नवरात्रीत ९ रंगांच्या साड्या नेसत आहात ? सावधान !
३ ऑक्टोबरला चालू होत असलेल्या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने…
नवरात्रीच्या गोंडस नावाखाली स्वत:च्या मालाचा खप वाढवण्यासाठी विविध क्लृप्त्या लढवणार्या आस्थापनांचे कुटील हेतू जाणा !
हिंदूंच्या सणांच्या वेळी सध्या अनेक विकृती फोफावत आहेत. ‘नवरात्रीत प्रत्येक दिवशी विविध रंगी साड्या नेसण्याची नवी प्रथा गेल्या काही वर्षांत चालू आहे. अशा नवोदित प्रथांना धर्मशास्त्रीय आधार असतो का ?’, याविषयीची माहिती देणारा वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग येथील वेदमूर्ती भूषण दिगंबर जोशी यांच्या लेखाचा संकलित भाग प्रसिद्ध करत आहोत.
‘नवरात्रीत प्रत्येक दिवशी विविधरंगी साड्या नेसून देवी अन् नवग्रह यांची कृपा प्राप्त करून घ्यावी, ९ दिवस ‘मॅचिंग’ बांगड्या, कानातील, गळ्यातील अलंकार घालावेत. गरबा आणि दांडिया खेळ हाच देवीला आवडतो. तो खेळला की, लक्ष्मी प्राप्त होईल. यामुळे देवीची कृपा होते’, असे संदेश सामाजिक माध्यमांद्वारे प्रसारित होत आहेत.
मुंबई येथील एका महिलेच्या कार्यालयात नवरात्रीत ९ रंगांच्या साड्या आणि त्याला अनुसरून अलंकार घालण्याचे ठरले. ही महिला गरीब असून शिपाई पदावर काम करते. नवरा सतत आजारी असतो. त्यामुळे ती एवढा व्यय करू शकत नाही. ९ रंगांच्या साड्या न नेसल्यास ‘देवीचा माझ्या कुटुंबावर कोप होईल का?’, या भीतीने तिने मला संपर्क केला. या प्रसंगाच्या अनुषंगाने आणि पौरोहित्य करतांना मातृवर्गाने मांडलेल्या समस्या लक्षात घेऊन हा लेख लिहिला आहे. प्रसिद्ध हिंदुत्वनिष्ठ लेखक, तसेच ‘भागवत’ आणि ‘रामायण’ यांचे अभ्यासक डॉ. सच्चिदानंद शेवडे, तसेच गणकप्रवर सिद्धांति ज्योतिषरत्न डॉ. गौरव देशपांडे या दोन मान्यवरांशी चर्चा करूनच हा विषय मांडत आहे.
१. नवरात्रीत ९ रंगांच्या साड्या नेसण्याला शास्त्राधार नाहीच !
४ वेद, ४ उपवेद, ६ शास्त्रे, १८ पुराणे आणि उपपुराणे, भगवद्गीता, रामायण, महाभारत, दुर्गासप्तशती अन् दुर्गा उपासनेचे ग्रंथ, तसेच जवळपास ६० स्मृतिग्रंथ यांत कुठेही ‘नवरात्रीत ९ दिवस ९ रंगांच्या साड्या परिधान करा’, असे दिलेले नाही. ‘धुतलेले स्वच्छ वस्त्र परिधान करा. सकच्छ म्हणजे नऊवारी साडी असेल तर उत्तम’, असे दिले आहे. तुमच्याजवळ असतील ते अलंकार घाला. त्यांत ‘मॅचिंग हवेच’, असे नाही. विपणन (मार्केटिंग) करणार्या आस्थापनांनी विविध क्लृप्त्या वापरून सध्या प्रत्येक क्षेत्रात पाय पसरले आहेत. त्यामुळे सणांचे पावित्र्य न्यून होऊन बीभत्सपणा आला आहे.
२. आस्थापनांनी सणांत आणलेल्या नव्या पद्धतींत देवी उपासना डावललेली !
प्रत्येक प्रांताची एक विशेष संस्कृती असते. ती जपली गेली पाहिजे. उदाहरणार्थ महाराष्ट्र्रात ‘घटस्थापना’ ही प्रधान असते. त्याचसमवेत अखंड नंदादीप, त्रिकाळ पूजन, सप्तशती पाठाचे वाचन, सुवासिनी पूजन, कुमारिका पूजन, भोजन आणि माळा बांधणे इत्यादी पद्धतीने नवरात्र होते. ललिता पंचमी, महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे); अष्टमीचे होमहवन, सरस्वती आवाहन, पूजन असेही धार्मिक विधी महाराष्ट्र आणि गोवा प्रांतात होत असतात. कर्नाटकात दसरा मोठा असतो. कच्छ, सौराष्ट्र, गुजरात प्रांतात देवीची प्रतिमा पूजन करून रात्री जागरण, गरबा, तसेच होमहवन आदी पद्धतीने हा उत्सव करतात. बंगालमध्येही हा उत्सव मोठ्या प्रमाणात होतो.
‘इव्हेंट मॅनेजमेंट’, म्हणजे कार्यक्रमांचे आयोजन करणारी आस्थापने सण साजरे करण्याच्या या पद्धतींत पुष्कळ गडबड आणि सरमिसळ करून नवीन पद्धत निर्माण करतात. याला कोणताही पाया किंवा शास्त्रीय आधार नसतो. या नव्या पद्धतींत देवीची उपासना हा सर्वांत महत्त्वाचा आणि मुख्य भागच नसतो. काही वर्षांपूर्वी ‘डे’ संस्कृती (विकृती) भारतात नव्हती. जेव्हा भेटवस्तू आणि शुभेच्छापत्रे यांची निर्मिती करणारी आस्थापने देशात आली, त्यानंतर ‘डे’चे खूळ अनेकांच्या डोक्यात शिरले. ही आस्थापने ‘चॉकलेट डे’, ‘व्हॅलेंटाईन डे (कथित प्रेमाचा दिवस)’, ‘रोझ डे (प्रेमिकेला गुलाब भेट देण्याचा दिवस)’ या नावाखाली अनेक कोटी रुपयांची उलाढाल करतात. मुलांना गणेशचतुर्थी, गोकुळाष्टमी कधी आहे, हे सांगावे लागते; पण ‘डे’ मात्र ते पक्के लक्षात ठेवतात, अशी स्थिती आहे. राजकीय पुढारी मंडळींच्या पुढाकाराने गोकुळाष्टमी अशीच ‘डीजे’मय आणि मद्यमय झाली आहे. किमान आई जगदंबेचा उत्सव असा होता कामा नये, असे वाटते.
देवी नवरात्र
‘आश्विन शु प्रतिपदेपासून चालू होणार्या नवरात्रकाळात शरद ऋतु असल्याने या नवरात्रास ‘शारदीय नवरात्र’, असे म्हणतात. आपण देवघरात प्रतिदिन पूजा करत असलेल्या कुलदेवतेतील देवत्व अधिकाधिक प्रभावी व्हावे, त्याचे आपल्या घरावर कृपाछत्र असावे आणि अदृश्य शक्तींपासून कुटुंबास संरक्षण मिळावे, या हेतूने शास्त्रात नवरात्र सांगितले आहे. नवरात्राचे दुसरे फळ वंशवृद्धी असेही आहे. अनादि कालापासून आपल्याकडे नवरात्राची परंपरा आहे. राम-रावण युद्धात रावणाच्या वधासाठी रामाने नवरात्रात देवीपूजन केले होते.’
– ज्योतिषी श्री. ब.वि. तथा चिंतामणी देशपांडे (गुरुजी), पुणे
(साभार : ‘धार्मिक’, दीपावली विशेषांक)
३. धर्मशिक्षणाच्या अभावी हिंदूंचे सहजतेने होणारे धर्मांतर !
