सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने साधिकेच्या विचारप्रक्रियेत झालेला पालट आणि ती अनुभवत असलेली शरणागत स्थिती !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
सर्व साधकांनी स्वानंदीप्रमाणे साधना करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांचीही साधना चांगली होईल.
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले (१०.९.२०२४)     

१. मुलीला सांभाळून सेवा करतांना ताण येणे

‘पूर्वी मला रुक्मिणीला (मुलीला, आध्यात्मिक पातळी ५९ टक्के, वय ४ वर्षे) सांभाळून सेवा करतांना थोडा ताण येत असे. ‘माझ्याकडून सेवा वेळेत पूर्ण होईल का ? रुक्मिणीमुळे मला काही अडचण आली, तर कसे करायचे ?’, अशा विचारांमुळे माझा गोंधळ होत असे. मला सेवेतील आनंद घेता येत नसे. मी वैयक्तिक कृती करतांनाही असेच होत असे.

२. विचारप्रक्रियेत झालेला पालट आणि त्याचा होत असलेला लाभ

गेल्या काही मासांपासून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने माझ्या विचारप्रक्रियेत पालट झाला आहे.

अ. आता माझ्या मनात ‘देव मला जी सेवा देत आहे, ती कृतज्ञताभावाने स्वीकारायची आहे. मला सेवा परिपूर्ण करण्यासाठी पूर्ण क्षमतेने झोकून देऊन प्रयत्न करायचे आहेत’, एवढेच विचार असतात.

आ. मी त्यानुसार सेवा करू लागल्यावर मला येणारा ताण न्यून झाला.

इ. ‘सेवा पूर्ण होणे किंवा न होणे’, हे तर देवाच्याच हातात आहे; मात्र ‘सेवा पूर्ण होण्यासाठी स्वत:ची क्षमता पूर्णपणे वापरणे आणि देव जे विचार देईल, त्याप्रमाणे कृती करणे’, असे प्रयत्न करू लागल्यावर मला सेवेत आनंद मिळू लागला.

३. सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्याने साधनेत झालेला लाभ

अ. मी ‘प्रयत्न करण्यातील आनंद अनुभवायचा’, असे ठरवले. तेव्हा मला ‘सेवेत येणार्‍या अडचणी आणि सहसाधकांकडून सेवेत राहिलेल्या त्रुटी’ सहजतेने स्वीकारता येऊ लागल्या.

आ. माझा संघर्ष होण्याचा आणि प्रसंगात अडकून रहाण्याचा भाग न्यून झाला.

इ. माझ्या मनात ‘उत्तरदायी साधकांनी सेवेत सांगितलेले पालट मला वर्तमानात रहायला शिकवत आहेत’, असा सकारात्मक दृष्टीकोन निर्माण झाला. त्याचा मला साधनेच्या स्तरावर लाभ होऊ लागला.

ई. माझी सेवा वेळेत पूर्ण होऊ लागली.

उ. ‘मी काही केले नाही. देवानेच सर्व करून घेतले’, हा विचार माझ्या मनात दृढ होऊ लागला. मला शरणागत स्थिती अनुभवता येऊ लागली.

‘हे सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊली, आपल्या कृपेनेच मला हा आंतरिक पालट अनुभवायला मिळत आहे’, त्याबद्दल आपल्या चरणी कोटीश: कृतज्ञता !’

– सौ. स्वानंदी अविनाश जाधव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.७.२०२४)