लोकशाही कि झुंडशाही ?

‘संवैधानिक राष्ट्ररचनेत ‘सर्वांसाठी समान कायदा’ हा नियम असतांना तो सर्रासपणे धाब्यावर बसवून धर्मांध लोक वर्तमान व्यवस्थेलाच पदोपदी धाब्यावर बसवतांना दिसत आहेत. शासन-प्रशासन यांना जरी ‘आपण परिस्थितीवर नियंत्रण मिळवले’, असे वरकरणी वाटत असले, तरी प्रत्यक्षात तसे होतांना दिसत नाही. त्यामुळे समाजमनात प्रचंड प्रमाणात संताप दिसून येत आहे. आपला भारत देश हा राज्यघटनेनुसार चालणारा आहे. ‘जगातील सर्वांत मोठी लोकशाही’, असेही आपण अभिमानाने मिरवतो ; पण वर्तमान परिस्थिती पहाता असा प्रश्न पडतो की, या देशात लोकशाही आहे कि झुंडशाही ?

१. धर्मांधांच्या झुंडशाहीला घाबरून घटना अन्य जिल्ह्यात घडलेली असतांना जळगाव येथे गुन्हा नोंदवणे !

काही कालावधीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार आणि गाझाप्रेमी जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डी येथील जाहीर कार्यक्रमात प्रभु श्रीराम यांच्याविषयी आक्षेपार्ह अन् अवमानकारक वक्तव्य केले. त्या विरोधात गुन्हा नोंदवण्यासाठी जळगाव येथील समस्त हिंदुत्वनिष्ठ, अधिवक्ते आदी पोलीस ठाण्यात जमले आणि आव्हाड यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची मागणी केली. जवळपास २ घंटे चर्चा केल्यानंतरही ‘सदर घटना अन्य जिल्ह्यात घडल्याने आणि राज्यात अन्यत्र त्या घटनेच्या संदर्भात गुन्हा नोंदवलेला असल्याने जळगाव येथे गुन्हा नोंद होऊ शकणार नाही’, असे पोलीस निरीक्षकांनी त्यांच्या वरिष्ठांशी बोलून सांगितले.

त्याच पोलीस ठाण्यामध्ये काही दिवसांपूर्वी मुसलमान समाजाने हिंदु धर्माचे महंत रामगिरी महाराज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात यावा, यासाठी आंदोलन केले. त्यानंतर जिल्ह्यात अनेक ठिकाणी त्यांनी निदर्शने केली आणि पोलीस अधीक्षकांना भेटून ‘जळगाव जिल्ह्यात कुठेही एक ठिकाणी तरी गुन्हा नोंदवण्यात यावा, अन्यथा सहस्रो मुसलमान रस्त्यावर उतरतील’, अशी चेतावणी दिली. यानंतर लगेचच त्याच पोलीस ठाण्यात ‘झिरो एफ्.आय.आर्. (प्रथम दर्शनी अहवाल)’ नोंदवून संबंधित पोलीस ठाण्याला पाठवण्यात आला. (गुन्हा कुठेही घडला, तरी त्याची तक्रार जवळच्या पोलीस ठाण्यात नोंदवता येणे याला ‘झिरो एफ्.आय.आर्.’ म्हणतात.)

आता याचा पुढे काय उपयोग होईल किंवा नाही होईल, हे माहिती नाही; पण जर देशात एक राज्यघटना आणि एक कायदा आहे,  तर दोन न्याय कसे ? हिंदुत्ववनिष्ठांना ‘गुन्हा नोंदवू शकणार नाही’, असे सांगणारे पोलीस धर्मांधांसमोर पायघड्या घालून गुन्हा कसा नोंदवतात ? यावरून कुणाच्याही मनात ‘लोकशाही मार्गाने न्याय मिळतो कि झुंडशाहीने ?’, असा प्रश्न पडू शकतो.

श्री. प्रशांत जुवेकर

२. गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांनी मुसलमान नगरसेवकाची अनुमती घेण्यास सांगणे !

जळगाव जिल्ह्यातील महर्षि व्यासनगरी अर्थात् यावल शहरात गणेशमूर्ती विसर्जन पाचव्या दिवशी करण्यात येते. विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर मुसलमान समाजाची एक मशीद लागते. या वर्षी यावलच्या पोलीस निरीक्षकांनी सांगितले की, ‘ज्यांच्याकडे मंडळ आणि मिरवणूक, अशा दोन्ही अनुमती असतील, तेच विसर्जन मार्गावरील मिरवणुकीत सहभागी होऊ शकतात.’ यानंतर या दोन्ही अनुमती असलेले एक मंडळ पोलीस निरीक्षकांकडे गेले असता पोलीस निरीक्षकांनी त्या मंडळांच्या पदाधिकार्‍यांना सांगितले, ‘तुमच्याकडे दोन्ही अनुमती असल्या, तरी एकदा शांतता कमिटीचे अध्यक्ष शब्बीर यांचीही अनुमती घ्यावी !’ शांतता कमिटीचा अध्यक्ष हा पोलीस निरीक्षकांपेक्षा मोठा आहे का ? यावरून हा प्रश्न पडतो की, या देशात लोकशाही आहे कि झुंडशाही ?

३. गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत मर्दुमकी गाजवणारे प्रशासन ईदच्या वेळी कुठे लपते ?

