Shankaracharya Nischalananda On Raising Arms : जे स्वभावाने वाईट आहेत, त्यांच्या विरोधात शस्त्र उचलणे गुन्हा नाही !

पुरी पीठाचे शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती यांचे वक्तव्य

वाईटांच्या विरोधात शस्त्र उचलणे गुन्हा नाही

अंबिकापूर (छत्तीसगड) – नम्रतेच्या नावाखाली अन्याय सहन करणे, म्हणजे सहिष्णुता नव्हे. जे स्वभावाने वाईट आहेत, त्यांच्या विरोधात शस्त्र उचलणे गुन्हा नाही. देशाचे सैन्य आणि पोलीस लोकांच्या रक्षणासाठी हाती शस्त्र घेतात. सनातन धर्माचे तत्त्वही तेच सांगते. आम्ही अहिंसेच्या बाजूने आहोत; परंतु हिंसा करणार्‍यांविरुद्ध शस्त्रे वापरणे चुकीचे समजू नका, असे वक्तव्य पुरी पीठाचे शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती यांनी केले.

शंकराचार्य यांनी मांडलेली अन्य सूत्रे !

प्रतिकात्मक छायाचित्र

१. पंतप्रधानांनी गोहत्या रोखणे आवश्यक !

शंकराचार्य पुढे म्हणाले की, पंतप्रधान गुजरातचे मुख्यमंत्री असतांना त्यांनी काँग्रेसचे तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांना ‘पंतप्रधानांनी गोहत्या थांबवावी’, असे म्हटले होते. आता ते स्वत: पंतप्रधान आहेत. आता ते म्हणतात, गोरक्षक गुंड आहेत. जो पंतप्रधान होतो, तो ख्रिस्ती आणि मुसलमान समाजाचा गुलाम बनतो.

२. धर्मांतराला सरकार उत्तरदायी !

मुसलमानांना ख्रिस्ती बनवू पहाणार्‍या ४ ख्रिस्त्यांना तालिबान राजवटीने फाशीची शिक्षा सुनावली होती. सनातन धर्म तत्त्वज्ञान, विज्ञान आणि वर्तन यांनी परिपूर्ण आहे. सेवेच्या नावाखाली हिंदूंना ख्रिस्ती बनवण्याचा गुन्हा केला जात आहे. धर्मांतरास सरकारच उत्तरदायी आहे.

३. नेत्यांची वैचारिक घसरण !

देशात नेत्यांची वैचारिक अधोगती होत आहे. देशातील राजकारणाचा दर्जा घसरत आहे. देशात कोणत्याही पक्षाची सत्ता असली, तरी त्यांच्या तत्त्वांनुसार मंदिरे आणि देवस्थाने चालवली जातात. धर्मनिरपेक्ष सरकारला धार्मिक सूत्रांमध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही.