्वांनी गंभीरपणे विचार करण्याची आवश्यकता आहे.

२. वाहतूकमंत्र्यांकडून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांवर आरोप

‘रस्ते अपघातांना सार्वजनिक बांधकाम खात्यातील अभियंते उत्तरदायी आहेत’, असे विधान वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी केले आहे. ‘काही दिवसांपूर्वी झालेल्या रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीला खात्याचे प्रमुख अभियंते अनुपस्थित होते’, असा आरोप माविन गुदिन्हो यांनी केला आहे. त्यामुळे वाहतूक खात्याने सार्वजनिक बांधकाम खात्याला याविषयी उत्तरदायी ठरवले आहे.

३. अपघात घडण्याचे एक कारण म्हणजे खड्डे पडलेले खराब रस्ते आणि त्यावरील उपाययोजना

अपघात घडण्याचे एक कारण, म्हणजे जागोजागी खड्डे पडलेले खराब रस्ते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांनी लक्ष घालून रस्त्यांचे बांधकाम दर्जेदार होण्याविषयी कोणतीही तडजोड न स्वीकारता रस्ते सिद्ध करण्याची प्रकिया योग्य पद्धतीने होत आहे ना ? यावर कटाक्षाने लक्ष द्यायला पाहिजे. प्रत्येक वेळी ‘पावसामुळे रस्ते खराब होतात’, असे म्हणणे चुकीचे आहे. मुळात रस्त्यांचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने रस्त्यामध्ये खड्डे पडण्याची समस्या अधिक प्रमाणात निर्माण होत आहे. रस्ता बांधण्याचे कंत्राट देत असतांना ‘जर रस्ता खराब झाला, तर त्यासाठी कंत्राटदार पूर्णपणे उत्तरदायी असेल आणि त्याच्याकडून त्वरित रस्ता दुरुस्त करून घेतला जाईल’, ही अट घालायला हवी. असे केले, तर तो कंत्राटदार रस्ता बांधतांना दर्जात्मक होण्याकडे लक्ष देईल.

अजून एक उपाययोजना म्हणजे रस्त्यांची तात्पुरती दुरुस्ती करण्याविषयी गोव्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये स्वतंत्र विभाग सिद्ध करणे. सार्वजनिक बांधकाम खात्याकडे जलवाहिनी फुटली किंवा पाण्याच्या संबंधित इतर तक्रार केल्यानंतर दुरुस्ती विभागातील कर्मचारी जाऊन त्या समस्येकडे लक्ष देतात. वीजपुरवठ्यामध्ये काही बिघाड झाला, तर संबंधित विभागातील वीज कर्मचारी जाऊन त्या समस्येचे निवारण करतात. तशाच पद्धतीने रस्त्यांवर खड्डे पडतात किंवा अन्य कामासाठी रस्ता खोदला जातो, त्या वेळी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे असा वेगळा रस्ता दुरुस्ती विभाग असेल, तर खड्डे पडलेल्या किंवा खोदलेल्या रस्त्यांची डागडुजी त्याच वेळी कंत्राटदाराकडून करून घेता येईल आणि रस्त्यांसंबंधीच्या तक्रारी येणार नाहीत. असे असले, तरी ‘रस्त्यांवरील अपघातांना केवळ खराब रस्ते कारणीभूत आहेत’, असे नसून इतरही कारणांकडे पहावे लागेल. (क्रमशः)

– श्री. नारायण नाडकर्णी, फोंडा, गोवा. (२१.९.२०२४)