वडीलधार्यांच्या आयुष्यात आनंद आणि समाधानाचे क्षण आणण्यासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ ! – मुख्यमंत्री
दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोल्हापूर येथे ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजने’चा शुभारंभ !
कोल्हापूर – आपली वडीलधारी मंडळी ही आपली संपत्ती असून आजवर त्यांनी कष्ट सोसले आहेत. त्यांचे अनुभव आणि ज्ञान ही आपल्यासाठी मोठी शिदोरी आहे. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात आनंद आणि समाधान यांचे क्षण आणण्याचे दायित्व आपलेच आहे. याच भावनेतून आपण राज्यातील सर्व धर्मियांतील ६० वर्षे आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य विभागाच्या वतीने ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ चालू केली आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे केले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात आला. त्या प्रसंगी ते बोलत होते.
या वेळी शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह विविध प्रमुख मान्यवर उपस्थित होते. ‘जय श्रीराम’, ‘जय जय श्रीराम’ च्या जयघोषात ८०० ज्येष्ठ नागरिक तीर्थ दर्शनासाठी विशेष रेल्वेने मार्गस्थ झाले. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘‘या योजनेचा प्रारंभ दक्षिण काशी श्री महालक्ष्मीदेवीच्या करवीर येथून होत आहे याचा आनंद आहे. प्रभु श्रीरामाचे दर्शन घेण्याची संधी या यात्रेच्या शुभारंभाच्या निमित्ताने आपल्या यात्रेकरूंना मिळत आहे. भारतातील ७३ आणि राज्यातील ६६ तीर्थक्षेत्रांचा योजनेमध्ये समावेश आहे. या यात्रेत औषधे आणि वैद्यकीय सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत.’’