India Slams Pakistan In UN : सैन्यसंचलित देश लोकशाही देशावर बोलण्याचे धाडस करतो !

संयुक्त राष्ट्रांत भारतावर टीका करणार्‍या पाकच्या पंतप्रधानांचे भारताने प्रत्युत्तर देत काढले वाभाडे !

भारताच्या राजनैतिक अधिकारी भाविका मंगलानंदन् व पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ

न्यूयॉर्क (अमेरिका) – पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या ७९ व्या सत्रात भारताविरुद्ध द्वेषपूर्ण भाषण केले. याला भारताने  जोरदार प्रत्युत्तर दिले. भारताच्या राजनैतिक अधिकारी भाविका मंगलानंदन् यांनी पाकिस्तानला ‘दांभिक देश’ म्हणत त्याच्यावर टीका केली. ‘जो देश सैन्याकडून चालवला जातो; ज्या देशाला जागतिक पातळीवर आतंकवाद, अमली पदार्थांचा व्यापारी आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीसाठी ओळखले जाते; त्या देशाने जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीवर आक्रमण करण्याचे धाडस केले आहे’, अशा शब्दांत पाकचे वाभाडे काढले.

भाविका मंगलानंदन् यांनी पाकला फटकारतांना मांडलेली सूत्रे !

१. पाकिस्तान त्याच्या शेजारी देशाच्या विरोधात आतंकवादाचा वापर करत आहे, हे जगाला ठाऊक आहे. त्याने आमच्या संसदेवर, आर्थिक राजधानी मुंबईवर, बाजार आणि तीर्थयात्रांच्या मार्गावर आक्रमणे केली. ही सूची बरीच मोठी आहे. असा देश हिंसाचारावर बोलतो, यापेक्षा मोठे दांभिकतेचे उदाहरण असू शकत नाही.

२. शेजारी देशाने हेही लक्षात घेतले पाहिजे की, भारताविरुद्ध सीमेपलीकडून होणारा आंतवाद हा अपरिहार्य परिणामांना आमंत्रण देईल.

३. आम्ही अशा देशाविषयी बोलत आहोत, ज्याने ओसामा बिन लादेन याला दीर्घकाळ आश्रय दिला होता. एक असा देश, ज्याच्या बोटांचे ठसे जगभरातील अनेक आतंकवादी घटनांवर आहेत, ज्यांच्या धोरणांमुळे अनेक आतंकवादी गट आणि समाजातील सर्वांत वाईट घटक पाकिस्तानमध्ये स्वतःचे तळ बनवण्यासाठी आकर्षित झाले आहेत. अशा देशाने कुठेही हिंसाचाराविषयी बोलणे, हा सर्वांत मोठा दांभिकपणा आहे.

४. वर्ष १९७१ मध्ये बांगलादेशात नरसंहार करणारे आणि अल्पसंख्यांकांवर अत्याचार करणारा देश आज जगात असहिष्णुता अन् भीती यांविषयी बोलतो, हे हास्यास्पद आहे.

५. खरे सांगायचे तर पाकिस्तानला भारतीय भूभाग बळकावायचा आहे. त्यामुळेच भारताचा अविभाज्य भाग असलेल्या जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही मार्गाने होत असलेल्या निवडणुकांमध्ये तो आतंकवादाचा वापर करून सातत्याने व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करत आहे.

६. निवडणुकीत हेराफेरीचा इतिहास असलेल्या देशासाठी लोकशाहीत राजकीय निवडीविषयी बोलणे अधिक विलक्षण आहे.

पंतप्रधान शाहबाज शरीफ काय म्हणाले होते ?

१. भारतात मुसलमानांना लक्ष्य केले जात आहे, तसेच ‘इस्लामोफोबिया’मध्येही (इस्लामद्वेषामध्येही) वाढ होत असून ही जगासाठी एक त्रासदायक गोष्ट आहे. भारतात हिंदु वर्चस्ववादाचे धोरण राबवले जात असून इस्लामोफोबियाचे हे सर्वांत भयानक उदाहरण आहे. भारतातील २० कोटी मुसलमानांचे दमन करण्यात येत असून इस्लामी वारसा नष्ट करण्याचा आक्रमक प्रयत्न होत आहे.

२. जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा कलम ३७० लागू करून शांतता प्रस्थापित करावी. काश्मिरी जनतेच्या इच्छेनुसार आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील ठरवानुसार भारताने जम्मू-काश्मीरच्या समस्येवर शांततापूर्ण चर्चा करण्यासाठी पुढाकार घ्यावा.

३. पॅलेस्टिनी आणि काश्मिरी लोक एकसारखेच आहेत. त्यांच्यामध्ये काहीही भेद नाही. दोन्हींकडील नागरिक स्वातंत्र्य आणि आत्मसन्मान यांसाठी अनेक वर्षांपासून संघर्ष करत आहेत.