श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीकडून कायदा आणि नियम यांचे उल्लंघन करून अवैध चाकरभरतीचा आरोप !

पंढरपूर – श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीकडून कायदा आणि नियम यांचे उल्लंघन करून अवैध चाकरभरती होत आहे. एकाच घरातील ४-५ सदस्य, इतकेच काय तर नवरा, बायको-मुले सगळेच मंदिरात कामाला आहेत, असा आरोप पिंपरी-चिंचवड युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सौरभ शिंदे यांनी केला आहे. या संदर्भात शिंदे यांनी विधी आणि न्याय विभागाला निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, स्पर्धात्मक परीक्षा घेऊन पदे भरावीत, असा उल्लेख असतांना मंदिरे समिती त्यांच्या सभांमध्ये ठराव संमत करून परस्पर नोकरी संमत करण्यासाठी नाव पाठवून देते. काही कर्मचारी मंत्रालयातून त्यांची नावे अंतिम करून घेतात. त्यामुळे या सर्व गोष्टींचे तात्काळ अन्वेषण करावे. या नियुक्त्या रहित न केल्यास मंदिरासमोर तीव्र आंदोलन केले जाईल. या संदर्भात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके म्हणाले, ‘‘श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या कर्मचार्‍यांची नोकरभरती आणि त्यांचे स्थानांतर हे नियमाप्रमाणेच झाले आहे.’’