Mehbooba Mufti Protest Nasrallah Killing : मेहबूबा मुफ्‍ती यांनी हिजबुल्लाच्‍या प्रमुखाच्‍या हत्‍येवरून रहित केली प्रचारसभा !

जम्‍मू-काश्‍मीर विधानसभा निवडणूक

आतंकवादी नसरूल्लाच्‍या हत्‍येविरोधात काश्‍मीरमध्ये निदर्शने (डावीकडे) पीडीपीच्‍या प्रमुख मेहबूबा मुफ्‍ती (उजवीकडे)

श्रीनगर (जम्‍मू-काश्‍मीर) – लेबनॉनची फुटीरतावादी आतंकवादी संघटना हिजबुल्ला आणि इस्रायल यांच्‍यातील संघर्ष शिगेला पोचला आहे. २८ सप्‍टेंबरला लेबनॉनची राजधानी बेरूतमध्‍ये इस्रायलने केलेल्‍या हवाई आक्रमणात हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसरूल्ला मारला गेला. याचा निषेध करण्‍यासाठी जम्‍मू-काश्‍मीरच्‍या माजी मुख्‍यमंत्री, तसेच पीडीपीच्‍या प्रमुख मेहबूबा मुफ्‍ती यांनी एक दिवसाची निवडणूक प्रचारसभा रहित करण्‍याची घोषणा केली. मुफ्‍ती, तसेच नॅशनल कॉन्‍फरन्‍सचे आगा सय्‍यद रुहुल्ला मेहदी यांनी हसन नसरूल्ला याच्‍या मृत्‍यूवरून शोकही व्‍यक्‍त केला आहे.

मेहबूबा मुफ्‍ती यांनी एक्‍सवरील पोस्‍टमध्‍ये म्‍हटले आहे की, मी माझी प्रचाराची मोहीम एक दिवसासाठी रहित करत आहे. लेबनॉन आणि गाझा येथील शहीदांच्‍या मागे विशेषत: नसरूल्ला याच्‍या मागे आम्‍ही खंबीरपणे उभे आहोत. पॅलेस्‍टाईन आणि लेबनॉन येथील लोकांच्‍या अत्‍यंत दुःखाच्‍या काळात तसेच ते करत असलेल्‍या अनुकरणीय प्रतिकाराच्‍या या काळात आम्‍ही त्‍यांच्‍या समवेत उभे आहोत.

हसन नसराल्लाहने तीन दशकांपेक्षा अधिक काळ हिजबुल्लाचे नेतृत्‍व करत होता. हिजबुल्लानेही नसरूल्लाच्‍या मृत्‍यूची पुष्‍टी केली आहे.

श्रीनगर आणि बडगाम येथेही निदर्शने !

अशातच नसरूल्लाच्‍या हत्‍येवरून राजधानी श्रीनगर आणि बडगाम येथे विविध भागांमध्‍ये शेकडो लोक निषेध करत रस्‍त्‍यावर उतरले होते. या वेळी आंदोलकांनी नसरूल्लाची छायाचित्रे घेऊन इस्रायलच्‍या विरोधात घोषणा दिल्‍या. (यथा राजा, तथा प्रजा ! त्‍यामुळे राजा बनू पहाणार्‍या पीडीपी आणि नॅशनल कॉन्‍फरन्‍स यांवरच कायमची बंदी घातली पाहिजे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

लेबनॉनच्‍या आतंकवाद्याची पाठराखण करणार्‍या मेहबूबा मुफ्‍ती कधीतरी भारताचे आणि काश्‍मीरचे हित चिंतू शकतात का ? यामुळे कलम ३७० रहित करण्‍यापर्यंतच न थांबता मेहबूबा यांसारख्‍या प्रमुख असणार्‍या राजकीय पक्षांवरच आता प्रतिबंध घातला पाहिजे ! अन्‍यथा उद्या हे सत्तेत आले आणि जम्‍मू-काश्‍मीर आतंकवादाच्‍या आहारी गेले नाही, तरच नवल !