शिक्षणाची आवश्यकता आणि भारतीय शिक्षणशास्त्राची वैशिष्ट्ये !

पू. प्रा. सु.ग. शेवडे यांची ‘भारतीय संस्कृती’विषयीची लेखमालिका !

आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘भारतातील प्राचीन शिक्षणपद्धत, आदर असल्याने अत्याचार किंवा दुराचार यांना स्थान नसणे, भारतियांविषयी विदेशींनी काढलेले गौरवोद्गार, पूर्वी स्त्री-पुरुषांचे एकत्र आणि एकरूप शिक्षण नसण्यामागील कारण, ‘लेखनाविना ग्रंथ’ ही कल्पना करणे, म्हणजे शुद्ध वेडेपणा असणे अन् भारतात विकसित झालेली असंख्य शास्त्रे’, यांविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.(भाग ५७)   

भाग ५६ वाचण्यासाठी क्लिक करा –

https://sanatanprabhat.org/marathi/837874.html

प्रकरण १०

७. प्राचीन भारतीय शिक्षणशास्त्राची देणगी !

भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे

जगाच्या पाठीवर वेदांसारखे दिव्य दैवी ग्रंथ कुठे आहेत का ? रामायण, महाभारत, भागवतासारखे चरित्रात्मक धर्मग्रंथ कुणाजवळ आहेत ? कालीदास, भवभूती, भर्तृहरी, भास यांच्यासारखे कवी कुठे झाले आहेत का ? विविध विद्या आणि शास्त्र जिभेवर घोळणारे प्रतिभावान पंडित कुठेही नाहीत. हे सारे काही शिक्षणाविना झाले का ? गार्गी, मैत्रेयी, वाचक्वनी यांसारख्या ब्रह्मवादिनी स्त्रिया या भारतवर्षातच उत्पन्न होऊ शकल्या.

सर्वांना सरसकट एकच शिक्षण देऊन बेकारांच्या रांगा वाढवणारी विद्या या देशात नव्हती. प्रत्येक हाताला काम होते. प्रत्येक कामासाठी हात होता. हे सारे आश्चर्य प्राचीन भारतीय शिक्षणशास्त्राने घडवले आहे.

८. आदर्श जीवनाची तत्त्वे अंगी बाणवण्यासाठी शिक्षण आवश्यक !

अमानित्वमदम्भित्वमहिंसा क्षान्तिरार्जवम् ।
आचार्याेपासनं शौचं स्थैर्यमात्मविनिग्रहः ।।
– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १३, श्लोक ७

अर्थ : मोठेपणाचा अभिमान नसणे, ढोंग न करणे, कोणत्याही सजिवाला कोणत्याही प्रकारे त्रास न देणे, क्षमा करणे, मन, वाणी इत्यादींविषयी सरळपणा, श्रद्धा आणि भक्तीसह गुरूंची सेवा, अंतर्बाह्य शुद्धी, अंतःकरणाची स्थिरता अन् मन अन् इंद्रियांसह शरिराचा निग्रह.

ही आमच्या आदर्श जीवनाची तत्त्वे होती. हीच आमच्यात बाणतील कशी, हे पहाणारे शिक्षण होते.’

प्रकरण ११

१. राजकारण

१ अ. राजेशाही आणि ऋषींची भूमिका : ‘सहस्रो वर्षांपासून राजकारणाचे उत्तम तज्ञ या देशात होऊन गेले, उदा. ‘कामंदकीय नीतीसार’, हा प्राचीन ग्रंथ, कृष्ण, भीष्म, विदुर, कणिक इत्यादी महाभारतकालीन राजनीतीज्ञ आणि आर्य चाणक्य हे अडीच सहस्र वर्षांपूर्वीचे राजनीतीशास्त्राचे सखोल अभ्यासक अन् द्रष्टे प्रसारक होते.

भारतात राजेशाही सहस्रो वर्षे चालली; परंतु राजा हा राज्यातील सर्वेसर्वा नसायचा. विरक्त आणि निरपेक्ष ऋषि मंडळी राजाची मार्गदर्शक सल्लागार असत. ते राजाला हुकूमशाह होण्यापासून आवरत असत. ऋषिमंडळ हे राजाच्या वर असल्याने तो त्यांचा अवमान करू शकत नसे.

