सद्गुरु (कै.) सौ. आशालता सखदेव यांच्याविषयी त्यांच्या मुलीला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती !
‘एकदा मला परात्पर गुरु डॉक्टरांनी माझ्या आईविषयी (सनातनच्या सद्गुरु कै. (सौ.) आशालता सखदेव यांच्याविषयी) सांगितले होते, ‘‘ती साधनेत पुष्कळ पुढे गेली आहे. ‘तिची आणखी काय प्रगती होत आहे ?’, ते पहा. त्यातून तुम्हाला शिकायला मिळेल.’’ त्यानंतर मला आईच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. वाढदिवसाच्या दिवशी जाणवलेली सूत्रे
१ अ. आईला प्रार्थना करतांना ‘प.पू. आई’, असे शब्द मनात येणे : २८.८.२०२४ या दिवशी माझा दिनांकानुसार वाढदिवस होता. त्या दिवशी सकाळी आईला प्रार्थना करतांना ‘प.पू. आई’, असे शब्द माझ्या मनात आले. तेव्हा माझ्या मनात कोणतेच विचार नव्हते.
१ आ. आईला नमस्कार केल्यानंतर तिचे किंवा परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्व न जाणवल्याने ‘आई निर्गुण तत्त्वाशी एकरूप झाली’, असे वाटणे : आईला मानस नमस्कार करतांना मला तिचे अस्तित्व जाणवले नाही. एरव्ही मला तिच्याऐवजी परात्पर गुरु डॉ. आठवले दिसतात; पण त्या दिवशी मला त्यांचे आणि आईचे अस्तित्व जाणवले नाही. त्यामुळे ‘आई निर्गुण तत्त्वाशी एकरूप झाली’, असे मला वाटले. ( हे योग्य आहे. – डॉ. गाडगीळ) माझ्या तिथीनुसार वाढदिवसाला आईला नमस्कार करतांनाही असेच जाणवले.
२. आई आणि आजोबा यांना ‘घराण्यातील पितरांना मार्गदर्शन करून साधनेत पुढे घेऊन जा’, अशी प्रार्थना होणे
पितृपक्षात १९.९.२०२४ या दिवशी ‘ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ’, हा नामजप करण्यापूर्वी मी प्रार्थना करण्यासाठी हात जोडले. एरव्ही माझ्याकडून परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना होते. त्या दिवशी मात्र माझ्याकडून आईलाही प्रार्थना झाली. मी आमच्या घराण्यातील सर्व पितरांना नामजप करण्यास आणि साधना करत पुढे जाण्यासाठी सांगत होते. तेव्हा माझ्याकडून प्रार्थना झाली, ‘हे पितरांनो, परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने आपल्या घराण्यात त्यांनी आपल्याला आई दिली आहे. तुम्ही सर्व जण तिचे मार्गदर्शन घेऊन साधनेत पुढे चला.’ माझ्याकडून त्याविषयी आई आणि आईचे वडील पू. (कै.) नारायण नागेश मराठे यांना प्रार्थना झाली, ‘तुम्हीच घराण्यातील सर्व पितरांना साधनेत पुढे घेऊन जा आणि त्यासाठी त्यांना मार्गदर्शन करा.’
३. आईला प्रार्थना होणे अन् ‘ती अंगावरून हात फिरवत आहे’, असा भाव ठेवल्यावर अंगदुखी ९० टक्के न्यून होणे
२१.९.२०२४ या दिवशी मला अकस्मात् पुष्कळ गळून गेल्यासारखे झाले आणि माझे सर्वांग पुष्कळ दुखू लागले. आश्रमात शिकवलेले बिंदूदाबनाचे सर्व बिंदू दाबून पाहिले, तसेच दुखत असलेल्या एका हाताने दुखत असलेला दुसरा हात आणि पाय चेपण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे माझे अंग दुखणे किंचित आणि तेही थोडा वेळ न्यून होत होते. नंतर पुन्हा पहिल्याप्रमाणे अंग दुखायला लागत होते. त्या वेळी अकस्मात् मला आईची आठवण झाली. पूर्वी एकदा माझे अंग दुखत असतांना आणि मी तिला त्याविषयी सांगितलेले नसतांना तिने माझ्या पाठीवरून एकदाच हात फिरवल्यावर माझी अंगदुखी न्यून झाली होती. ते मला आठवले आणि मी तिला प्रार्थना केली. ‘ती माझ्या अंगावरून हात फिरवत आहे’, असा भाव ठेवला आणि देवाची कृपा अशी की, माझी अंगदुखी जवळपास ९० टक्के न्यून झाली. आजपर्यंत मी अशा गोष्टींसाठी आईला कधी प्रार्थना केली नव्हती. त्या दिवशी देवानेच माझ्याकडून प्रार्थना करून घेऊन मला ती अनुभूती दिली.’
– सुश्री (कु.) राजश्री सखदेव (सद्गुरु कै. (सौ.) आशालता सखदेव यांची मुलगी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.९.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |