Petition In Delhi High Court : सरकारी कागदपत्रांमध्ये ‘धर्म’ या शब्दाऐवजी ‘पंथ’ किंवा ‘संप्रदाय’ या शब्दांचा वापर करण्यासाठी देहली उच्च न्यायालयात याचिका

उच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला उत्तर देण्याचे निर्देश

नवी देहली – देहली उच्च न्यायालयाने सरकारी कागदपत्रांमध्ये जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक खाती, वाहन चालवण्याचा परवाना इत्यादी सरकारी कागदपत्रांमध्ये ‘धर्म’ या शब्दाऐवजी ‘पंथ’ किंवा ‘संप्रदाय’ या शब्दांचा वापर करण्याची मागणी करणार्‍या याचिकेवर केंद्र सरकारला उत्तर देण्याचे निर्देश दिले. कार्यकारी मुख्य न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखालील खंडपिठाने केंद्रीय संस्कृती आणि शिक्षण मंत्रालयाला या याचिकेवर विचार करून कायद्यानुसार निर्णय घेण्याचे निर्देश दिले.

१. सुनावणीच्या वेळी न्यायालयाने याचिकाकर्त्याला सांगितले की, आम्ही तत्त्वज्ञ नाही. तुमचा अपसमज झाला आहे. कधी तुम्ही आम्हाला आंतरराष्ट्रीय ‘बँकिंग एक्सचेंज’मधील तज्ञ समजता, तर कधी आम्हाला तत्वज्ञानी समजता. त्यांच्याशी आमचा काहीही संबंध नाही. या सर्वांवर केंद्र सरकारने निर्णय घ्यायचा आहे.

२. उच्च न्यायालयाने २८ नोव्हेंबर २०२३ या दिवशी केंद्र आणि देहली सरकार यांना  नोटीस बजावली होती. याचिकेत शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये धर्म आणि पंथ यांतील भेद अधोरेखित करणारा अध्याय समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे. भाजपचे नेते आणि अधिवक्ता श्री. अश्‍विनी उपाध्याय यांनी ही याचिका प्रविष्ट (दाखल) केली आहे.

३. धार्मिक कारणास्तव द्वेष, तसेच द्वेषभावना नियंत्रित करण्यासाठी आणि सामान्य लोकांना धर्माविषयी शिक्षित करण्यासाठी शालेय अभ्यासक्रमात पंथ अन् धर्म यांचा समावेश करावा, असे याचिकेत म्हटले होते.

४. याचिकेत पुढे म्हटले आहे की, धर्माचा ‘पंथ’ किंवा ‘धर्म’ असा योग्य अर्थ द्यावा. जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड, शाळेचे प्रमाणपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, अधिवास प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र आणि बँक खाती इत्यादी सरकारी कागदपत्रांमध्ये धर्माचा अर्थ ‘पंथ’ असा होत नाही. धर्म फूट पाडणारा नाही. धर्म हा विश्‍वाचा वैश्‍विक क्रम वैयक्तिक स्तरावर समजून घेण्याचा प्रयत्न आहे. धर्म पर्याय आणि ध्येय निवडण्याचे अमर्याद स्वातंत्र्य देतो. धर्मनिरपेक्षता आणि सहिष्णुता धर्मात अंतर्भूत आहेत. पंथ आणि संप्रदाय यांत ज्ञानाचा अभाव आहे. पंथात अनेक गोष्टी अतार्किक आहेत. धर्मासाठी अनेक युद्धे आणि युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. धर्मात लोक एखाद्या व्यक्तीचे किंवा त्याच्या मार्गाचे अनुसरण करतात. धर्म हे विवेक आणि बुद्धिमत्ता यांचे फळ आहे. अशा परिस्थितीत धर्म आणि पंथ यांचे अर्थ पूर्णपणे भिन्न आहेत.