सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या वेळी सोलापूर येथील साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
१. सौ. वैष्णवी लवटे, सांगोला, जिल्हा सोलापूर.
अ. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवासाठी सांगोल्याहून गोवा येथे जाण्यासाठी गाडीत बसल्यापासून कार्यक्रमस्थळी पोचेपर्यंत माझी पुष्कळ भावजागृती होत होती. माझा नामजप आणि गुरुस्मरण अखंड होत होते.
आ. कार्यक्रमस्थळी मला जेव्हा तीन गुरूंचे (टीप) दर्शन झाले, तेव्हा ‘सर्व सृष्टी थांबली आहे आणि श्रीकृष्ण दर्शन देत आहे’, असे मला सूक्ष्मातून दिसले. तिन्ही गुरूंना पहाताक्षणी ‘भगवंताने त्यांच्या दर्शनातून सर्वकाही दिले’, असे मला वाटले आणि माझी भावजागृती झाली.
टीप – तीन गुरु : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ.
इ. रथाचे दर्शन झाल्यावर ‘श्रीकृष्णाच्या रथाचे दर्शन झाले’, असे मला वाटले.
ई. जेव्हा गुरुदेव सर्व साधकांकडे पाहून नमस्कार करत होते, तेव्हा ‘गुरुदेव सर्वांवर प्रेम करतात’, हे मला अनुभवता आले. जेव्हा मी गुरुदेवांना पाहिले, तेव्हा माझ्या अंगावर शहारे आले. त्या वेळी ‘साक्षात् श्री नारायणाचे दर्शन झाले’, असे मला जाणवले.’
२. सौ. वर्षा वैद्य, कुमठा नाका, सोलापूर.
२ अ. ब्रह्मोत्सवापूर्वी जाणवलेली सूत्रे
१. ‘ब्रह्मोत्सवासाठी गोव्याला जाण्याच्या २ दिवस आधी रात्री विश्रांती घेत असतांना मला पुढील दृश्य दिसले, ‘एका मोठ्या पटांगणावर फार मोठा मंडप घातला आहे. मंडपाच्या मध्यभागी साक्षात् प.पू. गुरुदेव उभे आहेत.’ गोवा येथे गेल्यावर कार्यक्रमस्थळी प्रत्यक्षातही तसेच होते.
२. ११.५.२०२३ या दिवशी सोलापूर ते गोवा प्रवास करत असतांना मला वातावरणात गारवा जाणवायला लागला आणि वाटेवरील सर्व झाडे सोनेरी दिसू लागली.
२ आ. ब्रह्मोत्सवस्थळी जाणवलेली सूत्रे
१. ब्रह्मोत्सवस्थळी गेल्यावर ‘तेथे सर्व साधक-फुलांची बागच आहे’, असे मला जाणवले.
२. ‘प.पू. गुरुदेवांची साधक-फुले पहाण्यासाठी देवदेवता, सर्व ऋषिमुनी, उन्नत, पशू-पक्षी इत्यादी आले आहेत’, असे मला जाणवत होते.
३. प.पू. गुरुदेव ज्या रथावर आरूढ झाले होते, तो रथ जसजसा जवळ येऊ लागला, तसतसे आकाश सोनेरी, निळसर आणि गुलाबी रंगाचे दिसू लागले.
४. रथोत्सवातील साधक आणि साधिका तल्लीन होऊन अन् देहभान हरपून नृत्य करत होत्या. तेव्हा ‘सर्व गोप-गोपी श्रीकृष्णाशी एकरूप झाले आहेत’, असे मला जाणवले.
५. शंखनाद होऊन ब्रह्मोत्सवाला आरंभ झाल्यावर ‘सर्वत्र लाल गुलाबाच्या पाकळ्यांच्या पायघड्या घातल्या आहेत’, असे मला जाणवले.’
(सूत्र सूत्रांचा मास आणि वर्ष : जून २०२३) (क्रमशः)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |