संपादकीय : ‘ओआयसी’चा पुन्हा काश्मीरवर डोळा !
मुसलमान देशांच्या ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को-ऑपरेशन’ने म्हणजेच ‘ओआयसी’ने पुन्हा काश्मीर सूत्रावर गरळ ओकली आहे. एकूण ५७ इस्लामी देशांच्या या संघटनेने काश्मीरच्या सूत्रावर एका संपर्क समुहाची स्थापनाही केली आहे. या संपर्क समुहाने काश्मिरींच्या (अ)वैध संघर्षासाठी समर्थन जारी केले आहे; मात्र त्यांनी पाकव्याप्त काश्मीर, गिलगिट, बाल्टिस्तान यांवरील भारताच्या दाव्याला चुकीचे ठरवले आहे. संयुक्त राष्ट्र महासभेच्या एका वेगळ्या बैठकीनंतर ओआयसीने एक संयुक्त निवेदन जारी केले आहे. त्यामध्ये काश्मीर येथे पार पडलेल्या विधानसभा आणि त्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकांविषयी सांगितले आहे की, या निवडणुका काश्मीर येथील लोकांना स्वयंनिर्णयाचा अधिकार देण्याला पर्याय म्हणून काम करणार नाहीत. एकूणच ओआयसीचे निवेदन, त्यांची भाषा ही पाकचीच वाटत आहे. एवढेच नव्हे, पाकनेच त्यांना हे निवेदन लिहून दिले आहे, असे वाटते. ओआयसीने काही मासांपूर्वी पाकचा राग आळवला होता आणि तेव्हा भारताने या संघटनेला भारताच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये नाक न खुपसण्याची तंबी दिली होती. त्यानंतर काही काळ या संघटनेने तोंड बंद केले होते; मात्र आता पुन्हा कशासाठी आरडाओरडा चालू केला आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.
पाकची स्थिती पहाता ‘एक कंगाल देश’, अशी त्याची प्रसिद्धी होत आहे, तरीही काही इस्लामी देशांचे अनुदान, साहाय्य यांच्या भिकेवर पाकचा गाडा हाकला जात आहे. पाकिस्तानमध्ये अंतर्गत बंडाळ्या मोठ्या प्रमाणात होत आहेत. ‘बलुच लिबरेशन आर्मी’चे सैनिक पाकच्या सैन्याच्या जागा, पोलीस ठाणी येथे आत्मघातकी आक्रमणे करून सैनिक, पोलीस आणि पाकचे नागरिक यांना ठार करत आहेत. या सर्वांमुळे पाक अस्थिर असतांना आणि त्याला स्वत:चा प्रदेश सांभाळता येत नसतांना त्याला काश्मीरवर लक्ष्य ठेवण्याचा काडीइतकाही अधिकार नाही. अशा पाकला ओआयसीच्या देशांनी समज देण्याऐवजी ते पाकचीच बाजू मांडत आहेत, हे त्यांचे इस्लामी राष्ट्र म्हणून पाकला केलेले साहाय्यच आहे.
निवडणुकांना विरोध !
ओआयसीने आताच हे सूत्र मांडण्याचे कारण काय ? जम्मू आणि काश्मीर येथे विधानसभेच्या निवडणुका झाल्या आहेत. या निवडणुकांना तेथील जनतेने चांगला प्रतिसाद दिला. या निवडणुकांमध्ये स्थानिक फुटीरतावादी पक्षांसह भाजपनेही उमेदवार उभे केले होते. उद्या यदाकदाचित् भाजपचे उमेदवार, तसेच अन्य पक्षांचे मवाळ उमेदवार निवडून आले, तर काश्मीर स्वतंत्र करण्याच्या पाकसह इस्लामी देशांच्या हेतूवर पाणी फेरले जाईल, अशी भीती त्यांना वाटत असावी. म्हणजे पाक काय किंवा ओआयसी काय, त्यांना काश्मीर येथील नागरिकांचे लोकशाही प्रक्रियेतून होणारे हित नको आहे, तर हिंदूबहुल भारताचा एक तुकडा तोडून नंतर तो इस्लामी देश पाकला द्यायचा आहे. एकदा काश्मीर मिळवला की, पुढील भाग मागण्यास ते मोकळे आहेत.
पाकव्याप्त काश्मीर येथील लोकांचा विचार केला, तर ते पाकलाच कंटाळले आहेत आणि पाकविरुद्ध सातत्याने तीव्र निदर्शने करत आहेत. पाकच्या पोलिसांवर आक्रमणे करून त्यांना पिटाळून लावत आहेत आणि ‘आम्हाला भारतात प्रवेश द्या, आमचे भारतात विलीनीकरण करा’, अशी मागणी करत आहेत. ‘भारत सरकारने आमच्या मागण्यांवर लवकर कृती करावी’, अशी त्यांची इच्छा आहे. हे ओआयसी या संघटनेला समजत नाही का ? पाकव्याप्त काश्मीर हा मुसलमानबहुल आहे, असे असूनही त्यांच्या मागण्यांविषयी, त्यांच्या हिताविषयी ओआयसीला काही देणे-घेणे नाही. केवळ भारताने त्यावरचा दावा सोडावा, अशी या देशांची आणि पाकची इच्छा आहे. इस्लाममध्ये ‘मुसलमानांनी केवळ मुसलमानांशी एकनिष्ठ रहावे’, अशी विचारसरणी आहे. त्यामुळे पाक कितीही आतंकवादी कृत्ये करत असला, त्याची स्थिती कितीही वाईट झाली, तरी अन्य संपन्न इस्लामी देशांना तो आपलाच वाटतो. त्या तुलनेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक आखाती देशांमध्ये जाऊन तेथील प्रमुखांच्या भेटी घेतल्या, इस्लामी देशांशी करार केले, तरी मोदी आणि भारत हे हिंदु ठरतात. हिंदू इस्लामी देशांच्या दृष्टीने काफीरच, मग भले त्यांच्याशी कितीही चांगले, जवळचे संबंध असले, कितीही सहकार्य असले तरीही ! ही विचारसरणी भारत सरकारने इस्लामी देशांशी व्यवहार करतांना कायम लक्षात ठेवली पाहिजे.
जगात अन्यत्र कुठेही नसलेल्या वक्फ कायद्याद्वारे भारताची लाखो एकर भूमी वक्फ मंडळाने घशात घातली आहे. याविरुद्ध संसदेत कायदा पारित होणार आहे. त्यामुळेही पाकसह इस्लामी देशांचा थयथयाट असू शकतो. हे देश कितीही आरडाओरड करत असले, तरी चीन आणि अमेरिका यांच्या विरोधात बोलण्यासाठी त्यांच्याकडे धैर्य नाही. चीनने उघुर प्रांतात तेथील मुसलमानांसाठी छळवणूक छावण्या उभारल्या, तेथील मुसलमानांवर दाढी ठेवणे, रोजा पाळणे यांवर बंदी घातली; तेथील मुसलमानांना चीनच्या संस्कृतीत सामावून घेण्यासाठी बळजोरी केली, याविषयी इस्लामी देश साधा निषेधही करत नाहीत. म्हणजे हे इस्लामी देश बळाला घाबरत आहेत, तर भारतानेही स्वबळ दाखवून त्यांची तोंडे बंद केली पाहिजेत.
भारतद्वेष्ट्यांना का पोसायचे ?
एका बाजूला ओआयसी भारताविरुद्ध गरळ ओकत आहे, तर दुसरीकडे काश्मिरी मुसलमान त्यांची भारत आणि हिंदू यांच्याविरोधी मानसिकता उघड करत आहेत. नुकत्याच काश्मीर येथे झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये नवी देहली येथील पत्रकार अर्चना राजधर्म यांनी तेथील जिहादींचे खरे स्वरूप उघड केले आहे. त्या वार्तांकनासाठी तेथे गेल्या. त्यांनी तेथील आबालवृद्ध नागरिक, नेते, निवडणुकीतील उमेदवार, पादचारी यांना काश्मीरच्या आधीच्या स्थितीविषयी आणि आता कशी स्थिती आहे ? याविषयी विचारले. तेव्हा काश्मिरी मुसलमानांनी दिलेल्या प्रतिक्रिया भयावह आहेत. तेथील मुसलमानांनी सांगितले की, आम्हाला येथे हिंदु मंदिर नको, हिंदूही नकोत. भाजपला हरवण्यासाठी आम्ही निवडणुकीत मतदान केले. काहींनी सांगितले की, येथे सध्या शांतता आहे; मात्र ती आम्ही बंदुका खाली ठेवल्यामुळे आहे. येथे मंदिरे झाल्यास आम्हाला त्रास होईल. त्यामुळे आम्ही ती पाडून टाकू. आम्हाला ३७० कलम हवे आहे, ते पुन्हा लागू करावे. या जिहादींनी मूलनिवासी असलेल्या काश्मिरी पंडितांना त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करून खोर्यातून नेसत्या वस्त्रानिशी पळून जाण्यास भाग पाडले, तरी त्यांच्या मनात हिंदुद्वेष जसाचा तसा आहे. अशा भारतद्वेष्ट्यांना का पोसायचे ? येथील मुसलमानांची ही मानसिकता लक्षात घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई न केल्यास ते डोईजड होतील आणि पाकला साहाय्य करण्यासही मागेपुढे पहाणार नाहीत.
‘ओआयसी’ या इस्लामी देशांच्या संघटनेची भारतद्वेषी मानसिकता तिच्यावर कठोर कारवाई केल्यासच पालटेल ! |