थोडक्यात महत्त्वाचे : आरे वसाहतीतून बाहेर आला अजगर !… पालघर येथे एस्.टी. गाड्यांची दुर्दशा !…

आरे वसाहतीतून बाहेर आला अजगर !

मुंबई – मुसळधार पावसामुळे मुंबईतील आरे वसाहतीच्या जंगलातून बाहेर पडलेला अजगर मुंबईच्या रस्त्यावर फिरतांना दिसला. रात्री ११ वाजता हा ६ फुटी अजगर फिरत होता. मुंबईत अशा प्रकारे अजगर दिसल्याने उत्सुकतेचा विषय ठरला !


पालघर येथे एस्.टी. गाड्यांची दुर्दशा ! 

प्रतीकात्मक छायाचित्र

पालघर – जव्हार, मोखाडा आणि विक्रमगड या तीन तालुक्यांमधील एस्.टी. गाड्यांची दुर्दशा झालेली आहे. अनेक बसच्या खिडक्या, आसने तुटलेली आहेत. छप्पर गळके असल्याने पावसाचे पाणी आत येऊन प्रवाशांना त्रास होत आहे. वेळेत बस न येणे, तसेच बस नादुरुस्त होणे, टायर पंक्चर होणे अशाही घटना घडत आहेत. गाड्यांची वेळोवेळी दुरुस्ती केली जात नाही. त्यामुळे विद्यार्थी, महिला, वृद्ध, तसेच नोकरदार यांना मनस्ताप भोगावा लागत आहे.

संपादकीय भूमिका 

एस्.टी. गाड्यांची दुरुस्ती न करणारे दायित्वशून्य प्रशासन !


मगरीच्या पिल्लांची तस्करी; दोघे अटकेत !

प्रतीकात्मक छायाचित्र

मुंबई – बँकॉकहून मुंबई विमानतळावर उतरलेल्या दोन प्रवाशांना मगरींच्या तस्करी प्रकरणी मुंबई विमानतळावरील सीमा शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली आहे. त्यांनी एका खोक्यात मगरीची ५ पिल्ले ठेवली होती. मगरींना पुन्हा त्यांच्या देशात आणि मूळ अधिवासात पाठवण्यात आले. कायद्यानुसार मगरींची तस्करी करणार्‍या दोघांना अटक करण्यात आली आहे.


७५ विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती !

मुंबई – राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील पात्र ७५ विद्यार्थ्यांना वर्ष २०२४-२५ साठी परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती संमत करण्यात आली आहे. ओबीसी संघटनांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हा विषय निदर्शनास आणून दिला होता.


‘मंकीपॉक्स’च्या संदर्भात सतर्कतेचे आदेश

मंकीपॉक्सची लक्षणे  (प्रतीकात्मक छायाचित्र)

मुंबई – केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ‘मंकीपॉक्स’ विषाणूच्या संदर्भात सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांना सजग रहाण्याचे निर्देश दिले आहेत. भारतात ‘मंकीपॉक्स ‘क्लेड १ बी’चा नवीन रुग्ण आढळला आहे. या प्रकारचा रुग्ण आढळणारा भारत हा आफ्रिकेबाहेरील ३ रा देश ठरला आहे. संशयित रुग्णांना विलगीकरणात ठेवण्यासमवेत रोग प्रतिबंधक उपाययोजना कडकपणे राबवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेने १४ ऑगस्ट या दिवशी मंकीपॉक्स विषाणूचा प्रादुर्भाव आंतरराष्ट्रीय आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केली आहे.