‘अष्टप्रधान’ मंडळ हे राजाच्या खाली असे. घेतलेले निर्णय कार्यान्वित करणे, हे त्यांचे कार्य असे. ही परंपरा ब्रिटीश सत्ता दृढमूल होईपर्यंत होती. छत्रपती शिवाजी महाराजांचेही ‘अष्टप्रधान मंडळ’ होते. ‘ज्यांच्या चरणी वंदन करून मार्गदर्शन घ्यावे’, असे समर्थ रामदासांप्रमाणे अनेक गुरुजन होते.

पुराणात राजा वेन, नहुष इत्यादी उन्मत्त झाले, तेव्हा ऋषींनी त्यांना वठणीवर आणल्याच्या कथा आहेत. राजाची नेमणूक अनुवंशिकतेने होई. एका राजानंतर त्याचा मोठा मुलगा अपंग किंवा वेडा नसेल आणि वागणुकीने प्रजेला प्रिय असेल, तरच राजा होई. धृतराष्ट्र जन्मांध असल्यामुळे मोठा असूनही राजा होऊ शकला नाही. भरत राजाला १० पुत्र होते; पण मोठे ९ पुत्र नालायक असल्यामुळे धाकटा ‘भूमन्यू’ राजा झाला.

लोकशाहीत गुंडांचे राज्य

१ आ. लोकशाहीत गुंडांचे राज्य : राजेशाहीत अलीकडची मंडळी अनेक दोष दर्शवतात. काही खरे आहेतही; पण लोकशाहीने काय गोंधळ चालवला आहे, तो आपण पहातच आहोत. भारतात सुमारे १० सहस्र आमदार आणि ५५० खासदार आहेत. बुद्धीवरील धर्म, पाप-पुण्य आणि कर्मविपाक यांचा पगडा दूर झाल्यामुळे अर्थप्रधान समाजात यांतील बहुसंख्य लोक लुटारू बनतात. स्वामी करपात्रीजी म्हणत, ‘लोकशाहीत गुंडांचेच राज्य बनते.’

गावपातळीचा गुंड ग्रामपंचायतीत, जिल्हा पातळीचा गुंड जिल्हा परिषदेत, राज्य पातळीचा गुंड विधानसभेत, राष्ट्रीय पातळीवरील गुंड लोकसभेत आणि आंतरराष्ट्रीय गुंड कॅबिनेटमध्ये !

गुंड, पोलीस आणि पुढारी यांची हातमिळवणी संपूर्ण जनतेला जीवन असह्य करत असते. निवडून येणे आणि तेसुद्धा भारतासारख्या ७० टक्के अशिक्षित लोकांच्या देशात हे गुंडगिरीविना कठीण आहे.

१ इ. सत्ता अनुभवणे आणि देशकल्याण परस्परविरोधी ! : एकदा सत्ता हाती आली की, अनेक चराऊ कुरणे समोर दिसत असतात. कोट्यवधी, अब्जावधी रुपये खाल्लेल्यांची उदाहरणे आपल्या समोर आहेत; पण कुणालाही शिक्षा झालेली नाही. होणार कशी ? गुंडांच्या टोळ्याच एकमेकांचे रक्षण करण्याचे काम करू शकतात. चांगली माणसे सत्तेवर आली, तर राजकीय गुंड परस्पर विरुद्ध पक्षांचे असले, तरी त्यांना छळण्यासाठी कसे एकत्र येतात, ते आपण पहातच आहोत.

निवडून येणे, हे लक्षावधी रुपये व्ययाचे (खर्चाचे) काम आहे. निवडून आल्यावर झालेला व्यय भरून काढणे आणि पुढच्या निवडणुकीत निवडून येण्यासाठी लागणारा पैसा जमा करणे, हे ५ वर्षांच्या मुदतीतील एक क्रमांकाचे काम ठरते. नंतर जमेल तितके खाऊन घेणे, हे दुसरे काम ! ‘आपण चोर नाही’, असे सिद्ध करत समाजकार्याचा खोटा आव आणणे’, हे तिसरे काम ! या सार्‍या व्यापातून देशाचे कल्याण कसे होणार ?(क्रमशः)

– भारताचार्य अन् धर्मभूषण पू. प्रा. सु.ग. शेवडे, चेंबूर, मुंबई.
(साभार : ग्रंथ ‘भारतीय संस्कृती’)