महालक्ष्मी स्थानक आणि परिसर यांचा पुनर्विकास होणार !
मुंबई – पश्चिम रेल्वेवरील सुमारे १०० वर्षे जुन्या महालक्ष्मी रेल्वेस्थानकाला नवे रूप देण्यात येणार आहे. रेल्वे भूमी विकास प्राधिकरणाने (आर्.एल्.डी.ए.ने) स्थानक परिसरातील जागेच्या पुनर्विकासासाठी निविदाप्रक्रिया चालू केली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत १० सहस्र ८०१ चौ.मी.वर रहिवासी आणि व्यावसायिक इमारतींचे नियोजन आहे. महालक्ष्मी मंदिर आणि हाजीअली दर्गा येथे जाणार्या प्रवाशांना याचा मोठा लाभ होणार आहे.
महालक्ष्मी रेल्वे परिसरात शक्ती मिल लेन मार्ग आणि डॉ. ई. मोसेस रोड अशा दोन मोठ्या रस्त्यांची जोडणी आहे. हे रस्तेही मोठे करण्यात येणार आहेत. महालक्ष्मी रेल्वेस्थानकासमोरील विस्तृत मैदानावर रेसकोर्स आणि अरबी समुद्र आहे. अशा नयनरम्य दृश्यांमुळे या परिसराचा समावेश शहरातील आलिशान जागेमध्ये होतो. रेल्वेस्थानक परिसरात निवासी इमारतींसह मोठी हॉटेल आणि प्रथम दर्जाच्या जागा यांना प्रचंड मागणी असते. त्यामुळे पुनर्विकासामुळे महालक्ष्मी रेल्वे स्थानकांसह परिसरावरही सकारात्मक परिणाम होऊन रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.