जळगाव शहरात या वर्षी गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत विविध मंडळांनी, तसेच ढोल पथकांनी जागृतीपर संदेश देणारे फलक हातात धरले होते. यात कोणत्याही प्रकारचा जातीय किंवा धार्मिक भावना दुखावल्या जातील, असे लिखाण नव्हते. यात एका फलकावर अफझलखान वधाचे चित्र, एका फलकावर लव्ह जिहादसंबंधी जागृती करणारे लिखाण होते, तर अन्य काही फलकांवर महिला सुरक्षेविषयी घोषवाक्ये होती. असे असतांना काही पोलिसांनी अरेरावी करत काहीही कारण न देता भरगर्दीत शिरून गणेशभक्तांच्या हातातून हे फलक काढून जमा केले.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बनवण्यात आलेले ‘लव्ह जिहाद’ आणि ‘हलाल जिहाद’ या विषयांवरील जागृतीपर फलक लावण्यावरही काही मंडळांना ‘तुमच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल’, अशी दमदाटी पोलिसांकडून केली गेली. याविषयी कुणाचीही तक्रार आलेली नसतांना कर्तव्यदक्ष (?) पोलिसांनी ही कारवाई केलेली होती. एकीकडे एवढी तत्परता दाखवणारे पोलीस ईदच्या दिवशी मात्र भर रस्त्यात ‘सर तन से जुदा’ (शिरच्छेदाच्या) घोषणा देणार्‍यांविषयी काहीच बोलत नव्हते ! भारताच्या राष्ट्रध्वजासारख्या असणार्‍या झेंड्यावर अशोक चक्राच्या जागी ‘चांद तारा’ होता. याविषयीही पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. खरेतर ध्वजसंहितेनुसार हा आपल्या राष्ट्रध्वजाचा अवमान आहे. तरीही काही कारवाई केली गेली नाही.

४. विसर्जन मिरवणुकीत झालेल्या आक्रमणासंदर्भात साधा गुन्हा नोंदवून घेण्यासही टाळाटाळ करणे !

जळगाव जिल्ह्यात अमळनेर आणि यावल या तालुक्यांत गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीवर धर्मांधांनी दगडफेक केली. मिरवणूक अडवून गणेशभक्तांना मारहाणही केली. यात अमळनेर येथे दगड लागून गणेशमूर्तीचा उजवा हात दुखावला. दोन्ही ठिकाणी गुन्हा नोंदवून घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली. अमळनेर येथे तर तक्रारदार असलेल्या गणेश मंडळाच्या अध्यक्षालाच विसर्जनाच्या दिवशी रात्री २ वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात बसवून त्याच्यावरच प्रश्नांची सरबत्ती केली. एवढे करूनही त्याने दिलेल्या फिर्यादीत पालट करून काही धर्मांधांची नावे त्याला कमी करायला लावली, तसेच ‘मूर्तीचा हात दगड लागून तुटला नाही, तर मूर्ती ठेवलेली गाडी गतीरोधकावर उडल्याने तुटला’, असे ‘एफ्.आय.आर्.’मध्ये नोंदवून गुन्ह्याचे स्वरूप सौम्य केले. यावल येथे तर शेकडो ग्रामस्थ पोलीस ठाण्यात जमल्यावरही पोलीस अधिकारी गुन्हा नोंदवण्यास सिद्ध नव्हता. शेवटी ‘वरिष्ठ अधिकार्‍यांकडे दाद मागावी लागेल’, असे ग्रामस्थांनी ठणकावून सांगितल्यावर २ दिवसांनी गुन्हा नोंदवला ! हिंदूबहुल देशात हिंदूंच्या मिरवणुकांवर आक्रमण करणार्‍या धर्मांधांविरुद्ध साधे गुन्हे नोंदवण्याचे धारिष्ट्य नसणारे पोलीस हिंदूंचे रक्षण काय करणार ? पोलिसांना धर्मांधांची एवढी धास्ती का ?’

– श्री. प्रशांत जुवेकर, हिंदु जनजागृती समिती, जळगाव. (२१.९.२०२४)

झुंडशाहीच्या समस्येवर रामराज्य म्हणजेच हिंदु राष्ट्र हेच उत्तर !

‘धर्मांध झुंडीने येतात. कायदा हातात घेतात. हिंसाचार करतात. मतदानही झुंडीने करतात, त्यामुळे त्यांचे राजकीय वजनही आहे. प्रशासन त्यांच्या हिंसाचार आणि कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याच्या गोष्टींना घाबरते. सरकार त्यांच्या मतदानाच्या दबावाखाली लांगूलचालन करते. याच झुंडशाहीच्या जोरावर राज्यघटनाविरोधी ‘वक्फ कायदा’, ‘प्रार्थनास्थळे कायदा’, असे कायदे आणण्यात आले. अनेक सुविधा मिळवल्या, तसेच लोकसंख्येत प्रचंड वाढ करून घेतली. ही झुंडशाही भारतीय लोकशाहीला हरवतांना दिसत आहे. या समस्येवर तेजःपुंज रामराज्य, म्हणजेच हिंदु राष्ट्रच, हेच उत्तर आहे. धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्रच अशांना वठणीवर आणेल. याकरता हिंदूंनी संघटित होऊन हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रयत्नांची शर्थ करावी. आई जगदंबा आपल्या पाठीशी सदैव आहेच !’

– श्री. प्रशांत जुवेकर