सण साजरे करण्याच्या प्रत्येक प्रांताच्या विशेष परंपरा जपल्या गेल्याच पाहिजेत, अन्यथा काही वर्षांनी आपली मुले आणि नातवंडे नवरात्रीचा अर्थ ‘डिजे लावून गरबा, दांडिया खेळणे’, एवढाच घेतील. ‘नवरात्री हा मातृशक्तीचा उत्सव आहे’, हे त्यांना कळणारच नाही. मी हिंदु आहे, म्हणजे माझे आचार, विचार, संस्कृती, धार्मिक परंपरा मला ज्ञात आहेत. एकदा याचा विसर पडला की, मग गळ्यात क्रॉस घाला किंवा सुंता करा, काहीच फरक पडणार नाही. धर्मांतर करणे अगदी सहज सोपे आणि सुलभ होईल. नेमकी हीच दुखरी नस या ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ (कार्यक्रमांचे आयोजन करणारी आस्थापने) आणि मार्केटिंग आस्थापने यांनी जाणली आहे. काहीही झाले, तरी यात परधर्मियांचाच लाभ आहे.
एखाद्या गरीब भगिनीला ही ‘उच्चभ्रू’ (९ दिवस वेगवेगळ्या रंगांची साडी आणि त्या रंगाशी निगडित अलंकार घालणे) नवरात्री जमणार नाही. त्यामुळे ती देवीपूजन करणार नाही, म्हणजे हळूहळू ती नास्तिक होईल. अशांचे धर्मांतर करणे अगदीच सोपे. श्रीमंती, धर्मशिक्षणाचा अभाव आणि मौजमजा करायला मिळाल्याने तरुण पिढी या डीजे गरबा दांडियाला नवरात्री समजतील; कारण यांनाही नवरात्री म्हणजे देवीची उपासना हे ज्ञातच नसेल. अशांचेही धर्मांतर करणे सोपे जाईल. थोडक्यात पराभव हा हिंदूंचाच होईल आणि याला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे हिंदु समाजच कारणीभूत असेल.
४. नवरात्री हा देवीप्रमाणे पराक्रम गाजवून तिची उपासना करण्याचा सण !
चंड-मुंड, शुंभ-निशुंभ, रक्तबीज आदी राक्षसांना मारून त्यांचा उत्पात शमन करून जगदंबेने जी विश्रांती घेतली, तो काळ म्हणजे नवरात्री आहे. या युद्धाचा शीण घालवण्याकरता देवीने नृत्य केले, असा उल्लेख पुराणात आहे. या काळात महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या तिन्ही रूपांतील देवीची सेवा करणे. आपल्या परंपरेनुसार नंदादीप, माळ बांधणे आदी आचार करावेत. विद्या आणि बुद्धी यांकरता मुलांकडून सरस्वतीची उपासना करवून घ्यावी. धन, धान्य, सुबत्ता यांकरता महालक्ष्मीची उपासना करावी आणि शत्रूसंहार, सामर्थ्यप्राप्ती यांकरता महाकालीची उपासना करावी.
मुलींनी दांडिया खेळण्याकडे अधिक लक्ष न देता विद्या मिळवून उत्तम मार्गाने धन जोडावे आणि छेडछाड करणार्या बदमाशांना फटके देण्याचे सामर्थ्य अंगी यावे, याकरता देवीचे माहात्म्य आणि पराक्रम यांचे वाचन अन् श्रवण करावे. हीच काळाची आवश्यकता आहे. अभिनेत्रींप्रमाणे नाचण्यापेक्षा महाकाली, झाशीची राणी लक्ष्मीबाई, कित्तूरची राणी चेन्नम्मा, राजमाता जिजाबाई यांच्यासारखा पराक्रम दाखवण्याची ही वेळ आहे. सध्याच्या दांडिया आणि गरबा यांच्या काळात संतती नियमनाच्या साधनांची दुप्पट विक्री होते अन् नंतर शालेय, तसेच महाविद्यालयीन तरुणींचे गर्भपात करण्याचे प्रमाणही वाढते. काही सेवाभावी संस्थांनी याविषयी सर्वेक्षण करून अहवालही सादर केले आहेत. याच काळात ‘लव्ह जिहाद’ फोफावतो. त्यामुळे मुला-मुलींना या धोक्यांची जाणीव करून देणे, हे आपले कर्तव्य आहे. तेव्हा विपणनाच्या (मार्केटिंगच्या) या क्लृप्त्यांना न फसता सात्त्विक पद्धतीने, आनंदाने स्वत:च्या प्राप्त परिस्थितीनुरूप जगदंबेची सेवा आणि देवीची कृपा प्राप्त करावी !
– वेदमूर्ती भूषण दिगंबर जोशी, वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग.