India : जगातील सर्वांत शक्तीशाली देशांच्या सूचीत भारत तिसर्‍या स्थानी; जपानला टाकले मागे !

अमेरिका प्रथम, तर चीन दुसर्‍या स्थानी !

नवी देहली – आशियातील शक्तशाली देशांच्या निर्देशांकात (‘एशिया पॉवर इंडेक्स’मध्ये) भारताने जपानला मागे टाकत तिसरे स्थान पटकावले आहे. केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ही माहिती नुकतीच दिली.

भारताच्या वाढत्या विकास दराविषयी ‘ऑस्ट्रेलियन थिंक टँक लोवी इन्स्टिट्यूट’ या संस्थेने २७ देशांच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेतांना या क्रमवारीमध्ये भारत ही तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असल्याचे सांगितले आहे. बाह्य आक्रमणांसह सर्वप्रकारची संकटे दूर ठेवण्याची एखाद्या देशाची क्षमता कितपत आहे ?, या निकषाच्या आधारे ‘एशिया पॉवर इंडेक्स’मध्ये प्रभावी देशांची क्रमवारी ठरवली जाते.

कोरोनाच्या जागतिक साथीनंतर भारताचा आर्थिक विकास वेगाने चालू झाला. अर्थव्यवस्थेचा विस्तार त्याचप्रमाणे युवकांच्या संख्येत वाढ, या कारणांमुळे भारताची स्थिती मजबूत झाल्याने आशियातील शक्तीशाली देशांच्या निर्देशांकात भारताची कामगिरी सुधारली. यामुळे जागतिक व्यासपिठावर भारताची भूमिका आगामी काळात आणखी महत्त्वाची होऊ शकते, असेही मानले जात आहे. गेल्या वेळी तिसर्‍या क्रमांकावर असलेल्या जपानला भारताने मागे टाकले आहे.

या सूचीत अमेरिका सर्वोच्च स्थानी असून चीनचा दुसरा क्रमांक आहे. त्यानंतर भारत, जपान, ऑस्ट्रेलिया आणि रशिया अशी क्रमवारी आहे.