Devendra Fadanvis On Dharavi Mosque : विश्वस्तांनी दिलेल्या कालावधीत धारावीतील अवैध मशीद स्वत:हून पाडली नाही, तर प्रशासन कारवाई करेल ! – गृहमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : धारावी येथील अवैध मशीद स्वत:हून पाडण्याचे तिच्या विश्वस्तांनी लेखी आश्वासन दिले आहे. महाराष्ट्रात संख्येच्या आधारावर अवैध कामे खपवून घेतली जाणार नाहीत. दिलेल्या कालावधीत त्यांनी अवैध मशीद पाडली नाही, तर प्रशासन पुढील कारवाई करेल, अशी चेतावणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. २८ सप्टेंबर या दिवशी ‘झी न्यूज’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
अजित पवार यांच्या महायुतीमधील प्रवेशाविषयी देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘अजित पवार यांच्या महायुतीमध्ये येण्याने लोकसभेच्या निवडणुकीत आम्हाला अपेक्षित लाभ झाला नाही, हे सत्य आहे. याचे कारण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी आमची युती ही नैसर्गिक आहे, तर अजित पवार हे महायुतीत येणे, हा राजकीय भाग आहे. अजित पवार यांच्या येण्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मतांचे विभाजन झाले. लोकसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसची विभागली गेलेली मते आमच्याकडे वळवणे, हे मोठे आव्हान होते; परंतु विधानसभेच्या निवडणुकीत त्यांची मते आम्हाला निश्चित मिळतील. अजित पवार यांनीही त्यांची मूलत: तत्त्वे कायम ठेवून स्वत:मध्ये पालट केला आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीची मतेही त्यांच्या उमेदवारांना मिळतील. विधानसभेच्या निवडणुकीत मित्रपक्षांना त्यांच्या क्षमतेनुसार सन्मानपूर्वक जागा देण्यात येतील.’’
लोकसभेच्या निवडणुकीत ‘वोट जिहाद’ झाला !
लोकसभेच्या निवडणुकीत ‘इकोसिस्टम’ (यंत्रणा) कार्यरत होती. ही निवडणूक धार्मिक नेत्यांनी हातात घेतली होती. लोकसभेमध्ये मतदान करण्यासाठी महाराष्ट्रात देशभरातूनच नव्हे, तर अन्य देशांतूनही लोक आले होते. लोकसभा निवडणुकीत मुसलमानांना भ्रमित करण्यात आले. लोकसभेच्या निवडणुकीत ‘वोट जिहाद’ करण्यात आला. लोकसभेत महायुतीला पराभूत करण्यासाठी मतदान करण्यात आले. लोकसभेत खोटे कथानक (नॅरेटिव्ह) सिद्ध करण्यात आले; परंतु खोटे अधिक काळ टिकत नाही. आमच्याशी स्पर्धा करता येत नाही, यासाठी विरोधकांनी अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न केला. विरोधकांनी ‘भारत जोडो’सारख्या यात्रेचे आयोजन करून खोटे कथानक निर्माण केले. यामध्ये वेगवेगळ्या संघटनांच्या लोकांनी एकत्र येऊन हे काम केले. यासाठी विदेशातून पैशांचा पुरवठा झाला, असा गंभीर आरोप या वेळी फडणवीस यांनी केला.