परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने सनातन संस्थेला लाभत असलेला प्रतिसाद !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. बालसंस्कार वर्गातील चि. नीळकंठ गुल्लापल्ली (वय ४ वर्षे) याने दत्तगुरूंचा नामजप चालू केल्यापासून २ मासांत मांसाहार बंद करणे 

‘सोलापूर येथील बालसंस्कार वर्गात चि. नीळकंठ गुल्लापल्ली (वय ४ वर्षे) हा मुलगा येतो. तो बालसंस्कारवर्गात येऊ लागल्यापासून त्याने दत्तगुरूंचा नामजप चालू केला. नीळकंठ प्रतिदिन दत्तगुरूंचा नामजप करतो. त्याने नामजप चालू करून २ मास झाल्यानंतर मांसाहार घेण्याचे बंद केले. त्याच्यामुळे त्याच्या घरातील काही व्यक्तींनीही मांसाहार घेणे बंद केले आहे.

२. श्री. सागर बापट यांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्तची सेवा पुढाकार घेऊन करणे आणि त्यांना आलेल्या अनुभूती

२ अ. संपर्काची सेवा करतांना ‘गुरुदेवच मुखातून बोलत आहेत’, असे त्यांना जाणवणे : श्री. सागर बापट यांनी वर्ष २०२४ च्या गुरुपौर्णिमेनिमित्त पुढाकार घेऊन संपर्काची सेवा केली. त्यांना आरंभी संपर्काची सेवा करतांना पुष्कळ भीती वाटत होती. त्यांनी प.पू. गुरुदेवांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) प्रार्थना केल्यावर ते सकारात्मक झाले. ‘स्वतःच्या मुखातून गुरुदेवच बोलत आहेत’, अशी त्यांना अनुभूती आली.

२ आ. गुरुदेवांना प्रार्थना केल्यानंतर दीड घंट्यात ५० कपड्यांना इस्त्री करून होणे : ते कपड्यांना इस्त्री करण्याचे काम करतात. त्यांच्याकडे हे काम पुष्कळ होते आणि गुरुपौर्णिमेची सेवाही पुष्कळ होती. त्यांनी गुरुदेवांना प्रार्थना केली, ‘माझी कामे शीघ्रतेने पूर्ण होऊन मला सेवा करता येऊ दे.’ त्यांनी अशी प्रार्थना केल्यानंतर त्यांच्याकडून दीड घंट्यात ५० कपड्यांना इस्त्री करून झाली. ‘गुरुदेवांच्या कृपेनेच हे शक्य झाले’, असा त्यांचा भाव आहे.

२ इ. गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी ताप आल्यावर गुरुदेवांना तळमळीने प्रार्थना करणे आणि दुसर्‍या दिवशी सकाळी ताप नाहीसा होऊन गुरुपौर्णिमा सोहळ्याला जाता येणे : त्यांना गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी पुष्कळ ताप आला होता. त्यांचे शरीर पुष्कळ दुखत होते. त्यांना चालताही येत नव्हते; मात्र त्यांना गुरुपौर्णिमा उत्सवाला जाण्याची तळमळ होती. त्यांनी गुरुदेवांना प्रार्थना केली. त्यांना दुसर्‍या दिवशी सकाळी बरे वाटू लागले आणि ते गुरुपौर्णिमेच्या सोहळ्याला आले.

३. गुरुदेवांच्या कृपेने समाजातील व्यक्तींचा लाभत असलेला वाढता प्रतिसाद !

ग्रामीण भागात एक धर्मशिक्षणवर्ग चालू आहे. मी त्या गावात गेल्यावर शेजारच्या गावातील मुलांनी मला संपर्क केला. त्या मुलांनी मला सांगितले, ‘‘या गावात धर्मशिक्षण दिले जाते, तसे आमच्या गावातही धर्मशिक्षण देणे चालू करा. आम्हालाही शिकवा.’’ ‘गुरुदेवांच्या कृपेने समाजातील लोक पुष्कळ प्रतिसाद देत आहेत’, हे अनुभवता येत आहे.’

– एक साधक, सोलापूर (२५.७.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक