थोडक्यात महत्त्वाचे : मुंबईत लोकलमधून पडून पोलिसाचा मृत्यू…भजनी मंडळाचा टेंपो नाल्यात पडला !…..
मुंबईत लोकलमधून पडून पोलिसाचा मृत्यू
मुंबई – २५ सप्टेंबरच्या रात्री लोकलमधून प्रवास करतांना अमित गोंदके (वय २८ वर्षे) या पोलिसाचा मृत्यू झाला. ते अंधेरी लोहमार्ग पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत होते. रात्री ११ नंतर अंधेरीहून डोंबिवली येथे घरी जातांना भांडुप ते नाहूर या स्थानकांच्या मार्गावर गर्दीमुळे ते लोकलमधून रेल्वेमार्गावर पडले. २६ सप्टेंबरच्या सकाळी एका प्रवाशाला ते पडल्याचे आढळले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले; मात्र रुग्णालय प्रशासनाने त्यांना मृत घोषित केले.
भजनी मंडळाचा टेंपो नाल्यात पडला !
२ लहान मुली वाहून गेल्या
भंडारा – साकोली तालुक्यातील खांबा येथील १३ जणांचे भजनी मंडळ पहाटे गावाकडे परत येत होते. वडेगाव येथील नाल्यात त्यांचा टेंपो पडला. यात २ लहान मुली पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या, तर १३ जण किरकोळ घायाळ झाले. क्रेनच्या साहाय्याने टेंपो नाल्यातून बाहेर काढण्यात आला. एन्.डी.आर्.एफ्.च्या पथकाकडून वाहून गेलेल्या २ मुलींचा शोध घेणे चालू होते.
पुष्पक एक्सप्रेसमधून प्रतिबंधित औषधे नेणारा धर्मांध कह्यात !
नाशिक – पुष्पक एक्सप्रेसमधून वाहतुकीस प्रतिबंध असलेल्या औषधांच्या बाटल्या आणि गोळ्या यांची वाहतूक करतांना पोलिसांनी आफताब अहमद याला कह्यात घेतले. मुंबईच्या दिशेने जाणार्या एक्स्प्रेसमध्ये बोगीच्या प्रसाधनगृहाजवळ ३ बॅगा ठेवण्यात आलेल्या होत्या. लखनऊ येथील सलमान सिद्दिकीने त्याला या बॅगा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे अहमद याला द्यायला सांगितल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. यासाठी त्याला ५०० रुपये मिळणार होते.
संपादकीय भूमिका : गुन्हेगारीत अग्रेसर असणारे धर्मांध !
गाडीचा हप्ता मागणार्या तरुणाचा मारहाणीत मृत्यू !
सोलापूर – फायनान्स आस्थापनाच्या ‘ब्लॅक लिस्ट’मधील दुचाकी आणण्यासाठी लक्ष्मण जाधव त्यांच्या सहकार्यांसह नुराणी मशिदीजवळ गेले होते. त्यांचा दुचाकी मालकासमवेत वाद झाला. दुचाकीमालकासह चौघांनी जाधव यांचे डोके आणि छाती यांवर खोर्याने अन् फरशी घालून मारहाण केली होती. गंभीर घायाळ झाल्याने उपचार घेतांना लक्ष्मण जाधव यांचा मृत्यू झाला. विजापूर नाका पोलिसांनी या प्रकरणी चौघांविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली आहे.
८ वर्षांपासून मुलीवर अत्याचार करणार्या डॉक्टरला अटक !
नालासोपारा – एका मुलीवर मागील ८ वर्षांपासून लैंगिक अत्याचार करणारा डॉ. योगेंद्र शुक्ला याला अटक करण्यात आली आहे. पीडित मुलगी १४ वर्षांची असल्यापासून डॉ. शुक्ला तिला लग्नाचे आमीष दाखवून तिच्यावर बलात्कार करत होता. लग्न करण्यास टाळाटाळ करू लागल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित तरुणीने आचोळे पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली.