थोडक्यात महत्त्वाचे : रावेर येथे पावसामुळे ४७१ शेतकर्‍यांची हानी; वसई येथे खाणीत २ मुले बुडाली !

रावेर येथे पावसामुळे ४७१ शेतकर्‍यांची हानी

रावेर (जिल्हा जळगाव) – वादळी वार्‍यासह पावसामुळे तालुक्यातील केळी आणि खरीप पिके अचानक आलेल्या मोठ्या प्रमाणावर भुईसपाट झाली. तालुक्यातील ३० गावांच्या शिवारातील केळी, कापूस, मका, तूर, चवळी, उडीद, मूग यांची ४७१ शेतकर्‍यांच्या सुमारे २५० हेक्टर क्षेत्रावर कोट्यवधी रुपयांची हानी झाली आहे.


वसई येथे खाणीत २ मुले बुडाली !

वसई (जिल्हा पालघर) – नवजीवन परिसरातील एका खाणीत २ लहान मुलांचा बुडून मृत्यू झाला. पाण्याचा अंदाज आला नसल्याने २६ सप्टेंबरला दुपारी नसीम चौधरी (वय १३) आणि सोपान चव्हाण (वय १४) दोघेही वसईमधील नवजीवन येथील धनिवबाग परिसरातील खाणीत अंघोळीसाठी गेले होते.


खडकदेवळा बुद्रुक येथील लाचखोर सरपंच अटकेत !

सरपंचच लाच घेत असतील, तर ग्रामविकास कोण करणार ?

पाचोरा (जिल्हा जळगाव) – येथील खडकदेवळा बुद्रुक येथील सरपंच अनिल पाटील यांनी तक्रारदाराकडून घरकुल योजनेच्या लाभासाठी १० सहस्र रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. ती घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना अटक केली.


नवी मुंबईत अफगाणिस्तानमार्गे चिनी लसूण !

नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत बांगलादेशी कामगारांचा भरणा झालेला असतांना असेच घडणार !

नवी मुंबई – भारतात बंदी असलेला चिनी लसूण वाशीतील नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत अफगाणिस्तानमार्गे येत आहे. या लसणाची चाचपणी केली जात आहे. आधी हा लसूण नेपाळमार्गे भारतात येत असे; मात्र आता आयातदारांनी चिनी लसूण प्रथम अफगाणिस्तानात मागवून नंतर भारतात त्याची अफगाणी लसूण म्हणून विक्री करण्यात येत आहे.


चप्पल स्टँडमधील चावी घेऊन घरात चोरी

पुणे – सदनिकेला कुलूप लावून चावी बाहेरच्या चप्पल स्टँडमध्ये ठेवून एक गृहस्थ कामावर गेले. चावीचा सुगावा लागल्याने चोराने ती घेऊन घरात प्रवेश केला. त्याने पावणेदोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून पलायन केले. या प्रकरणी गृहस्थाने तक्रार प्रविष्ट केली.