पश्चिम महाराष्ट्रात सर्व वर्गवारीतील वीज ग्राहकांकडे ४१६ कोटी रुपयांची वीजदेयकांची थकबाकी !
पुणे – पश्चिम महाराष्ट्रात सर्व वर्गवारीतील १९ लाख १९ सहस्र २३१ वीज ग्राहकांकडे ४१६ कोटी ८२ लाख रुपयांची थकबाकी आहे. तरी थकबाकीदार वीजग्राहकांनी त्वरित वीजदेयकाचा भरणा करून वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले. (एवढी थकबाकी होईपर्यंत महावितरणचे अधिकारी काय करत होते ? – संपादक) वीजग्राहकांना चालू आणि थकित वीजदेयकांचा भरणा करणे सोयीचे व्हावे, यासाठी पुणे, सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांतील महावितरणची सर्व अधिकृत वीजदेयक भरणा केंद्र शनिवारी आणि रविवारी कार्यालयीन वेळेत चालू रहाणार आहेत.
वीजग्राहकांना www.mahadiscom.in या संकेतस्थळावर, तसेच महावितरणच्या ‘मोबाईल ॲप’द्वारे ऑनलाईन पद्धतीने विनामर्यादा वीजदेयकांचा भरणा करता येतो. या व्यतिरिक्त महावितरणने ५ सहस्र रुपयांहून अधिक देयक असणार्या सर्व लघुदाब ग्राहकांना अन्य माध्यमांद्वारे देयक भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी आवश्यक माहितीचा तपशील संबंधित ग्राहकांच्या वीजदेयकावर उपलब्ध आहे.