बोरगाव (नाशिक) येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका नसल्याने स्थानिकांकडून आंदोलन !

स्वातंत्र्याच्या ७७ वर्षांनंतरही आरोग्य सुविधेविषयी असंवेदनशील असणारे प्रशासन !

बोरगाव येथील बिरसा मुंडा चौकात करण्यात आलेले आंदोलन

बोरगाव (नाशिक) – येथील बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात २ महिन्यांपासून रुग्णवाहिका नसल्याने रुग्णांना जिल्हा रुग्णालयात नेण्यासाठी नातेवाइकांचे हाल होत आहेत. बोरगाव घाटमाथा परिसरातील नागरिकांसह ‘आदिवासी आसरा फाउंडेशन’च्या वतीने बोरगाव येथील बिरसा मुंडा चौकात २७ सप्टेंबर या दिवशी आंदोलन करण्यात आले.

बोरगाव हे राष्ट्रीय महामार्गावरील गाव असल्याने रस्त्यावर वारंवार अपघात होत असतात. गंभीर घायाळ लोकांना नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात भरती करावे लागते. बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राकडे रुग्णवाहिका नसल्याने काही रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यूही झाला आहे.

या आंदोलनाची प्रशासनाने नोंद न घेतल्यास भविष्यात मोठे आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी दिली आहे. मोहपाडा येथील कणसरा फाउंडेशनचे अध्यक्ष विजय दळवी म्हणाले, ‘‘प्रशासन आंदोलन केल्यावर काही दिवसांसाठी तात्पुरत्या स्वरूपात रुग्णवाहिका पाठवते. आम्हाला कायमस्वरूपी रुग्णवाहिका हवी आहे.’’

रुग्णवाहिका ही अत्यावश्यक सेवा असून नियमित रुग्णवाहिका नसणे ही गंभीर गोष्ट आहे. याबाबत आमच्या स्तरावरून वरीष्ठ अधिकार्‍यांना कायमस्वरूपी रुग्णवाहिका देण्याचा मागणी अहवाल सादर केला आहे, असे सुरगाणाचे तहसीलदार रामजी राठोड म्हणाले.